
Sindhudurg News : बदलत्या वातावरणामुळे शाश्वत उत्पन मिळवून देणारे काजू पीक (Cashew crop) अडचणीत आले आहे. त्यामुळे भविष्यात काजू पीक टिकविण्याच्या अनुषंगाने पिकावर संशोधन व्हायला हवे, असे मत बहुतांश शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
फळसंशोधन केंद्र वेंगुर्ला, सांगुळवाडी कृषी महाविद्यालय आणि कृषी विभाग वैभववाडी यांच्या सयुंक्त विद्यमाने सांगुळवाडी कृषी महाविद्यालय येथे काजू पीक विषयावर जिल्हास्तरीय चर्चासत्र आणि गावठी काजू बी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. आर. टी. भिंगार्डे, संदीप पाटील, डॉ. विजय देसाई, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, प्रा. तेजस गायकवाड, प्रा. विवेक कदम, महेश रावराणे आदी उपस्थित होते.
काजू उत्पादक शेतकरी विलास देसाई यांनी बदलत्या वातावरणाचा काजू पिकांवर होणाऱ्या परिणामाचा मुद्दा चर्चेदरम्यान उपस्थित केला.
अवकाळी पाऊस, गारपीट, सतत ढगाळ वातावरण आणि त्यामुळे वाढणऱ्या कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे काजू बागायतदार गेल्या चार पाच वर्षांपासून हतबल आहे.
यासंदर्भात संशोधन होणे आवश्यक आहे. काजू पीक लागवड आणि व्यवस्थापनात कोणते बदल केले पाहिजेत यावर विचारमंथन होण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रानमोडीचा उपद्रव वाढत आहे, त्याबाबतदेखील विद्यापीठ पातळीवर रानमोडी नष्ट करण्यासाठी पर्याय उपलब्ध झाले पाहीजेत. बदलत्या वातावरणाचा गावठी काजूवर तितकासा परिणाम होत नाही. काही झाडांच्या काजू बीचा आकार वेंगुर्ला सातपेक्षा मोठा आहे.
त्यामुळे त्यासंदर्भातील लागवड करता येण्याच्या दृष्टिनेदेखील प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. काजूच्या झाडाखाली पडणाऱ्या पालापाचोळ्यामुळे काजू बी निवडताना अडचण येते.
हवेचा मारा करून पालापाचोळा बाजूला करण्याच्या यंत्राचा समावेश करावा, असेदेखील देसाई यांनी स्पष्ट केले.
डॉ. खापरे, डॉ. देशमुख, डॉ. देसाई यांनी शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या आणि प्रश्नांची उत्तरे दिली. वातावरणातील बदलांवर काय करता येईल याबाबतदेखील प्रयत्न सुरू आहेत. हवामानाचा अंदाज सांगणारे यंत्र डॉ. बाळासाहेब विद्यापीठाकडून लवकरच उपलब्ध होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.