Grape Export
Grape Export

यंदा रशियाला द्राक्षाची निर्यात होणार का? 

राज्यात आजघडीला एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर छाटणीचे जवळपास पाचशेहून अधिक युनिट्स हार्वेस्टींगसाठी तयार आहेत. मात्र, निर्यातदारांच्या भूमिकेमुळे या पाचशे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

पुणे - सध्या द्राक्ष काढणीच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. यंदाच्या हंगामात राज्य द्राक्ष बागायतदार संघाने द्राक्षाला प्रती किलो ८२ रुपयांची MSP मिळावी, असा ठराव केला आहे. जानेवारी महिन्यासाठी द्राक्षाला हा दर संघाकडून निश्ति करण्यात आला आहे. मात्र, संघाने ठरवलेली MSP रशियाच्या मार्केटसाठी परवडत नसल्याचे कारण देत निर्यातदार कंपन्यांनी द्राक्ष काढणीकडे (Grape Harvesting) पाठ फिरवली आहे. 

निर्यातदारांच्या या भूमिकेमुळे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वाजगावचे द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रमोद देवरे चिंतेत सापडले आहेत. या निर्णयामुळे देवरे यांच्याकडे असलेल्या दोन एकराच्या प्लॉटचे हार्वेस्टींग थांबले आहे. देवरे यांचा दोन एकरातील थॉमसन वाणाचा (Thompson Verity) द्राक्षाचा प्लॉट रशियासाठी माल उचलणाऱ्या एका निर्यातदाराने (Grape Exporter) खरेदी केला होता. देवरे यांच्याप्रमाणेच मालेगाव तालुक्यातल्या योगेश सावंत, राजू हिरे आणि युवराज सावंत या शेतकऱ्यांचीही हीच अवस्था आहे.   

निर्यातदारांच्या या पवित्र्यामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत आला आहे. याबाबत अॅग्रोवनने राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि निर्यातदारांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

राज्य बागायतदार संघानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर काही नफा मिळावा. यासाठी जानेवारीत द्राक्षाला किमान ८२ रुपये प्रती किलो दर ठरविला. संघाने असं कुठही म्हटलं नाही की, निर्यातदारांनी द्राक्षाच्या बागा सोडाव्या. शेतकऱ्यांनी ठरविलेला किमान दराचा भार निर्यातदारांनी रशियन ग्राहकांवर टाकावा. यासाठी तेथील सुपर मार्केटवर दबाव आणायला हवा. परंतु, असे न करता निर्यातदार आपल्याच द्राक्ष उत्पादकांवर कमी दरासाठी दबाव आणत आहेत. तसेच द्राक्ष बागातदार संघाने घेतलेल्या भूमिकेबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत. याविषयी द्राक्ष बागायतदार संघ लवकरच बैठक घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहे. 

कैलास भोसले - उपाध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ 

द्राक्ष बागायतदार संघाने द्राक्षासाठी काही दर ठरवला आहे. याबाबत आम्ही आमच्या खरेदीदारांना दरांबाबत ई-मेल करून कल्पना दिली आहे. मात्र, आम्हाला अद्यापपर्यंत त्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. तोपर्यंत आम्ही मालाची पॅकींग करू शकत नाही.   

- सुधाकर रेड्डी - शिवासाई एक्सपोर्ट्स  

महाराष्ट्राच्या दृष्टीने रशियाचे मार्केट किती महत्त्वाचं आहे.. हे आम्ही शेतमाल बाजार अभ्यास दीपक चव्हाण यांच्याकडून जाणून घेतले. त्यावर ते म्हणाले.

२०२०-२१ या आर्थिक वर्षांत रशियात २४ हजार २२८ टन द्राक्षांची निर्यात झाली होती. पैशांच्या स्वरूपात पाहायच झाले तर एकूण २३६ कोटी रुपये इतके याचे मूल्य होते. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत रशियात चार हजार ६२९ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्याचे मूल्य जवळपास ४१ कोटी रुपयांच्या घरात आहे. देशाच्या द्राक्षाच्या एकूण निर्यातीत रशियाचा वाटा साधारणपणे दहा टक्क्यांचा आहे. यावरून हे लक्षात येते की, रशियाची बाजारपेठ महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाची आहे. 

- दीपक चव्हाण - शेतमाल बाजार अभ्यासक

व्हिडीओ पाहा - 

दरम्यान, राज्य द्राक्ष बागायतदार संघाने डिस्ट्रेस सेलिंग होवू नये आणि परदेशी सूपर मार्केट्सच्या प्राईज (Foreign Market Price) पडतळीनुसार रेट निश्चितीची भूमिका घेतली. मात्र, रशियासाठी हे दर परवडत नसल्याने निर्यातदारांनी एकदम काम बंदची भूमिका घेतली आहे. राज्यात आजघडीला एकट्या नाशिक (Nashik) जिल्ह्यामध्ये सप्टेंबर छाटणीचे जवळपास पाचशेहून अधिक युनिट्स हार्वेस्टींगसाठी तयार आहेत. मात्र, निर्यातदारांच्या भूमिकेमुळे या पाचशे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यांच्यासाठी एक एक तास महत्त्वाचा आहे. त्यांना अन्नाचा घासही गोड लागत नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com