आंबा महोत्सवातून राज्यात १७ कोटींची उलाढाल

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाद्वारे २१ वर्षांपासून पुण्यासह महत्त्वाच्या अन्य जिल्ह्यांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन यशस्वीपणे करण्यात येत आहे. यंदाच्या (२०२२) आंबा महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. पुण्यात १३ कोटी तर राज्यात सुमारे १७ कोटी रुपयांच्या आंब्याची थेट विक्री उलाढाल झाली. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत प्रत्यक्ष आयोजन न झाल्याने यंदाची उलाढाल आंबा बागायतदारांसाठी उत्साहवर्धक व उमेद वाढवणारी ठरली.
आंबा महोत्सवातून राज्यात १७ कोटींची उलाढाल
Mango FestivalAgrowon

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेंतर्गत आंबा महोत्सवाचे (Mango Festival) आयोजन सन २००२ पासून राज्यात विविध ठिकाणी करण्यात येते. विक्री व्यवस्थेतील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व त्याचवेळी ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा माल मिळावा हा महोत्सवाचा उद्देश असतो. पुणे येथील मार्केट यार्ड (Pune APMC) परिसरातील वखार महामंडळाच्या जागेत यंदा एक एप्रिल ते तीन जून या कालावधीत महोत्सव झाला. सुमारे ५१ स्टॉल आंबा उत्पादकांना (Mango Growers) उपलब्ध करून देण्यात आले. महोत्सवात सहभागी शेतकरी एकत्रितपणे (आपापल्या भागानुसार) आंबा विक्रीस (Mango For Sale) आणतात. यात प्रति गटाचा अंदाजे पाच लाखांचा आंबा थेट विकला जातो. हाच आंबा बाजार समितीत विकल्यास अडत, कमिशन द्यावे लागते. मोठ्या प्रमाणात आवक झाल्यास दर (Mango Rate) पडतात. यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

Mango Festival
भारताचे आंबे युरोपात: बेल्जीयम येथे आंबा महोत्सवाचे आयोजन

महोत्सवाचे चित्र

रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सुमारे ७० हापूस आंबा उत्पादक यंदाच्या महोत्सवामध्ये सहभागी झाले. यंदा हंगामाच्या सुरूवातीस म्हणजे मार्च- एप्रिलमध्ये आवक कमी होती. त्यामुळे दरही जास्त होते. वजन आणि दर्जानुसार ७०० चे १२०० रुपये प्रति डझन दर होते. अवकाळी पाऊस, दिवसा कडकडीत ऊन व रात्रीचा गारवा असे हवामानातील बदल ही आवक कमी असण्याची कारणे होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आवक वाढून दरही कमी होऊ लागले. एप्रिलच्या शेवटचा आठवडा ते मेच्या पहिल्या आठवड्यापासून आवकेत मोठी वाढ होऊन दर प्रति डझन ५०० ते ७०० रुपयांदरम्यान तर मे व हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात ते ३०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान राहिले. महोत्सवात सुमारे दोन लाख डझनांपेक्षा जास्त आंबा विकला गेला. त्यातून सुमारे १३ कोटी रुपयांची उलाढाल झाली.

राज्यभर विस्तार

पूर्वी आंबा महोत्सव केवळ पुणे शहरात व्हायचा. मात्र दरवर्षी विविध शहरांमध्ये तो आयोजित करण्याच्या सूचना पणनमंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केल्या. त्यामुळे कुर्डुवाडी, पिंपरी-चिंचवड, मुंबई, औरंगाबाद, पाल (जळगाव), बाभळेश्वर (नगर), सांगली, रत्नागिरी, दापोली, कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्याच्या फलोत्पादन विभागाच्या सहकार्याने बेळगाव येथे पाच दिवसीय महोत्सवाचे अभियान यशस्वी करण्यात आले. देवगड आणि रत्नागिरी आंब्याच्या दरांत फरक नसतो. हंगामानुसार ते ठरतात. हंगामाच्या प्रारंभी प्रति डझन एक हजार, बाराशे पासून हंगामाच्या अखेरीस ते ३०० रुपयांपर्यंत खाली येतात.

पूर्ण हंगामात सरासरी दर ५०० ते ७०० रुपये मिळतो. हापूस व्यतिरिक्त अन्य कोणते आंबे महोत्सवात असतात? महोत्सवात मुख्यत्वे कोकणातील हापूस उत्पादकच सहभागी झालेला असतो. त्यामुळेच हाच आंबा प्रामुख्याने असतो. त्याचा हंगाम संपल्यावर केसर आणि स्थानिक रायवळची आवक होते. या दरम्यान महोत्सवाची सांगता झालेली असते. शेतातून महोत्सवापर्यंत आंबा वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांनाच करावा लागतो. ग्राहकांसोबत अनेक वर्षांचे संबंध तयार झाल्याने ग्राहक शेतकऱ्यांना महोत्सवाबाबत विचारणा करीत असतात. त्यामुळे ग्राहकांची पसंतीही बागायतदारांना चांगली माहीत असते.

दृष्टीक्षेपात आंबा महोत्सव

विभाग --- महोत्सवाची संख्या ---- स्टॉलधारक शेतकरी --- उलाढाल
पुणे मुख्यालय --- १ --- ७० --- १४ कोटी ६० लाख
पुणे विभाग --- ३ --- ५५ --- ४८ लाख १० हजार
औरंगाबाद --- १ --- २१ --- ४० लाख ५ हजार
कोल्हापूर --- ३ --- ५९ --- ८९ लाख ७५ हजार
नाशिक --- २ --- १३१ --- ५८ लाख १५ हजार
रत्नागिरी --- ३ --- २८ --- १३ लाख ५० हजार
एकूण --- १३ --- ३६४ --- १७ कोटी ९ लाख


कोरोना संकटात ऑनलाइन महोत्सव

कोरोना संकटात २०२० आणि २०२१ मध्ये आंबा विक्रीचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. बाजार समित्या, बाजारपेठा, दळणवळण बंद होते. अशावेळी पणन मंडळाद्वारे ऑनलाइन आंबा महोत्सवाचे आयोजन झाले. पुणे- गुलटेकडी मार्केटयार्ड येथील वखार महामंडळाचे गोदाम भाडेतत्वावर घेण्यात आले. किरकोळ विक्रीसाठी वाहने उपलब्ध केली. पणन मंडळाच्या संकेस्थळावरील पोर्टल कार्यरत झाले. त्याद्वारे सुमारे ४०० आंबा उत्पादकांकडून नोंदणी झाली. राज्यभरातील निवासी सोसायट्या, कार्यालये, सामाजिक संस्था, वैयक्तिक ग्राहक, निर्यातदार आदींना आंबा उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून २०२० मध्ये ६५ हजार डझन तर २०२१ मध्ये १ लाख ४२ हजार आंब्याची थेट विक्री झाली. त्यातून अनुक्रमे ३ कोटी ९० रुपये व सात कोटी ७० लाखांची उलाढाल झाल्याचे पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी सांगितले.

बागायतदारांसाठी सुविधा

महोत्सवात पणन मंडळातर्फे स्टॉलची व्यवस्था केली जाते. यासाठी सामुहिक मंडप उभारला जातो. वीज, पाणी, राहण्याच्या सोयीसह अग्नीरोधक यंत्रणा प्रत्येक स्टॉलला दिली जाते. आपत्कालीन परिस्थितीत आग लागल्यास ती विझविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या अनुषंगाने बागायतदार गणेश देसाई यांनी अपेक्षा व्यक्त केली. महोत्सवामध्ये स्टॉलची संख्या मर्यादित म्हणजे २५ ते ३० पर्यंत असावी. शेतकऱ्यांची राहाण्याची अधिक चांगली हवी असे ते म्हणतात.

वीस वर्षांपासून सुरू असलेला व शेतकरी आणि ग्राहकांचे ऋणानुबंध निर्माण करणारा ‘पणन मंडळाचा आंबा महोत्सव हा लोकप्रिय ब्रँड’ निर्माण झाला आहे.
सुनील पवार कार्यकारी संचालक राज्य कृषी पणन मंडळ पुणे
पंधरा वर्षांपासून पुण्यासह सांगली व कोल्हापूर येथील आंबा महोत्सवात सहभागी होतो. बाजार समितीमधील हमाली, तोलाई, अडत या कोणत्याही बाबी द्याव्या लागत नाहीत. पुण्यातील महोत्सवात ५०० पेट्यांची विक्री केली.
गणेश प्रभाकर देसाई, मांजरे, ता.संगमेश्वर,जि.रत्नागिरी संपर्क - ९५५२८५३४२१
महोत्सवात आगाऊ ‘ऑर्डर्स’ नोंदविल्या जातात. त्यामुळे जलद विक्री होण्यास मदत होते.
सत्यवान लक्ष्मण थोटम, पूरळ हुर्शी, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग - ९८२३४९७१२१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com