भूकमुक्त भारतासाठी मधमाश्‍या पाळा

जागतिक मधमाशी दिन विशेष world honey bee day
जागतिक मधमाशी दिन विशेष world honey bee day

भारताची लोकसंख्या २०३० पर्यंत १५० ते १५५ कोटींपर्यंत पोचेल असा संख्याशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सर्वांस पुरेसे अन्न आणि ३० कोटी तरुणांस रोजगार ही दोन आव्हाने नियोजनकर्त्यांपुढे आहेत. उत्पादनात वाढ आणि रोजगारनिर्मिती अशा दोन्ही गोष्टी मधमाश्‍यापालन व्यवसायाने साध्य होऊ शकतात. आज जागतिक मधमाशी (Honey Bee) दिनानिमित्त मधमाश्‍या पालनाचा घेतलेला आढावा... 

आज जगात पाच कोटी मधमाश्‍यांच्या वसाहती आधुनिक पद्धतीने पाळल्या जात आहेत. या मधमाश्‍यांच्या वसाहतींपासून दरवर्षी एक अब्ज किलो मधाचे आणि १० कोटी किलो मेणाचे उत्पादन होत आहे. या व्यवसायात चीन अव्वल स्थानावर आहे. चीनने गेल्या पाच दशकांत मधमाश्‍यांच्या वसाहतींची संख्या ६० लाखांवरून एक कोटींपर्यंत वाढविली आहे. या वसाहतींची संख्या तीन कोटींपर्यंत वाढविण्याच्या योजना आहेत. सध्या चीनमध्ये १६ कोटी किलो मधाचे आणि एक कोटी मेणाचे उत्पादन होत आहे. मध आणि मेण निर्यातीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका (५० लाख), रशिया (५० लाख), युरोपमधील सर्व देश, दक्षिण अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत हे देश अग्रेसर आहेत. मध उत्पादनाशिवाय युरोप-अमेरिकेत मधमाश्‍यांच्या वसाहती मुख्यत्वेकरून पर-परागसिंचनासाठी वापरल्या जातात. इस्राईलमध्ये ८४ हजार मधमाश्‍यांच्या वसाहती आहेत. महाराष्ट्रातील केवळ दोन जिल्ह्यांएवढे क्षेत्रफळ, त्यातील ३० टक्के क्षेत्रफळ शेतीस उपयुक्त, सरासरी पर्जन्यमान आठ इंच अशा प्रतिकूल परिस्थितीत इस्राईलमध्ये ३० लाख किलो मधाचे उत्पादन होते. सर्व वसाहती परागसिंचनासाठी वापरून इस्राईल अन्नधान्याचे बाबतीत स्वावलंबी झाला आहे. भारतात स्थानिक पाळीव मधमाश्‍यांच्या १० लाख वसाहती आणि युरोपीय पाळीव मधमाश्‍यांच्या दोन लाख वसाहती आहेत. भारतातील मधमाश्‍यांना उपयुक्त वने आणि पिकांखालील क्षेत्रफळ लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी आयोगाने भारताची पाच कोटी मधमाश्‍यांच्या वसाहती पाळण्याची क्षमता आहे, असा अहवाल दिला आहे.

पहिली हरित-क्रांती ः स्वातंत्र्यप्रातीनंतर जवळ-जवळ ३० वर्षे भारत अन्नधान्याचे बाबतीत परावलंबी होता. १९७१ च्या दुसऱ्या भारत-पाक युद्धामुळे अन्नधान्याचे बाबतीत स्वावलंबी होण्याची जाणीव तीव्रतेने झाली. इंदिरा गांधी यांनी याबाबत ठोस उपाय योजना सुरू केल्या. ५० कृषी विद्यापीठे, ५०० कृषी विज्ञान केंद्रे स्थापन झाली आणि कृषिक्षेत्रात इतर योजनाही कार्यान्वित झाल्या. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. बोरलॉग आणि डॉ. स्वामिनाथन यांच्या प्रयत्नांमुळे १९८० च्या सुमाराला भारतात पहिली हरितक्रांती होऊन भारत तृणधान्याचे बाबतीत स्वावलंबी झाला. अन्नधान्याचे उत्पादनातील जगातील पहिल्या पाच देशांत भारताने स्थान मिळविले आणि काही प्रमाणात तांदळाची निर्यातही भारत करू लागला.

पर-परागसिंचित पिके आणि परागसिंचक कीटक ः आपण तृणधान्यांच्या बाबतीत (गहू, ज्वारी, बाजरी, मका इ.) क्रांती केली. तृणधान्ये ही स्वपरागसिंचित सफल (सेल्फ फर्टाईल) किंवा वाऱ्यामार्फत पर-परागसिंचित सफल (क्रॉस फर्टाईल) पिके आहेत. त्याच्यात बीजधारणेसाठी परागसिंचक कीटकांची गरज नसते. परंतु, इतर बहुसंख्य पिके पर-परागसिंचित सफल असून, परागीभवनासाठी परागसिंचक कीटकांवर (मधमाश्‍या) अवलंबून असतात. या पर-परागसिंचनामध्ये मधमाश्‍यांचे ७० ते ७५ टक्‍के योगदान असते. उत्तम बियाणे खता-पाण्याचा योग्य मात्रा आणि पीकसंरक्षण या पारंपरिक निविष्ठा वापरून तेलबिया, डाळी, फळे, भाजीपाला आदी पिके जेव्हा फुलात येतात, तेव्हा शेतात फुलांच्या संख्येनुसार पर्याप्त प्रमाणात परागसिंचक कीटक मधमाश्‍या उपलब्ध नसतील तर सर्वच्या सर्व फुलांमध्ये परागीभवन न होऊन बीजधारणा होत नाही. आणि पिकांचे कमाल हेक्‍टरी उत्पादन मिळत नाही.  कीटकनाशकांच्या अतिवापर आणि प्रदूषण यामुळे निसर्गातील परागसिंचकांची संख्या कमी होत आहे. परिणामी या पिकांचे हेक्‍टरी उत्पादन स्थिर आहे किंवा घटत आहे. सध्या या पिकांचे हेक्‍टरी उत्पादन जागतिक हेक्‍टरी उत्पादनाच्या ४० ते ५० टक्केच आहे. सोयाबीन, काही लिंबूवर्गीय फळे स्वपरागफलित असल्याने त्यांच्या फलधारणेसाठी परागसिंचक कीटकांची गरज नसते. परंतु, अशा पिकांच्या फुलोऱ्याचे वेळी शेतात मधमाश्‍यांच्या वसाहती ठेवल्यास मधमाश्‍यांतर्फे स्वपरागीभवनास मदत होते आणि काही फुलांत पर-परागीभवन होऊन पिकांच्या उत्पादनांत ४० ते ५० टक्के वाढ होते, असे ब्राझीलमधील कृषिशास्त्रज्ञांचे निष्कर्ष आहेत. महाराष्ट्रातील पर-परागसिंचित सफल अशा महत्त्वाच्या पिकांच्या संपूर्ण परागसिंचनासाठी दोन लाख मधमाश्‍यांच्या वसाहतींची गरज आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात १२ ते १५ हजार पाळीव मधमाश्‍यांच्या वसाहती आहेत, असा अंदाज आहे.

भूकमुक्त भारत - अन्नसुरक्षितता ः केंद्र शासनाने २००७ मध्ये ‘भूकमुक्त भारत’ आणि नंतर २०१२ मध्ये ‘अन्नसुरक्षितता’ अशी अभियाने सुरू केली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सेवा या संस्थेने २०१२ मध्ये केलेल्या पाहणीनुसार भारतातील पाच वर्षांखालील ४२ टक्के मुले कुपोषित होती. याच संस्थेच्या २०१७ मधील अहवालानुसार ते टक्केवारी ५८ टक्के झाली आहे. तसेच शाळांतील ५० टक्के मुलींत आणि ५० टक्के गर्भवती स्त्रियांत लोह कमतरता (अनिमिया) आहे. परिणामी बालमृत्यू आणि मातामृत्यू यांचे प्रमाण वाढत आहे.

भारतापुढील आव्हाने ः आजमितीला भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे. २०३० पर्यंत भारताची लोकसंख्या १५० ते १५५ कोटी होईल असा संख्याशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, नियोजनकर्ते आणि कृषीशास्त्रज्ञ यांच्यापुढे तीन आव्हाने असतील. १) सर्वांसाठी पुरेसे आणि पौष्टिक अन्नधान्याचे उत्पादन, २) २५ ते ३५ वयोगटांतील २०-२५ कोटी तरुणांसाठी रोजगारनिर्मिती आणि ३) लोकसंख्या १५० कोटींवर स्थिर ठेवणे. महाराष्ट्र शासनाने आपल्या २०१७ च्या अर्थसंकल्पात येत्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र सरकारने तर याबाबत अनेक व्यासपीठावरून घोषणा केल्या आहेत. या संकल्पात मधमाश्‍या महत्त्वाचे योगदान देऊ शकतात. यासाठी सध्या महाराष्ट्रात असलेल्या मधमाश्‍यांच्या वसाहतींचे संरक्षण, त्यांची संख्या वेगाने वाढविणे, मधमाश्‍यांची उत्पादनक्षमता वाढविणे (मध-मेण) आणि सर्व वसाहतींचा परागीभवनासाठी नियोजनबद्ध वापर करून पिकांचे हेक्‍टरी उत्पादन वाढविणे असा सर्वंकष कार्यक्रम आखून त्वरित कृती कार्यक्रम सुरू केला तर जागतिक मधमाशी दिवस खऱ्या अर्थाने साजरा केला असे म्हणता येईल.

 : ९८८११२१०८८ (लेखक केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्राचे निवृत्त संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com