Vegetable : अभ्यासातून प्रगत केली भाजीपाला शेती

प्रत्येक अनुभवी तज्ज्ञाकडून शिकण्याची, ज्ञान घेण्याची वृत्ती, शास्त्रीय व्यवस्थापन आणि बाजारपेठांची गणिते या जोरावर भूड (जि. सांगली) येथील राहुल कदम यांनी भाजीपाला शेतीवर पकड मिळवली आहे. आर्थिक दृष्ट्या किफायतशीर उत्पादन व सर्वोत्तम दर्जा या सूत्रांवर भर देत अभ्यासू व यशस्वी शेतकरी अशी ओळख तयार केली आहे.
Vegetable
VegetableAgrowon

सांगली जिल्ह्यात खानापूर हा दुष्काळी तालुका आहे. प्रतिकूलतेवर दुष्काळी परिस्थितीवर मात करून, शेततळी (Farm Pond) बांधून पाण्याची शाश्‍वती (Sustainable Water Source) तयार करून इथला शेतकरी दर्जेदार द्राक्षांची (Quality Grape Export) सातासमुद्रापार निर्यात करीत आहे. तालुक्यातील भूड येथील राहुल कदम यांनी भाजीपाला शेतीत (Vegetable Farming) स्वतःची ओळख तयार केली आहे. वकिलीचे शिक्षण घेतलेले वडील मुंबईत कंपनीत नोकरी करायचे. सन १९८३ नंतर ते गावी परतले. सन १९८४ मध्ये द्राक्ष (Grape Cultivation) लागवडीद्वारे शेतीत रमले. पाण्याची कमतरता असल्याने विहीर घेतली. जेमतेम पाणी लागले. तरीही योग्य नियोजन करून द्राक्ष शेती फुलवली. सन २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर शेतीची जबाबदारी राहुल यांच्यावर आली.

Vegetable
Vegetable : बारमाही भाजीपाला उत्पादन पद्धतीतून उंचावले अर्थकारण

राहुल यांची सकारात्मक शेती

राहुल यांनी बी.ए. चे शिक्षण घेतले आहे. अन्न तंत्रज्ञान व आयात-निर्यात विषयातील अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले. सुरुवातीला शेतीबाबत ते फार सकारात्मक नव्हते. त्यामुळे शेतीत बदल करण्यासही ते उत्सुक नव्हते. मात्र भाजीपाला शेतीतील तज्ज्ञ मित्र संजय काटकर यांनी मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. मी सांगतो तशी शेती सुरू कर. फायदा झाला तर तुझा, तोटा झाला तर तेवढी रक्कम तुला देतो असे त्यांनी सांगितले. भाजीपाला शेती सुरू झाली. हळूहळू त्यातील गोडी वाढू लागली. अभ्यास, अनुभव वाढू लागला. यश मिळू लागले. मग क्षेत्र वाढवण्यापर्यंत मजल गेली. सन २०१७ मध्ये काकांची शेती भाडेतत्त्वावर कसण्यासाठी घेतली.

...अशी आहे राहुल यांची शेती

पूर्वी नेहमीच पाण्यापासून वंचित राहिलेला हा भाग होता. परंतु सन २०१८ च्या दरम्यान टेंभू योजनेचा पाचवा टप्पा कार्यान्वित झाला. शेताच्या बांधावर बंदिस्त पाइपलाइद्वारे पाणी आले. शाश्‍वत पाण्याची सोय झाली. भाजीपाला शेतीचे क्षेत्र मनाप्रमाणे वाढवता आले. एकूण शेती १० एकर असून भाडेतत्वावर घेतलेली शेती १५ एकर आहे. उन्हाळ्यात (सुमारे ५ एकर) व ऑगस्ट (३ ते ४ एकर) असा दोन हंगामांत दरवर्षी भाजीपाला शेती असते. ढोबळी मिरची, कारले (३ एकर) व टोमॅटो ही मुख्य पिके असतात.

Vegetable
भाजीपाला पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन

शेतीची वैशिष्ट्ये ः

-फेब्रुवारी, मार्च व एप्रिल अशी टोमॅटोची टप्प्याटप्प्याने लागवड. त्यामुळे उत्पादन सातत्याने हाती येत राहते. एखाद्या काळात दर मनासारखा न राहिल्यास पुढील काळात तो चांगला मिळतो.

-एकरी किमान किती उत्पादन घ्यायचे तर आर्थिकदृष्ट्या पीक परवडेल याचे गणित करून तेवढे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करायचा. उदा. टोमॅटो एकरी ५० टन व ढोबळी मिरचीचेही तेवढेच उत्पादन घेतात. कारल्याचे १५ ते २० टनांपर्यंत उत्पादन घेतात.

-शेतीमालाचा दर्जा सर्वोत्तम ठेवायचा. जेणे करून दर चांगले हाती लागतील. प्रत्येकवेळी प्रतवारी करूनच विक्री करतात.

- गादीवाफा, ठिबक व पॉली मल्चिंग यांचा वापर.

-बाजारात जे वाण चालतात तसेच टिकवणक्षमता चांगली, दूरच्या

वाहतुकीस चांगले अशी वैशिष्ट्ये पाहून वाणांची निवड. उदा. देशी छोट्या कारल्याची निवड करतात. स्वाद चांगला व आकार लहान

असल्याने ग्राहकाने पाव किलो घेतले तरी जास्तीत जास्त माल बसतो. त्याला किमान ३० रुपये प्रति किलो दर मिळतो.

-दोन विहिरी, बंधारा, पाच कूपनलिका, शेततळे अशी एकूण सुमारे दोन कोटी लिटर इतक्या पाण्याची साठवणूक करता येते. त्यामुळे पाणीटंचाई भासत नाही.

- घरी देशी गायी आहेत. दोन वर्षांतून एकदा एकरी सहा ट्रेलर प्रमाणे शेणखताचा वापर. शिवाय शेणस्लरी, गांडूळ खत, पोल्ट्रीखत यांचाही वापर.

मार्केट व विक्री व्यवस्था

श्री रेवणसिद्ध भाजीपाला संघ तीस वर्षांपासून शेतकऱ्यांना एकत्र घेऊन भाजीपाला पिकविणे आणि विक्री करणे यासाठी मदत करतो. या संघाशी जोडले गेल्याचा राहुल यांना चांगला फायदा होतो. प्रामुख्याने मुंबई बाजारपेठेत विक्री होते. सांगली, कोल्हापूर बाजारपेठांचा पर्याय देखील असतोच. दिल्लीकडील व्यापारी देखील जागेवरून खरेदी करतात. उत्तरेकडे ढोबळी, टोमॅटो यांनाही चांगली मागणी असते. व्यापाऱ्यांसोबत मित्रत्वाचे नाते जपले आहे. त्यामुळे आवक व दर यांची दररोज माहिती मिळते.

दर्जा व सातत्य महत्त्वाचे

राहुल सांगतात की केवळ भाजीपाला लागवड करून विक्री झाली म्हणजे सगळे झाले असे होत नाही. बाजारपेठेत फिरणे, दर, आवक यांचा अभ्यास करणे गरजेचे राहते. बाजारपेठ म्हटलं की तेजी-मंदी आलीच. मालाबरोबर आपले नावही जोडलेले असते. ते व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी तुमच्या मालाचा दर्जा उत्तम हवा. सातत्य असल्याने मंदीतही पैसे होतात हा अनुभव आला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान कमी होते असे राहुल सांगतात.

ज्ञानातून प्रगती

भाजीपाल्याचे विविध नवे वाण बाजारात येत आहेत. त्याची माहिती घरात बसून मिळत नाही. त्यामुळे गटाच्या माध्यमातून कृषी प्रदर्शने, राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांकडील प्लॉट, कृषी विद्यापीठे अशा ठिकाणी वेळोवेळी जाऊन भेटी देतात. कोणतेही नवे वाण वा कीडनाशक आले की गटातील कोणीतरी त्याची चाचणी करून पाहतो. त्यावरून इतरांनी वापर करायचा की नाही ते निश्‍चित होते. कंपन्यांचे पीक प्रात्यक्षिकेही अभ्यासली जातात.

राहुल कदम, ८२७५०५७६१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com