Drought 2019 : हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन् पाण्यासाठी वणवण
रविवार, 26 मे 2019जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ टॅंकर घेऊन फिरणारे शेतकरी, प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही यश न आल्याने सरपण झालेल्या फळबागेवर चालविलेली कुऱ्हाड, अपवाद वगळता पाण्यासाठी आसुसलेले शेततळे, कर्जमाफी, कर्ज न मिळणे, विमा परताव्याचे भिजत घोंगडे व त्यातील घोळ, बाग वाचविण्यासाठी जवळची जमापुंजी खर्च करावी की खरिपाची सोय लावावी या चिंतेने दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झोप उडाल्याचे चित्र आहे. यंदाच्या दुष्काळात होरपळणारे जालना जिल्ह्यातील शेतकरी या आधीच्या दुष्काळात असं नव्हतं म्हणताना दिसतात. गतवर्षी जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६१ टक्केच पाऊस झाला.