पावसासाठी El Nino आणि La Nina या दोन प्रक्रियाचं महत्त्व का आहे ? | ॲग्रोवन

दरवर्षी जून महिना आला की शेतकरी पावसाची वाट पाहायला लागतात. कारण खरीप हंगाम (Kharip Season) हा देशातील महत्त्वाचा हंगाम आहे. आणि खरीप हंगाम पावसावर (Rain Season) अवलंबूनय. पाऊस वेळेवर पडला तर शेतकऱ्यांच्या घरात सुख बागडत राहतं. पण पावसानं दगाफटका केला तर शेतकऱ्याच्या अवस्था मात्र बिकट होते. अलीकडे स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात आलेत. त्यात युट्यूब (Youtube), व्हॉटसअप्पही (Whatsapp) आलंय. या माध्यमांचा वापर करून कुणीही मॉन्सूनवर उठता बसता रान हाणायलेत. त्यामुळं होतं काय तर देशातील मॉन्सूनची नेमकी स्थिति काय याचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना मिळत नाही. यातले बरेचसे महाभाग तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजचं विश्लेषण अर्धवट किंवा चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळं मॉन्सूनच्या स्थितिबद्दल गैरसमज निर्माण होतात.

अशावेळी हवामानशास्त्र विभागातील तज्ञ काय म्हणतात ? त्यांचं विश्लेषण काय आहे याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. देशातील मॉन्सूनची पुढची स्थिति कशी राहील ? आतापर्यन्तचं चित्र कसं राहिलं ? याचं अगदी सोप्या भाषेत पण तितकचं महत्त्वपूर्ण विवेचन हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक रंजन केळकर यांनी (Agrowon) साठी लिहिलेल्या लेखात केलंय. त्यामुळं तो लेख खास तुमच्यासाठी रंजन केळकरांच्या शब्दांत..

तर नैर्ऋत्य मॉन्सूनच्या (Monsoon) आगमनाची सरासरी तारीख आपल्याला ठाऊक असली तरी दरवर्षी तो नेमका त्याच तारखेला येतो असे नाही. कधी तो काही दिवस उशिरा, तर कधी तो काही

दिवस लवकर येतो. मॉन्सूनच्या परतीचेही तसेच असते. मात्र मॉन्सूनच्या पर्जन्यमानाची आकडेवारी तयार केली जाते ती नेहमी १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी. मॉन्सून लवकर येओ किंवा उशिरा परत जाओ, या तारखा पुढेमागे केल्या जात नाहीत. असा चार महिन्यांचा निश्‍चित कालावधी ठरवल्याने मॉन्सूनचे सांख्यिकी विश्‍लेषण करणे सोपे जाते. त्याशिवाय एका वर्षीच्या मॉन्सूनचे दुसऱ्या वर्षीच्या मॉन्सूनशी तुलना करणेही सुलभ होते.

यंदाच्या वर्षी नैर्ऋत्य मॉन्सून केरळवर त्याच्या सामान्य तारखेच्या तीन दिवस आधी म्हणजे २९ मे रोजी दाखल झाला. तो महाराष्ट्रावरही थोडा लवकर दाखल होईल अशी अपेक्षा होती. शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने तयारीही सुरू केली होती. पण अपेक्षेप्रमाणे झाले नाही. कोकण व गोवा उपविभागात मॉन्सूनने ११ जूनला प्रवेश केला, मराठवाड्यात १३ जूनला, तर विदर्भात १६ जूनला. तरीही महाराष्ट्रात मॉन्सूनचे दमदार असे आगमन जूनमध्ये झाले नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत राहिले आणि अनेक जागी पेरण्या खोळंबल्या.

आता मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच चालू झालेल्या पावसाने खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येऊन त्या पूर्ण झाल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com