शेतकऱ्यांना APMC वर Election मध्ये मतदानाचा आधिकार दिल्याने मक्तेदारी संपणार ? | ॲग्रोवन

बाजार समित्यांची इतिहासातील वाटचाल बघूया. भारतात इंग्रजांचं सरकार असताना इंग्रजांनी संबंध भारतीय शेतकऱ्यांचं शोषण केलं. पुढे इंग्रजांनी लादलेलं दुसरं महायुद्ध, अन्नधान्याचा तुटवडा, विविध कर यामुळे भारतीय जनता त्रस्त झाली होती. 1947 साली इंग्रजांनाकडून स्वातंत्र्य मिळविले. मात्र या काळात शेती क्षेत्राची भयंकर दुर्दशाच झाली होती.

याच काळात देशात खाजगी सावकारी सर्वत्र माजली होती याचा त्रास सहन करत होता भारतीय शेतकरी. हे सावकार शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यावर भरमसाठ व्याज आकारायचे. आणि वसुली करण्यासाठी कवडीमोल किंमतीने त्यांचा शेतमाल खरेदी करायचे. त्याचा मोबदला म्हणून तुटपुंजी रक्कम द्यायचे किंवा पैसेच द्यायचे नाहीत. त्यामुळे त्यांचा व्यवसाय तेजीत होता. शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने आपला माल त्यांना विकण्याशिवाय दुसरा पर्याय राहायचा नाही. तसेच शेतीमालाची बाजारपेठ मोजक्या व्यापाऱ्यांच्या हातात होती. ते सावकारीही करायचे. त्यांची मक्तेदारी असल्यामुळे शेतकऱ्यांचं शोषण होत होतं.

शेतकऱ्यांना या दुष्टचक्रातून सोडवण्यासाठी तत्कालीन सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्या निर्माण केल्या. १९६४ मध्ये बाजारसमित्यांचा कायदा करण्यात आला. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र १९६७ पासून सुरू झाली. पुढे १९८४ मध्ये या कायद्यातील काही त्रुटी काढून त्यात बदल करण्यात आले. यामध्ये शेतकरी, अडतदार, व्यापारी या सर्वांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या. काळानुरूप नियम कायद्यांमध्ये बदलदेखील करण्यात आले. बाजारसमित्या बळकट करण्यासाठी बाजारसमित्यांशिवाय इतरत्र शेतमाल विकण्यावर बंदी घालण्यात आली.

पण कालांतराने बाजारसमित्यांमध्ये गैरप्रकारांचा शिरकाव झाला. शेतकऱ्यांची लुट सुरू झाली. पूर्वी खासगी व्यापाऱ्यांची मक्तेदारी होती, तर आता बाजारसमित्यांची मक्तेदारी निर्माण झाली. बाजारात खुली स्पर्धा संपली आणि मक्तेदारी आली की शेतकऱ्यांची नाडवणूक होते. ज्या शेतकऱ्यांसाठी बाजारसमित्यांची उरस्फोड करण्यात आली होती, त्यांचं हित बाजूला पडलं. शेतकरी हितापेक्षा व्यापाऱ्यांचं भलं करण्याकडं लक्ष दिलं गेलं. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी तर बाजारसमित्यांना शेतकऱ्यांचे कत्तलखाने म्हणायचे. हळूहळू या बाजारसमित्यांना आलं राजकीय आखाड्याचं स्वरूप.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com