Jowar Crop variety : ज्वारीच्या तब्बल २५ हजार वाणांचा संग्रह

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वाशीम येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर १६ एकरांत ज्वारीच्या २५ हजार जननद्रव्ये (जर्मप्लास्म) अर्थात पीकवाणांचा खजिनाच यंदा रब्बीत फुलला. देशात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने असा प्रयोग झाला.
Jalgaon Jowar News
Jalgaon Jowar NewsAgrowon

पौष्टिक तृणधान्यांपैकी ज्वारी हे प्रमुख पीक आहे. महाराष्ट्र हे तर या पिकाचे कोठार मानले जाते. मागील काही वर्षात विविध कारणांमुळे ज्वारी किंवा मिलेटवर्गीय पिकांचे क्षेत्र कमी होत गेले.

पशुधनालाही त्याचा फटका बसला. आज मात्र आरोग्यदायी जीवनशैलीमुळे आहारात ज्वारीचे महत्त्व पुन्हा एकदा वाढले आहे. ज्वारीच्या विविध वाणांवर संशोधन सुरू आहे. वाढते आहे.

या काळात उत्पादकांना हवे असलेले चांगले वाण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने या जननद्रव्यांची लागवड एक दिशादर्शक पाऊल मानले जाऊ लागले आहे. प्रामुख्याने आज लुप्त झालेले वाण या प्रक्षेत्रावर बघायला मिळाले.

१६ एकरांत साकारला प्रयोग

विविध देशांतील ज्वारीच्या विविध प्रकारांचे वा वाणांचे (जननद्रव्ये- जर्मप्लास्म) संकलन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती जनुकीय स्रोत ब्युरो (National Bureau of Plant Genetic Resources- एनबीपीजीआर) येथे संकलित करण्यात आले आहेत. याच संस्थेची मदत घेऊन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वाशीम येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील यंदाच्या रब्बीत १६ एकरांत थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल २५ हजार पीकवाण प्रकारांची लागवड करण्यात आली. प्रत्येक वाणाच्या लागवडीसाठी दोन मीटर अंतर अशा २५ हजार ओळी करण्यात आल्या.

Jalgaon Jowar News
Jowar Harvesting : शिवारात रब्बी ज्वारी काढणीची लगबग वाढली

सोबत नियंत्रक वाण म्हणून प्रसारित केलेल्या पीकेव्ही क्रांती, सीएसव्ही २२, सीएसव्ही २९, सीएसव्ही १८, मालदांडी एम ३५-१, परभणी मोती आदींची निवड करण्यात आली. प्रक्षेत्रावर यंदाच्या रब्बीत विविध वाणांची रंगांची, उंचीची कणसे उमललेली पाहण्यास मिळाली.

अशा ठेवल्या आहेत नोंदी प्रत्येक वाणाच्या वेगवेगळ्या अवस्थेतील २६ नोंदी ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. यात सुरवातीचा जोम, पानांची व्यवस्था, संख्या, लांबी- रुंदी, ५० टक्के फुलोरा कालावधी, उंची, कणसाची ठेवण, दाण्यांचा रंग, संख्या, कणसातील दाणे, कडबा, परिपक्वता कालावधी आदी विविध नोंदींचा समावेश आहे.

या प्रयोगामुळे आगामी चार ते पाच वर्षात ज्वारी संशोधनाच्या कार्याला नवी दिशा मिळू शकेल असा संबंधित शास्त्रज्ञांना विश्‍वास आहे.

प्रयोगाचे महत्त्व

आज वातावरण बदलाचे व्यापक परिणाम शेती व पिकांवर दिसत आहेत. अशा काळात प्रतिकूल हवामान परिस्थितीत अन्य पिकांपेक्षा ज्वारी, बाजरी आदी पिके उत्पादनात सरस ठरतात. हलक्या ते भारी अशा सर्व प्रकारच्या जमिनीत तसेच दुष्काळी परिस्थितीत ती तग धरतात.

उष्णता, ताण सहन करण्याची क्षमता या पिकांमध्ये आहे. यंदा जगभरात ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये (मिलेटस) वर्ष’ साजरे होत असल्याने ज्वारी वाण संकलन प्रयोगाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

विविध देश तसेच भारतातील ज्वारीचे विविध वाण येथे लागवडीखाली आणल्याने एकत्रित अभ्यास या प्रकल्पातून होत आहे. वेगवेगळ्या पैदास पद्धती वापरून अधिक उत्पादन, अधिक गुणवत्ता व ताणांस अधिक प्रतिबंधक वाणांची निर्मिती करणे त्यातून शक्य होणार आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेसह (आयसीएआर) सह इक्रिसॅट, भारतीय तृणधान्य संशोधन संस्था (IIMR) हैदराबाद यांचेही सहकार्य प्रकल्पात मिळाले आहे. अलीकडेच म्हणजे १३ मार्च रोजी हा अभिनव प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी, शास्त्रज्ञ, अभ्यासक, विद्यार्थी, शेतकऱ्यांसाठी विशेष संधी विद्यापीठातर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती.

डॉ. . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. . शरद गडाख, संशोधन संचालक डॉ.. विलास खर्चे, शास्त्रज्ञ डॉ. आर. बी. घोराडे, डॉ. भरत गीते, एस. पी. गुठे तसेच ‘एनबीपीजीआर’ चे शास्त्रज्ञ डॉ. सुशील पांडे, डॉ. सुनील गोमासे आदी सर्वांचे एकत्रित प्रयत्न त्यासाठी लाभले आहेत.

‘जर्मप्लास्म’ संकलन प्रयोगातील ठळक बाबी

-सुमारे ५१ देशांतील विविध वाणांचे संकलन

- ६० ते ७० वर्षातील विविध वाणांची निवड

-ज्वारी दिनाला १२५ शास्त्रज्ञ, १५० विद्यार्थी व ३०० शेतकऱ्यांची उपस्थिती.

-शास्त्रज्ञांना पीकवाणांचा ‘डाटा’ ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार

-संकलनात गोड ज्वारी, एकेरी तसेच दुहेरी कापण्याची वैरण, हुरड्याची, लाह्यांसाठीची ज्वारी, खरिपाची दुहेरी धान्य व कडब्यासाठी, रब्बीसाठी ठोकळ मोत्यासारखे दाणे असणारी ज्वारी, वेगवेगळ्या रंगांची आदी विविध वाणांचा समावेश

संपर्क- डॉ. . आर. बी. घोराडे- ९८५०७२३७०६

Jalgaon Jowar News
Jowar Cultivation : ज्वारीच्या २५ हजार जननद्रव्यांची लागवड
सध्याच्या वातावरण बदलाच्या काळात प्रमुख पिकांची उत्पादन वाढीची पातळी स्थिर झाली आहे. महत्त्वाच्या पिकांत आनुवंशिक पाया (जेनेटिक बेस) विस्तारण्याची त्यामुळे गरज निर्माण झाली आहे. ज्वारीत २५ हजार जर्मप्लास्मची विविधता हा मुक्त खजिनाच आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने संशोधमसाठी शास्त्रज्ञांसाठी मोठी पर्वणीच उपलब्ध झाली आहे.
डॉ. शरद गडाख, कुलगुरू डॉ. . पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com