
Summer Heat Update Maharashtra : मे महिन्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता सर्वाधिक ३५ ते ४५ टक्के आहे.
उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे. मे महिन्यात राज्यात उष्ण लाटा (Heat Wave) कमीच असण्याचे संकेत हवामान विभागाने Weather Department) दिले आहेत. पूर्वमोसमीच्या सरी कोसळून राज्याच्या काही भागांत सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊसमानाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मे महिन्यात मध्य भारताचा पूर्व भाग, पूर्व भारतातील राज्ये, तसेच ईशान्य भारत आणि दक्षिण भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगडसह ईशान्य भारतात कमाल तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.
तर राजस्थान, पंजाब, हरियानासह वायव्य भारत आणि गुजरात पश्चिम मध्य प्रदेशासह मध्य भारताच्या पश्चिम भागात मात्र तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बिहारचा बहुतांशी भाग, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालचा काही भाग, पूर्व उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, तेलंगणा आणि गुजरातच्या किनारपट्टीय भागात उष्ण लाटेचे दिवस अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात उष्ण लाटा येणार असल्या तरी त्या दोन ते तीन दिवस राहण्याचे संकेत आहेत.
मे महिन्यात देशात सरासरी पाऊस
मे महिन्यात देशात ९१ ते १०९ टक्के म्हणजेच सरासरी इतक्या पावसाचा अंदाज आहे. १९७१ ते २०२० या काळातील आकडेवारीचा विचार करता मे महिन्यात देशात ६१.४ मिलिमीटर पाऊस पडतो.
वायव्य भारत, मध्य भारताचा पश्चिम भाग आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या उत्तर भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
तर ईशान्य भारत, मध्य भारताचा पूर्व भाग, दक्षिण भारतात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. महाराष्ट्राचा विचार करता मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
‘एल-निनो’ सर्वसाधारण पातळीवर
विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या एल-निनो स्थिती सर्वसाधारण पातळीवर आहे. मे महिन्यात ही स्थिती कायम राहणार आहे. हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल स्थिती (आयओडी) सध्या सर्वसाधारण असून, पावसाळ्यात आयओडी स्थिती धनात्मक (पॉझिटिव्ह) होण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.