Goat Farming : उच्चशिक्षित तरुणाने उभारला ‘काष्टीवाला शेळीफार्म’

नगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील प्रतीक पाचपुते या अभियंता असलेल्या तरुणाने शेळीपालन व्यवसायात उडी घेतली. पाच शेळ्यांपासून सुरू केलेल्या व्यवसायाचा विस्तार पन्नास शेळ्यांपर्यत केला आहे. या शेतीपूरक व्यवसायातून चांगल्या आर्थिक उत्पन्नाबरोबरच मिळणाऱ्या लेंडीखतामध्ये शेतीची उत्पादकता वाढली आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

नगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) हे पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील गाव. शेळी (Goat), मेंढीसह (Sheep) अन्य पशुधनाचा बाजार (Livestock Market), राजकारण, समाजकारणातही अग्रेसर गाव ही त्याची ओळख. येथील प्रतीक पाचपुते यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी शेतीची ओढ त्यांना गावाकडे खुणावत होती. त्यांचे वडील प्रकाश, आई पद्मिनी, बंधू सागर आणि प्रशांत असे अकरा जणांचे एकत्रित कुटुंब. बंधू सागर हे शिक्षक असून, प्रशांत शेती करतात. वडिलोपार्जित २० एकर शेतीमध्ये उसासह गहू, कांदा अशी पिके घेतात. प्रतीकनेही शिक्षणानंतर शेळीपालनामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. (Goat Farming By Highly Educated Young Man)

Goat Farming
नवजात वासराच्या जन्मानंतर या गोष्टींचे पालन करा! | Care of New Born Cow Calf | ॲग्रोवन

पाच शेळ्यापासून सुरवात

- गावांतच शेळ्या-मेंढ्याचा बाजार भरत असल्याने विक्रीची अडचण भासणार नाही, या उद्देशाने शेळीपालनाला त्यांनी प्राधान्य दिले.

- आठ वर्षापासून ॲग्रोवनचे वाचक असून, त्यातील शेळीपालनाविषयीचे सर्व लेख प्रतीक यांनी संग्रहित केले आहेत. सुरवातीच्या काळात ॲग्रोवन त्यांचा मार्गदर्शक ठरला. त्यातून शेळीपालनासाठी शेळ्यांची जात व अन्य बाबी समजून नियोजन केले.

- सहा वर्षापूर्वी पाच उस्मानाबादी शेळ्यांची काष्टी बाजारातून खरेदी करून व्यवसायाला सुरवात.

- त्यानंतर पंचवीस हजार रुपये किमतीचा बीटल जातीचा बोकड साताऱ्यातून, तर सोजत जातीचा नर राजस्थानातून पंधरा हजार रुपयाला विकत आणला.

- देशी उस्मानाबादी शेळ्यांसोबत संकर करून शेळ्यांचे उत्पादन केले. वर्षाला २५ शेळ्यांची पिले मिळू लागली.

- त्यातील केवळ बोकडांची विक्री केली. शेळ्या न विकता व्यवसायाचा विस्तार करत राहिल्यामुळे आज प्रतीक यांच्याकडे २५ बिटल, पंचवीस सोजत, ५ उस्मानाबादी शेळ्या आणि पंचवीसपेक्षा अधिक पिले आहेत.

-प्रतीक यांनी आपल्या शेळीपालन व्यवसायाला ‘काष्टीवाला शेळीफार्म’ हे नाव दिले आहे.

Goat Farming
शेळी पालन व्यवसायाला मिळणार चालना; राज्य सरकार राबवणार समूह शेळी योजना 

व्यवस्थापन

- प्रथम घराजवळील छोट्या शेडमध्येच शेळीपालन सुरु केले. आता एक एकर क्षेत्र त्यांनी शेळीपालनाला दिले आहे. या क्षेत्रामध्येच तीन वर्षापूर्वी साधारण दहा गुंठे क्षेत्रावर शेड उभारले. त्यासाठी ८ लाख रुपये खर्च झाला. उर्वरित मोकळ्या जागेला संरक्षण जाळी बसवली आहे.

- एकाच ठिकाणी शेळ्यांची गर्दी टाळण्यासाठी शेडमध्ये जात, वय यानुसार वेगवेगळे आठ कप्पे केले आहेत. त्यामुळे शेळ्या, पिलांना वावरण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होते.

- चारा व्यवस्थापनामध्ये सकाळी सात वाजता प्रति शेळी अर्धा किलो पशुखाद्य देतात. सकाळी दहा वाजता कोरडा चारा, तर सायंकाळी चार वाजता हिरवा चारा देतात. कोरड्या चाऱ्यात मका, हरभऱ्याचा भुस्सा तर हिरव्या चाऱ्यात मेथीघास, सुभाबळीच्या चाऱ्याचा समावेश असतो. सध्या दीड एकरमध्ये सुबाभूळ, दहा गुंठ्यावर मेथीघास आहे. चाऱ्यासाठीच नव्याने एक एकरावर शेवगा लागवड करायचे नियोजन आहे.

- कोरड्या चाऱ्यासाठी हरभऱ्याचा भुस्सा वर्षासाठी साधारण बारा टन लागतो. ते व्यापाऱ्यांकडून खरेदी करतात.

- शेळ्यांना प्रामुख्याने सहा महिन्याला पीपीआर, ईटी व एफएमडी याचे लसीकरण करतात. शेळीपालन व्यवस्थापन व इतर बाबीसाठी

एका मजूर कायमस्वरूपी नियुक्त केलेला आहे. आवश्यकतेनुसार कुटुंबातील सदस्यांचाही सहभाग असतो.

बेण्यासाठी बोकडाची अधिक विक्री

- सोजत, बिटल जातीच्या बोकडाचे तीन महिन्यात १५ ते २० किलोपर्यंत वजन वाढते. त्यानंतर बोकडांची विक्री केली जाते. अनेक शेतकरी पुनरुत्पादनासाठी त्यांच्याकडून जागेवरून बोकडाची खरेदी करतात. त्यामुळे वय, वाढ, उंची, रंग यावर बोकडाची किंमत ठरते. बिटल जातीच्या बोकडाला साधारण १५ ते २५ हजार रुपये, तर सोजत जातीच्या बोकडाला ७ ते १५ हजार रुपये मिळतात.

-गावातील बाजारामध्येही बोकडांना नियमित मागणी असते. बकरी ईदच्या काळातही जास्तीत जास्त बोकड बाजारात आणण्याचे त्यांचे नियोजन असते. वर्षभरात साधारण ४० बोकडापर्यंत विक्री करतात. त्यासाठी सामाजिक माध्यमांचाही चांगला फायदा होत असल्याचे प्रतीक सांगतात.

-शेळीपालनात यश मिळू लागल्यामुळे आता मेंढीपालनाचे नियोजन करत आहे. त्यासाठी प्रथम २० मेंढ्या पाळणार असून, दहा गुंठे क्षेत्रावर शेड उभारणीचे नियोजन आहे.

खताच्या खर्चात बचत

प्रतीक यांनी सुरु केलेल्या शेळीपालनामुळे शेतीसाठी वर्षभरात पाच टनापर्यंत लेंडीखत उपलब्ध होते. त्यामुळे उसासह अन्य पिकांच्या खत खर्चात सुमारे तीस टक्के बचत होत आहे. त्याच प्रमाणे पीक उत्पादनातही नेहमीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्याने वाढ मिळत असल्याचा पाचपुते कुटुंबाचा अनुभव आहे.

पंजाबात गाई, म्हशी, शेळीपालनाला अधिक प्राधान्य देतात. तेथील शेळ्यांचे वजनही वेगाने वाढते. आपल्याकडे आजही या पूरक उद्योगाकडे शेतकरी फारसे लक्ष देत नाहीत. उस्मानाबादी, संगमनेरी शेळीशिवाय अन्य नव्या जातींच्या बाबतीत अधिक संशोधन होणे गरजेचे वाटते. कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता शेळीपालनात नक्कीच आहे.
प्रतीक पाचपुते, ७०५८१००८२१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com