
Jalgaon Rain : खानदेशात बुधवारी (ता. १५) सायंकाळी व रात्री अनेक भागांत वादळी पाऊस झाला. पाऊस अनेक भागांत कमी होता. परंतु वादळाने ज्वारी, मका, गहू आदी पिकांची हानी झाली आहे. शेतकरी संकटात असून, पंचनाम्यांची व्याप्ती वाढवावी लागेल, अशी स्थिती आहे.
४ ते ७ मार्च यादरम्यान जळगाव, धुळे व नंदुरबारात गारपीट, वादळी पाऊस झाला. यात जळगाव जिल्ह्यात १३ हजार, धुळ्यात आठ हजार आणि नंदुरबारातही सुमारे आठ हजार हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली.
या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. परंतु, त्यात खानदेशात पुन्हा एकदा बेमोसमी पाऊस व गारपीट, वादळी पाऊस धूमधडाका करीत आहे.
मंगळवारी (ता. १४) काही भागात हलका ते मध्यम पाऊस व वादळ झाले. बुधवारी रात्रीदेखील नंदुरबारमधील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धुळ्यातील शिरपूर, धुळे, साक्री, जळगावमधील धरणगाव, अमळनेर, जळगाव, एरंडोल, चोपडा, यावल, भुसावळ आदी भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. पण वादळ किंवा वेगाचा वारा अधिक होता.
यामुळे ज्वारी, मका, मळणीवर आलेला गहू आदी पिके आडवी झाली. ज्वारी आडवी झाल्याने तिची कापणी, मळणी त्रासदायक बनली आहे. आडवा झालेला गहू हार्वेस्टरने मळणी करून घेणे अशक्य झाले आहे. त्यात पाऊसही आहे.
यामुळे पिके मातीत जाऊन त्यांचे नुकसान वाढत आहे. मजूरटंचाईदेखील आहे. त्यामुळे कापणी, मळणीची कामे रखडत सुरू आहेत. दादर ज्वारी मजुरांकरवी कापून नंतर तिची मळणी ट्रॅक्टरचलित थ्रेशरने केली जाते.
या कामाला किमान तीन ते चार दिवस लागतात. त्यात पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अनेकांनी ज्वारीची कापणी टाळली आहे. कारण कापणी केलेल्या ज्वारीवर पाऊस आल्यास मोठी हानी होते.
मका मळणीवर काही भागातच आहे. परंतु कमाल क्षेत्रातील मका पक्व होत आहे. काही भागात मका मागील आठवड्यातच निसवला आहे. मका आडवा झाल्याने त्यात दाणे पक्व होण्याची प्रक्रिया मंद होऊन नुकसान होत आहे.
काबुली हरभऱ्याची मळणीदेखील याच आठवड्यात सुरू झाली आहे. पांढरा मोठा काबुली हरभरा अनेक भागात मळणीवर आला असून, त्याची कापणीदेखील राहीली आहे.
१० हजार हेक्टरवर पिकांची हानी...
मंगळवार व बुधवार सलग दोन दिवस वादळी पाऊस झाल्याने नुकसानीची आकडेवारीदेखील वाढत आहे. यामुळे पंचनाम्याची व्याप्तीदेखील वाढवावी लागणार आहे. या पावसातही तिन्ही जिल्ह्यांत किमान आठ ते १० हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा अंदाज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.