एकत्रित कुटुंबाला मोठा आधार दुग्धव्यवसायाचा

परभणी जिल्ह्यातील पेडगाव (ता. जि. परभणी) येथील रहीमखान पठाण यांनी प्रतिकूल परिस्थितीतून सुमारे बावीस वर्षांपूर्वी दुग्धव्यवसाय सुरू केला. चिकाटी, कुटुंबाचा एकोपा जपत शेतीसोबत त्यात चांगला जम बसविला आहे. हॉटेल, किराणा दुकान आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करून कुटुंबाची अर्थव्यवस्था सक्षम केली आहे.
Buffalo Rearing
Buffalo Rearing Agrowon

परभणीपासून सुमारे १५ किलोमीटरवरील पेडगाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव व महसूल मंडळाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. परिसरातील गावांसाठी ते बाजारपेठेचे केंद्र आहे. या ठिकाणी दर रविवारी आठवडे बाजार भरतो. रहीमखान इब्राहिमखान पठाण (गव्हाळीवाले) यांचे सुमारे ११ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. कुटुंबाने २००० मध्ये मुऱ्हा जातीची वगार घेतली. तिचे संगोपन केले. सन २०१० पर्यंत लहान मोठ्या मिळून म्हशींची संख्या १० ते १२ पर्यंत तर आजमितीला ती २० ते २५ पर्यंत पोचली आहे. त्यात मुऱ्हा, जाफराबादी, मराठवाडी या जातींचा समावेश आहे. सुमारे ३० बाय १५ फूट जागेत मुक्त संचार पध्दतीचा गोठा उभारला आहे. त्याठिकाणी बोअरव्दारे पाण्याची सुविधा केली आहे. एकापाठोपाठ एक असे म्हशीच्या वेताचे चक्र सुरु राहते. त्यामुळे बारमाही दूध उत्पादन सुरु राहाते.

दुधाची थेट विक्री

आजच्या काळात शेतीत केवळ एका गोष्टीवर अवलंबून राहून चालत नाही.उत्पन्नाचे स्रोत वाढवावे लागतात. पठाण कुटुंबानेही तेच केले. दहा वर्षांपूर्वी गावातील मुख्य रस्त्यावर आठवडे बाजार मैदानाजवळ छोटे हॉटेल सुरु केले. दिवसाचे दोन्ही वेळचे मिळून ४० लिटर दूध संकलित होते.

त्यातील सुमारे १० ते १५ लिटर दूध हॉटेल कामासांठी लागते. संध्याकाळी सुमारे २० लिटर दुधाची थेट विक्री होते. दुधापासून महिन्याकाठी पाच किलोपर्यंत तूप तयार होते. प्रतिकिलो ८०० रुपये दराने त्याची विक्री होते. अनेक वर्षांपासून मेहनतीने व सचोटीने जपलेल्या या व्यवसायात दुधाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जात नाही. त्यामुळेच निश्‍चित ग्राहक तयार झाले आहेत. लिटरला ७० रुपये दराने विक्री होते. दररोज ८०० ते ९०० रुपयांपर्यंतचे उत्पन्न त्यातून जमा होते. गरजेनुसार अन्य शेतकऱ्यांकडूनही दुधाची खरेदी होते. आठवडे बाजाराच्या दिवशी २५ लिटर दुधाची गरज भासते. एवढ्यावर न थांबता हे कुटुंब उन्हाळ्यामध्ये फळांचा ज्यूस विक्री देखील करते. शिवाय घरामध्ये छोटे किराणा दुकानही सुरु केले आहे.

Dairy
Dairy Agrowon

दूध विक्री करताना चांदखान

चारा व्यवस्थापन

चाऱ्याची सोय घरच्या पाच एकरांतून होते. १५ एकर शेती बटईने केली आहे. तेथे सोयाबीन, हरभरा, ज्वारी आदी पिके घेतली जातात. दिवसा म्हशी शेतामध्ये चरावयास सोडण्यात येतात. त्यासाठी सालगडी ठेवला आहे. आहार, रोगप्रतिबंधक उपाययोजना, दुग्धोत्पादन यासाठी गावातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळते.

कुटुंबातील सर्वांनी उचलला भार

कुटुंब एकत्र असल्याचा फायदा शेतीत निश्‍चित होतो. पठाण यांच्याकडेही घरातील प्रत्येक सदस्याने कामांची जबाबदारी वाटून घेतली आहे. रहीमखान आणि पत्नी सुलतानाबी म्हशींच्या चारा काढणे, पाण्याची व्यवस्था, किराणा दुकान चालविणे, तर चांदखान दूध विक्री तसेच शेती कामांचे नियोजन पाहतात. हॉटेलची जबाबदारी युसूफखान यांच्याकडे आहे.

Dairy
Dairy Agrowon

दुग्धव्यवसायातील पठाण कुटुंबीय.

व्यवसायातून प्रगती

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत पठाण कुटुंबाने आपली आर्थिक प्रगती साधली आहे. त्याचे बहुतांश श्रेय ते दुग्धव्यवसायाला देतात. सुरवातीच्या काळात तुऱ्हाट्याच्या भिंती, लोखंडी पत्र्याचे छत अशा स्वरूपाचे घर होते. आता सिमेंटचे दोन मजली पक्क्या घराचे बांधकाम केले आहे. दोन मुलींची लग्न केली. शेतीत हंगामी सिंचनाची सुविधा आहे. खरिपात कापूस सोयाबीन तूर आदी पिके ते घेतात. रब्बी हंगामात संपूर्ण पाच एकर ज्वारी असते. महिन्याकाठी सुमारे तीन ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्याची विक्री न करता दरवर्षी घरच्या शेतात त्याचा वापर होतो. चांदखान यांनी सहा वर्षापूर्वी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आयोजित दुग्ध व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले आहे. आगामी काळात आधुनिकीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे. सुसज्ज गोठा उभारणी, कडबा कुट्टी, शीतकरण यंत्रणा आदींची सुविधा ते तयार करण्यात आहेत. दूध प्रक्रिया उद्योगासाठीही प्रयत्न सुरु आहेत.

रमजान ईदचा उत्साह

रमजान ईदच्या दिवशी दुधाची विक्री बंद असते. यादिवशी नातेवाईक तसेच मित्रमंडळींना शिरखुर्म्याचा स्वाद घेण्यासाठी घरी आवर्जून आमंत्रित करण्यात येते. एकमेकांना शुभेच्छा देत उत्साहाच्या वातावरणात ईद साजरी केली जाते. सुमारे ३० ते ३५ लिटर दूध शिरखुर्मा बनविण्यासाठी वापरले जाते. खारीक, खोबरे, मनुका, बदाम आदी सुकामेवा तसेच शुध्द तुपाचा वापर करून शिरखुर्मा तयार केला जातो.

रमजानसाठी गजबजते परभणीतील खवा मार्केट

परभणी येथील स्टेडियमजवळील मोकळ्या जागेत खवा मार्केट भरते. या ठिकाणी दररोज सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान खवा खरेदी विक्री व्यवहार होतात. परभणी तालुक्यातील विविध गावांतील दूध उत्पादक घरी खवा तयार करून येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी आणतात. रमजान ईदच्या निमित्ताने येथील व्यवहार सुमारे तीन पटीने तर दर शंभर ते दीडशे रुपयांनी वधारतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाला, बीड जिल्ह्यातील केज तसेच परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून खव्याची आवक होते. सणाच्या आधी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत तसेच त्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत खवा विक्री सुरु असते. ज्येष्ठ खवा व्यापारी गंगाधर उज्वलकर (पेढेवाले) म्हणाले स्थानिक परिसरातील गावांतील शेतकऱ्यांकडून दररोज ३ ते ४ क्विंटल तर अन्य जिल्ह्यातील पाच क्विंटलपर्यंत मिळून ७ ते ८ क्विंटल खव्याची विक्री होते. हीच विक्री रमजान सणानिमित्त दोन दिवसांत २० ते २५ क्विंटलपर्यंत होते. खव्याचे नियमित दर प्रति किलो २४० ते २८० रुपये असतात. रमजान सणावेळी ते ३५० ते ४०० रुपयांपर्यंत वधारतात. अनेक ग्राहक ठराविक रक्कम देऊन व्यापाऱ्यांकडे आगाऊ मागणी नोंदवितात.

शेतकरी अनुभव

धारणगाव (ता.परभणी) येथील शेतकरी बाळासाहेब डुकरे म्हणाले की म्हशीच्या दुधापासून तयार केलेला १० किलो खवा दररोज विक्रीस आणतो. प्रति किलो २७० ते २८० रुपयांपर्यंत दर मिळतात. हेच दर रमजान सणावेळी ३५० ते ४०० रुपये असतात. गाव (ता.परभणी ) येथील रामेश्वर साबळे म्हणाले की गायीच्या दुधापासून बनविलेल्या ५० किलो खव्याची खरेदी कुल्फी व्यावसायिक करतात. रमजानसाठी म्हशीच्या दुधाच्या खव्याला ग्राहकांची अधिक पसंती असते. ग्राहक मतीन काझी म्हणाले दुग्ध प्रक्रिया उद्योजक पंकज रुद्रवार म्हणाले की या सणासाठी दुधाला अधिक मागणी असते. त्यामुळे पनीर, पेढे आदी उत्पादनाची निर्मिती कमी करून दूधविक्रीवर अधिक भर असतो.

संपर्क- चांदखान पठाण- ९९७०८२०९५९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com