Agri Tourism Business : विदर्भात दिली कृषी पर्यटन व्यवसायाला चालना

विदर्भात कृषी पर्यटन संस्कृती वाढविण्याबरोबर पर्यटकांना आकर्षित करीत व्यवसायाला चालना देताना कोरडवाहू शेतीत उत्पन्नाचा स्रोत अमोल व पवन या साठे बंधूंनी निर्माण केला आहे.
Agritourism Business
Agritourism BusinessAgrowon

पश्‍चिम- दक्षिण महाराष्ट्र, कोकणात कृषी पर्यटन केंद्राची (Agri Tourism) संकल्पना चांगली रुजली आहे. विदर्भात त्या तुलनेत व्यवसाय (Agritourism Business) विकसित झालेला नाही.

वैरागड (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील अमोल व पवन या साठे बंधूंनी मात्र नऊ वर्षांच्या अथक मेहनतीतून ही संकल्पना आपल्या १७ एकरांत प्रत्यक्षात आणली आहे.

पर्यटन केंद्राची संकल्पना

संयुक्त साठे कुटुंबाची ६८ एकर शेती आहे. पण ती पावसाच्या पाण्यावर असल्याने उत्पन्नाचा स्रोत अत्यंत मर्यादित होता. जंगलपरिसर असल्याने वन्यजीवांच्या त्रासामुळे अन्य प्रयोग झाले नाहीत.

कुटुंबातील अमोल शिवभक्त आहेत. ते पाच वर्षे सरपंचही होते. राज्यातील विविध गडकिल्‍ल्यांना भेटी, गड संवर्धन यात ते हिरिरीने सहभागी होतात.

या निमित्ताने पश्‍चिम महाराष्ट्रात विकसित कृषी पर्यटन केंद्रे पाहण्यात आली. विदर्भातील कोरडवाहू भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने पर्यटन व्यवसाय ही चांगली संधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कोकणाची अमोल यांना विशेष आवड आहे. तेथे जाऊन वास्तव्य शक्य नाही. पण आपल्याच शेतात कोकण उभे करणे शक्य असल्याचे त्यांना जाणवले. प्रतिकूलतेचे कायम रडगाणे गात बसण्यापेक्षा त्याचे संधीत रूपांतर करण्याचे साठे यांनी ठरवले.

प्रयत्नांतून संकल्पना आली प्रत्यक्षात

दंडकारण्याचा मूळ भाग आणि ज्ञानगंगा अभयारण्याला लागून मोहाडी घाट परिसरात व चिखली- खामगाव मार्गावर साठे यांनी सह्याद्री पर्यटन केंद्राची (Sahyadri Agro Tourism) उभारणी केली आहे.

त्यासाठी आपल्या भागातील नैसर्गिक स्रोत, भौगौलिकता, आजूबाजूची ठिकाणे आदींचा अभ्यास केला. काही वर्षांपूर्वी इथल्या शेतातून मोठ्या पुराचे पाणी वाहिल्याने सुपीक माती वाहून गेली.

Agritourism Business
Organic Farming : औटी परिवाराने उभारले झिरो बजेट कृषी पर्यटन केंद्र

दगड येऊन पडले. शेती करणे अडचणीचे झाले. पर्यटन केंद्रासाठी हीच संधी चालून आली. डोंगराच्या कुशीत ठिकाण असल्याने विविध नैसर्गिक साधने आपोआप मिळाली.

काही वृक्ष होते. शिवाय टप्प्याटप्याने उजाड माळरानावर नारळ, बांबू, चंदन व अन्य वृक्षलागवड झाली. त्यातून दाट वनराई व कोकणासारखा निसर्ग उभा झाला.

पक्षांचा किलबिलाट सुरू झाला. परिसराचा कायापालट झाला. अलीकडेच या केंद्राला महाराष्ट्र कृषी पर्यटन संचालनालयाकडून (एमटीडीसी) मान्यताही मिळाली आहे.

पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी नव्या उद्योगाची संधीच या रूपाने तयार झाली. स्थानिकांना रोजगारनिर्मिती देखील त्यातून झाली आहे.

खामगाव-जालना मार्गाला लागून केंद्र असल्याने स्थानिक खाद्यपदार्थ, कलावस्तू शहरी नागरिकांपर्यंत पोहोचवणे व विक्री करणे शक्य झाले आहे.

पर्यटकांसाठी महत्त्वाचे ठिकाण

येथून लगत ज्ञानगंगा अभयारण्य व जंगलसफारीची सोय (२० किलोमीटर) आहे. संतनगरी शेगाव येथील गजानन महाराज समाधिस्थळ, जागतिक कीर्तीचे लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान, तीर्थ पेनटाकळी प्रकल्प, नांदूरा येथील १०५ फूट उंच हनुमान मूर्ती, तसेच अन्य प्रसिद्ध धार्मिक स्थळे केंद्रापासून ५० ते १०० किलोमीटर परिसरात आहेत.

त्यामुळे या भागात पर्यटकांची रेलचेल असते. परदेशातून विशेषतः इटलीतील काही पर्यटक अजिंठा- वेरूळला जाताना आवर्जून ‘सह्याद्री’ला भेट देतात. भारतीय कृषी संस्कृती आणि ग्रामीण जीवन समजून घेतात.

केंद्राला प्रतिसाद

केंद्र व्यवस्थित सुरू होऊन दोन वर्षे झाली आहेत. प्रति आठवडा ५० ते ६० ग्राहक अशी संख्या आहे. सुट्ट्या व सणांच्या कालावधीत ही संख्या चांगली वाढते.

कोकणातील हापूस आंबा व तांदूळ यांचीही थेट विक्री येथे होते. कंपन्यांचे ‘सेमिनार’ होऊ लागले आहेत. परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी वाहन सुविधाही उपलब्ध करण्याचा मानस आहे.

Agritourism Business
Organic Farming : औटी परिवाराने उभारले झिरो बजेट कृषी पर्यटन केंद्र

‘सह्याद्री’तील सुविधा

१) कुटुंबासह किंवा गटांसह राहण्याची निवासी व्यवस्था तयार होत आहे.

२) चहा, नाश्‍ता, वैदर्भीय खास जेवणाची सोय (मिरच्यांची भाजी, गुळाचा शिरा आदी)

३) मुलांसाठी खेळणी

४) ओढा, नाले व धबधबा

५) विविध फळे- फुलझाडे

६) ‘कराओके’ संगीत मैफल

७) केंद्रात किल्ला प्रतिकृती, त्याचे निरीक्षण. शिवकालीन शस्त्रास्त्रे व प्रात्यक्षिके. उदा. दांडपट्टा, तलवार, भाला, लाठीकाठी. वडिलोपार्जित ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा साठे यांचा प्रयत्न.

७) प्राणी-पक्षी (उदा. प्राणी-पक्षी निरीक्षण) (ज्ञानगंगा अभयारण्य नजीक)

८) झुलता पूल, मचाण, बंगई- झोके

९) बैलगाडी सफर

१०) तानाजी कडा- (रोप क्लाइंबिंग)

११) लाल चिऱ्यातील कोकणी पद्धतीचे घर

१२) मिडो ऑर्चर्ड पद्धतीने सीताफळ, पेरू बाग.

१३) ग्रामीण जीवनानुभव देणाऱ्या वस्तूंचा संग्रह (जाते, पाटा, वरवंटा, चूल)

१४) शेणाने सारवलेल्या खोल्यांमध्ये पारंपरिक जीवनाचा अनुभव

संपर्क ः पवन साठे, ९८५११६६९३५, अमोल साठे, ९३७३००७१४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com