IMD Prediction 2023 : आयएमडीचा पावसाचा अंदाजः शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज की धोक्याचा इशारा?

आयएमडीचा अंदाज खरा ठरला तर देशात सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेले 2023 हे सलग पाचवे वर्ष ठरेल.
IMD
IMDAgrowon

Weather Forecast : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) (आयएमडी) मंगळवारी (ता. ११) २०२३ सालासाठी जाहीर केलेला पावसाचा अंदाज खरा ठरला तर देशात सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेले हे सलग पाचवे वर्ष ठरेल.

चांगला मॉन्सून म्हणजे शेतीला बरकत आणि त्यामुळे एकूण देशाच्या अर्थकारणाला भक्कम पाठबळ असे समीकरण भारतात रूढ आहे. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताला सर्वसाधारण (नॉर्मल) मॉन्सून चांगली अर्थगती मिळवून देईल, असे मानले जात आहे.

भारत सध्या मंदावलेला आर्थिक विकास आणि महागाईचा वाढता दर यामुळे त्रस्त आहे. अन्न किंमत महागाई (food price inflation) गेल्या काही महिन्यांत उसळी मारत असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सातत्याने व्याजदर वाढवण्याचा धडाका लावला.

त्यामुळे कर्जे महाग होऊन सर्वसामान्यांना दुहेरी फटका बसला आहे. यंदा पाऊसमान चांगले राहिले तर अन्न किंमत महागाई कमी होण्यास मदत होऊ शकते.

यंदाच्या वर्षी चांगल्या पावसामुळे अन्नधान्य उत्पादनात भरीव वाढ झाली तर केंद्र सरकार कदाचित साखर, गहू आणि भाताच्या निर्यातीवरील बंधने उठवू शकते, असे काही तज्ज्ञांनी सांगितले. परंतु काही तज्ज्ञांनी मात्र सावध सूर व्यक्त केलाय. त्यांच्या मते येत्या खरीपात शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेईपर्यंत केंद्र सरकार निर्यात धोरणांत काही बदल करण्याची शक्यता नाही.

IMD
IMD Rainfall Prediction 2023 : आयएमडीच्या अंदाजानुसार यंदा देशात सर्वसाधारण मॉन्सून; पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार...

गहू, भात आणि साखर उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पामतेल, सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची जगळ्यात सगळ्यात जास्त आयात करणारा देश म्हणूनही भारत ओळखला जातो. त्यामुळे मॉन्सूनच्या पावसाचे प्रमाण आणि वितरण काय राहील, यावर आयात-निर्यातीची धोरणे अवलंबून राहणार आहेत. त्याचा थेट फायदा किंवा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

नवी दिल्ली येथे मंगळवारी (ता. ११) आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा यांनी मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. यंदा देशात सर्वसाधारण मॉन्सून राहील, तसेच दीर्घकालिनि सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असे या अंदाजात म्हटले आहे.

दरम्यान, कालच (ता. १०) स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा एल-निनोचा प्रभाव वाढणार असल्याचे स्कायमेटने म्हटले होते. एल-निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होते, असे सर्वसाधारणपणे मानले जाते.

‘‘एल निनोचा प्रभाव मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात जाणवेल. परंतु समुद्राच्या तापमानात होणारे बदल, ज्याला इंडियन ओशन डायपोल असे म्हटले जाते, यासारखे अन्य घटक चांगला पाऊस होण्यासाठी अनुकूल आहेत,'' असे आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा म्हणाले.

एल-निनो म्हणजे खराब मॉन्सून असे सरसकट समीकरण मांडणे योग्य नसल्याचे महोपात्रा यांनी सांगितले. गेल्या ७१ वर्षांत जितक्या वेळा भारतात एल- निनो आला, त्यापैकी ४० टक्के वेळा सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

IMD
Weather Update In Maharashtra : राज्यात पावसाची शक्यता

एल-निनो स्थितीमुळे खरीप पिकांच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही आणि पेरण्यांबद्दल चिंता करण्याचे कारण नाही, असे रविचंद्रन म्हणाले.

परंतु पाऊस सरासरीपेक्षा कमी राहिला तर मात्र देशातील महागाईदराच्या वृध्दीवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे मत प्रख्यात अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा यांनी व्यक्त केले. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक महागाई आटोक्यात आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून करत असलेल्या प्रयत्नांना खो बसू शकतो.

दरम्यान, कापूस, सोयाबीन आणि साखरेचा पट्टा असलेल्या मध्य आणि पश्चिम भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा इशारा आयएमडीचे महासंचालक महोपात्रा यांनी दिला आहे. महाराष्ट्रतील बहुतांश भागाचा यात समावेश आहे. त्यामुळे आयएमडीच्या अंदाजामुळे राज्यातील शेतकऱ्यांची झोप उडणार आहे.

अर्थात पावसाचं वितरण कसे होईल, याचा एक ढोबळ आराखडा आयएमडीने आज सादर केला. परंतु मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयएमडी सुधारित अंदाज जाहीर करेल. त्यात पावसाच्या वितरणाची अधिक सखोल माहिती असेल. त्यावेळी पावसाचे चित्र आणखी स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तोपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com