Dragon Fruit Farming : ‘ड्रॅगन फ्रूट’मध्ये मिळवला बारा वर्षांचा तगडा अनुभव

बार्शी (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील फळबागायतदार राजाभाऊ देशमुख यांनी सुमारे बारा वर्षांपासून ड्रॅगन फ्रूट उत्पादनात सातत्य ठेवत या फळपिकात मास्टरी मिळवली आहे.
Dragon Fruit
Dragon FruitAgrowon

Dragon Fruit Farming : बार्शी (जि. सोलापूर) (Solapur District) येथील राजाभाऊ देशमुख हे प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची २५ एकर शेती आहे. द्राक्ष (Grape Farming) व सीताफळ (Custard Apple) बागायतदार संघाचे ते संचालक आहेत. तीन बंधूंसह त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. राजाभाऊ जेमतेम आठवीपर्यंत शिकले आहेत.

पण शेतीतील प्रयोगशीलता, अभ्यास, अनुभव कोणालाही हेवा वाटावा असाच आहे. शेतीत त्यांना पत्नी सौ. सुवर्णा आणि पुतणे विशाल यांची मदत मिळते. व्यावसायिक वृत्तीतून त्यांनी फळपीक आधारित पद्धतीचा स्वीकार केला आहे.

चार एकरांत द्राक्षे, तर १२ एकरांवर सीताफळ आहे. नावीन्यतेचा ध्यास असल्याने ते खजूर शेतीकडे वळले. आपल्याकडील वातावरणात हे पीक होईल का अशी शंका होती. पण कायम प्रयत्नवादी आणि अभ्यासू राजाभाऊंनी हे धाडस केले. तीन एकरांत हे पीक घेऊन व १५ वर्षे त्यात काम केले.

ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग

देशमुख यांचे सांगोला येथील मित्र व प्रगतशील शेतकरी राजाराम येलपले यांच्याकडून सन २०१० च्या सुमारास ड्रॅगन फ्रूटची शेती (dragon fruit farming) व मार्केटची माहिती मिळाली.

अर्ध्या एकरावर प्रयोग केला. त्यापासून पुढे चांगले उत्पादन (Dragon Fruit Production) व उत्पन्न मिळाल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक वर्षी दीड एकर याप्रमाणे आजमितीला सहा एकर क्षेत्र टप्याटप्पाने ड्रॅगन फ्रूटखाली आणले आहे. बघता बघता या पिकात सुमारे बारा वर्षांचा तगडा अनुभव तयार झाला आहे.

Dragon Fruit
Fruit Export Registration : पेरू-सीताफळ-ड्रॅगन फ्रूट निर्यातीसाठी नोंदणीची सुविधा

परवडणारे पीक ड्रॅगन फ्रूट

देशमुख यांच्याकडे खजूर जूनमध्ये तर ड्रॅगन फ्रूट जुलैमध्ये सुरू होते. नोव्हेंबरमध्ये सीताफळ तर मार्चच्या सुमारास द्राक्षे सुरू होतात. अशा रीतीने वर्षभर उत्पादन आणि पैशांचा ओघ कायम ठेवला आहे.

अन्य फळांना नैसर्गिक आपत्ती आणि दरांचा मोठा फटका त्यांना बसतो. मात्र दहा वर्षांचा अनुभव पाहात ड्रॅगन फ्रूट तुलनेने देखभाल, खर्च व दरांबाबतीत अधिक फायदेशीर ठरले आहे.

शिवाय त्याला मागणीही सतत असल्याचा देशमुख यांचा अनुभव आहे. ते सांगतात, की या पिकाला क्षारपड सोडून कोणतीही जमीन व त्यातही निचऱ्याची जमीन मानवते. आपल्याकडील वातावरणातही हे पीक येतेही चांगले.

या पिकात सिमेंट खांब, रोपे व अन्य मिळून सुरुवातीचा खर्चच जास्त म्हणजे पावणेदोन लाख रुपयांपर्यंत आहे. पुढील वर्षानंतर तो ७० हजार रुपयांपर्यंत येतो.

‘ड्रॅगन फ्रूट’ शेती- ठळक बाबी

-१२ बाय ८ फूट अंतरावर लागवड.

-लाल रंगाचे तीन, तर सफेद रंगाचे दोन वाण. वरून पिवळे व आतून सफेद अशा एका वाणाचाही प्रयोग.

-प्रत्येकी आठ फुटांवर दीड ते दोन फूट खोल खड्डे. त्यात सहा फूट उंचीचा सिमेंट खांब रोवला. जमिनीच्या तो चार ते सव्वाचार फूट उंच.

-खांबाच्या चारही बाजूंना प्रत्येकी चार रोपे. एकरी ४०० खांब व १६०० रोपे.

- खांबाला रोपे बांधून घेतली. खांबाच्या चारही बाजूंनी वर आलेल्या रोपांचा चांगला विस्तार व्हावा, यासाठी टॅापला गोल किंवा चौकोनी खिडकी.

-दरवर्षी प्रति खांब २० ते २५ किलो शेणखत तर पाच किलो ऊसपाचट.

-गरजेनुसार ह्युमिक ॲसिडचा वापर. हार्वेस्टिंगनंतर १९-१९-१९, १२ः६१ः० आदी विद्राव्य खतांचा ठिबक सिंचनाद्वारे वापर.

-मुंग्या, गोगलगाय याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी कीटकनाशकाची फवारणी.

-जमिनीचा मगदूर पाहून पाणी. नव्या लागवडीवेळी फेब्रुवारी ते मेपर्यंत थोडेसे पाणी. जुनी बाग असल्यास या कालावधीत पाणी अल्प.

काढणी, उत्पादन

-जूनच्या दरम्यान फुले, तर जुलैमध्ये फळे येण्यास सुरुवात. नोव्हेंबरपर्यंत फळ हंगाम संपतो.

-साधारण तिसऱ्या वर्षानंतर झाडाचे वय वाढेल तसे उत्पादन वाढते. प्रति खांब १० ते २५ किलो

उत्पादन मिळते.

-सन २०२० मध्ये एकरी सहा टन, तर २०२१ मध्ये सात टनांपर्यंत उत्पादन मिळाले.

बाजारपेठ व दर

ड्रॅगन फ्रूटला सर्वाधिक मागणी मुंबई, पुणे ‘मार्केट’मधून आहे. काही व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. क्रेट आणि बॉक्स अशा दोन्ही पॅकिंगमधून माल पाठवण्यात येतो.

अनेक वर्षांपासून या पिकात असल्याने मुंबई-पुण्याचे व्यापारी काढणीच्या कालावधीत त्यांच्याशी संपर्क करतात. अलीकडील वर्षांत सफेद फळांना किलोला ३० रुपयांपासून ११०, कमाल १५०, तर लाल फळांना ५० ते कमाल २७५ रुपयांपर्यंत दर मिळाला.

Dragon Fruit
Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट ला आरोग्यदायी का मानले जाते?

अभ्यासासाठी परदेश दौरा

आपण घेत असलेल्या प्रत्येक पिकात कुशल व ज्ञानी व्हावे यासाठी देशमुख यांनी ऑस्ट्रेलिया, इस्राईल आदी देशांचे अभ्यासदौरे केले आहेत. लॉकडाउन सुरू होण्याआधी ड्रॅगन फ्रूट शेतीची माहिती घेण्यासाठी या फळात आघाडीवर असलेल्या व्हिएतनामचा दौरा त्यांनी केला.

तेथील शेतकरी व प्रसिद्ध चिलेमन शहरातील बाजारपेठेला भेट दिली. तेथून व्हिएतनाम व्हाइट आणि ‘रेड’ वाणांची रोपे आणली. ही फळे मोठ्या आकाराची, नारळासारखी लांबट, निमुळत्या आकाराची आहेत. त्यापासून २५ किलोपर्यंत उत्पादन मिळाले आहे.

संपर्क ः राजाभाऊ देशमुख, ७०२०२०५०२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com