हरितकरणासाठी ‘आपलं पर्यावरण’ची साथ

नाशिक शहरातील ‘आपलं पर्यावरण’ ही स्वयंसेवी संस्था चळवळ लोकसहभागातून उभी राहिली आहे. ही संस्था गेल्या दशकापासून वृक्ष लागवडीसह पर्यावरण संवर्धनात कार्यरत आहे. नाशिक शहराच्या परिसरातील पडीक ९० एकर क्षेत्रावर वृक्षारोपणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पर्यावरण संवर्धन आणि विस्ताराला संस्थेने गती दिली आहे.
हरितकरणासाठी ‘आपलं पर्यावरण’ची साथ
Tree PlantationAgrowon

नाशिक शहरात अभियंता असलेले शेखर गायकवाड हे गेल्या २५ वर्षांपासून वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यात सहभागी आहेत. शालेय जीवनापासून झाडांना पाणी देणे, नागरी वसाहतीमध्ये खड्डे खोदून स्वखर्चातून रोप लागवड, असा सकाळी सहा वाजेपासून त्यांचा दिनक्रम. त्यांच्या या उपक्रमात पुढे मित्रमंडळी आणि पर्यावरणप्रेमी जोडले गेले. व्यक्तिगत स्वरूपातील चळवळ पुढे संस्थात्मक झाली. दुर्मिळ देशी प्रजातीच्या वृक्षांचे बियाणे संकलन आणि रोपांची उपलब्धता हा कामकाजाचा भाग बनला. हे काम सर्वांना आपलं वाटावे म्हणून २४ फेब्रुवारी, २०१६ रोजी‘ आपलं पर्यावरण’ या नावे संस्थेची नोंदणी झाली. नाशिकसह मुंबई, पुणे, ठाणे यासह अमेरिका आणि इंग्लंडमधून अनेकजण संस्थेसोबत जोडले आहेत.

वन महोत्सवाची आदर्श संकल्पना

नाशिक शहराच्या पश्चिम भागात सातपूर येथील फाशीच्या डोंगरावर गिरीपुष्पांची एकसुरी लागवड होती; त्यामुळे येथील जैवविविधता संपली होती. परिणामी पशुपक्ष्यांचा अधिवास नव्हता. येथे देशी आणि प्रदेशनिष्ठ वृक्ष लागवडीसाठी गायकवाड यांनी वन विभागाकडे पाठपुरावा केला. अखेर ७ एप्रिल, २०१५ रोजी तत्कालीन मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांच्याकडून वृक्ष लागवडीला परवानगी मिळाली. ध्येयाने पछाडून त्यांनी येथे दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला; हे मात्र आव्हानच होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वानुमते ५ जून, २०१५ रोजी वनमहोत्सव साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठी १५ लाखांचा खर्च होता. अनेक दानशूर व्यक्ती, संस्था पुढे सरसावल्या. त्यावेळी ‘क्रेडाई’ने संरक्षक भिंतीसाठी मदत केली. या उपक्रमात हजारो नाशिककर सहभागी झाल्याने वृक्षलागवडीचे उद्दिष्ट एका दिवसात पूर्ण झाले. नागरिकांनी स्वतः खड्डे करून निर्धारित संस्थेपेक्षा अधिकची एक हजार झाडे त्याच दिवशी लावली. त्यामुळे एका दिवसात ११ हजार वृक्ष लागवड झाली. या डोंगरात चांगली वृक्षराजी झाल्याने पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा सुरू झाला. विविध कीटक, फुलपाखरे व विविध पशुपक्षी येथे दिसू लागले आहेत.

वनीकरणाची चळवळ ः

-५ जून २०१५...देवराईची स्थापना-११ हजार रोपांची लागवड

-५ जून २०१६... वनराईची स्थापना -६ हजार रोपांची लागवड

-५ जून २०१७..देवराईमध्ये ११ हजार झाडांचा दुसरा वाढदिवस साजरा

-५ जून २०१८...देवराईमध्ये मदतनिधीतून बाबा सानप यांच्या नावे दुर्मिळ वेलींची लागवड

-५ जून २०१९... वनराईमध्ये ६ हजार झाडांचा वाढदिवस आणि ५०० झुडपाची लागवड

-५ जून २०२०... देवराईमध्ये लोकसहभागातून ८०० विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड

-५ जून २०२१...देवराईमध्ये लोकसहभागातून २ हजार ३०० रोपांची लागवड

कामकाज दृष्टीक्षेपात:

-देवराई(सातपूर) आणि वनराई (म्हसरूळ) मध्ये २२० देशी वृक्ष प्रजातींच्या ३२ हजार झाडांची ९० एकरामध्ये लागवड.

-४८ प्रकारच्या १ हजार वेलींची लागवड

-४५ प्रकारच्या ५०० झुडपांची लागवड

-२७ प्रकारच्या २५० कंदमुळांची लागवड

-देवराई आणि वनराईचा महिन्याचा संगोपन खर्च ८० हजार रुपये

-सिंचनासाठी पाणी वितरण व्यवस्था

-वणवे रोखण्यासाठी विशेष काळजी

देशी प्रजातीवर भर ः

वनीकरणामध्ये पाण्याच्या शाश्वत सोयीसाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून वनराईमध्ये एक कोटी लिटर क्षमतेचा सिमेंट बंधारा बांधला आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांचा वावर वाढला. “आज काटेरी झाडं शहरात दिसतच नाही. बाभूळ,बोर ही झाडं कुणी लावत नाही. मग पक्ष्यांनी बसायचे कुठे? त्यामुळे झाडे लावताना फुलपाखरू,वटवाघळ,मधमाशा तसेच पशुपक्ष्यांना पूरक ठरतील अशी झाडं लावण्याचे ठरवले. वड,उंबर,पिंपळ,चिंच,कडुनिंब,आंबा तेथे आहेच; पण पापडा, विलायती चिंच, बोर, काळा कुडा, कळम, सोनसावर, बाभूळ, ताम्हण, फणशी, चेरी, बूच, वड, पिंपळ, उंबर, पायर, पांगारा, सीता अशोक, तूती, बकुळ, अर्जुन, शिवण, जांभूळ, बेहडा, आवळा, सुरु, रिठा, काटे सावर, बहावा, वरस, पांढरा कुडा, सळई, सातवीन, नीम, जंगली बदाम,करंज, शंकासूर, रान जाई, कृष्ण कमळ, शिंदी, करवंद, चिलार अशी विविध प्रकारची झाडे तर मालकांगणी, माधवी लता, वेली बांबू, सप्तरंगी, शतावरी, मोरवेल, मासतोडी, कांचनवेल, पळसवेल आदी वेली येथे आहेत,असे शेखर गायकवाड सांगतात

फक्त जंगल हिरवे नकोच...

पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड न केल्यास अनेक ठिकाणी ‘ग्रीन डेझर्ट' (हिरवे वाळवंट) तयार होत आहे.त्यामुळे त्याचा उपयोग पशू-पक्ष्यांनाही होत नाही. त्यातून पर्यावरण संतुलनही राहात नाही. त्यामुळे वृक्षारोपण करताना शास्त्रशुद्ध,निसर्गाभिमूख आणि पर्यावरणपूरक ठेवण्याचा प्रयत्न होतो. त्यास लोकांची साथ मिळाली आहे. आगामी काळात बांबू शेतीला चालना देण्यासाठी ५ जून, २०२२ रोजी ३० प्रकारच्या १५०० बांबू लागवडीस प्राधान्य दिले जात आहे. याठिकाणी बांबू पिकातील व्यावसायिक संधीबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात येते.

संस्थेची राज्यभरात ओळख

आपलं पर्यावरण संस्थेच्या कामास डॉ.प्रकाश आमटे, राज ठाकरे, अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह राज्यभरातील अभ्यासकांनी भेटी दिल्या आहे. या चळवळीच्या माध्यमातून आजअखेर हजारो लोक जोडले गेले, तर शेकडो कार्यकर्ते पर्यावरण चळवळीचा भाग बनले. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संस्थेचा वन खात्याच्या वतीने विशेष सन्मान केला. तसेच अनेक पुरस्कारांनी संस्थेचा सन्मान झाला आहे.

साजरा होतो झाडांचा वाढदिवस

लोकांनी झाडे लावली अन जगविलीसुद्धा, त्यामुळे या झाडांचा दरवर्षी वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा केला जातो. वाढदिवशी झाडांना कंपोष्ट खत, गांडूळ खत व अमृतपाणी दिले जाते. झाडांभोवती फुलांची रांगोळी काढून दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. अनेकजण मुलांचे वाढदिवस, प्रिय जणांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे तन, मन, धनाने मदत करतात.

७५ प्रकारच्या कुमुदिनी, वॉटर लिलींचा संग्रह

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘नाशिक वनराई’ येथे कुमुदिनी आणि वॉटर लिलींचा संग्रह उभा राहिला आहे. जागतिक वसुंधरा दिनी (२२ एप्रिल) या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कुंडामध्ये ७५ वेगवेगळ्या कुमुदिनी आणि वॉटर लिली बहरल्या आहेत. कुमुदिनीचे महत्त्व आणि व्यावसायिक संधीबाबत मार्गदर्शनासाठी माहिती केंद्र उभारले आहे. या उपक्रमाला अनेक व्यक्ती, संस्था, व्यावसायिक, उद्योजक आणि मित्र परिवारांनी देणगी दिली आहे.

पर्यावरणपूरक विविध उपक्रम:

-गणेशोत्सव काळात विसर्जन न करता मूर्ती संकलन व निर्माल्य संकलन.

-चिमण्यांच्या १७ हजार घरट्यांचे वाटप.

-जखमी पक्ष्यांसाठी औषधोपचार.

-मृद् व जलसंधारण कार्याबाबत सातत्याने जनजागृती.

-वृक्ष परिचय केंद्राची स्थापना करून देशी प्रजातींच्या झाडांची माहिती व लागवड पद्धतीचा प्रचार.

-उद्याने, वसाहती, नदी सौंदर्य वाढविण्यासाठी झाडांची निवड करून वृक्षारोपण.

-निसर्ग सांभाळताना रोजगार संधीसाठी मार्गदर्शन.

वेली, झुडूप व झाडांचे विविध प्रकार

लागवड ठिकाण...वेली...झुडूप...देशी व प्रदेशनिष्ठ झाडे

देवराई...५५ एकर...५२...४५...२२०

वनराई...३५ एकर...००...४५...६५

--------------------

संपर्क: शेखर गायकवाड,९४२२२६७८०१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com