‘आयटी’ मित्रांची शेती व्यवस्थापन कंपनी

तुमची शेती आमच्यावर सोपवा, आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर ती पिकवून देतो. कंपनी स्थापन करून शेती व्यवस्थापनाचा व हमखास उत्पन्नाचा पॅटर्न अशा प्रकारे ‘आयटी’ क्षेत्रातील तीन युवकांनी तयार केला आहे.
Agriculture is managed by using satellites, mobile apps etc. and data separation.
Agriculture is managed by using satellites, mobile apps etc. and data separation.

तुमची शेती आमच्यावर सोपवा, आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर ती पिकवून देतो. कंपनी स्थापन करून शेती व्यवस्थापनाचा व हमखास उत्पन्नाचा पॅटर्न अशा प्रकारे ‘आयटी’ क्षेत्रातील तीन युवकांनी तयार केला आहे. विदर्भातील दुर्गम मेळघाटातील गावांत सोयाबीन, तूर, हरभरा आदी पिकांत ही शेती सुरू झाली असून, यंदा ११० एकरांपर्यंत सोयाबीन, तुरीचे क्षेत्र विस्तारले आहे.  अनिल देवकर, हेमंत जयस्वाल व परिक्षित बारापात्रे हे सुमारे ३५ वर्षे वयाच्या आसपास असलेले तीन घनिष्ठ मित्र आहेत. नांदेड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी ‘आयटी’ क्षेत्रात इंजिनिअरिंग केले. सध्या परिक्षीत इंग्लंड येथे आहे. अनिल आणि हेमंत पुणे येथील नामांकित आयटी कंपनीत नोकरीत आहेत. सध्या दोघे आपापल्या गावी ‘वर्क फ्रॉम होम’ आहेत. तिघा ‘आयटीएन्स’नी ‘क्रॉफीसीयेनट अ‍ॅग्रोटेक’ या कंपनीची सुमारे दीड वर्षापूर्वी स्थापना केली आहे. हा स्टार्ट अप म्हणता येईल. प्रायोगिक तत्त्वावर विदर्भात दुर्गम मेळघाटात तंत्रज्ञानाआधारे शेती केली जात आहे. त्याबाबत हेमंत म्हणाले, की अमरावती जिल्ह्यातील बिया हे माझे गाव आहे. कोरोना काळात तेथूनच सध्या मी कार्यरत आहे. आम्ही शेतकऱ्यांची शेती कसायला घेतो. तंत्रज्ञान आमचे वापरतो. पाच ॲग्रॉनॉमीस्ट व पाच कामगार आहेत.   ...अशी होते शेती  पहिल्या म्हणजे मागील वर्षी १५ एकरांवर सोयाबीन शेती कसण्यास घेतली. यातील व्यवस्थापन म्हणजे सुरुवातीला मातीचा पोत, त्याचे परीक्षण केले जाते. हवामान, तापमान, पाऊसमान या बाबी तपासण्यात येतात. ‘सॅटेलाईट इमेजचा वापर करण्यात येतो. शेतात सेन्सर्स लावून पाण्याची गरज तपासली जाते. एकूण अभ्यासातून प्रति एकरी उत्पादनाचा अंदाज काढण्यात येतो. त्याला किती खर्च  करावा लागेल हे देखील गणित केले जाते. पहिल्या वर्षी १५ एकरांत तीन शेतकरी होते. एकरी पाच ते सात क्विंटलपेक्षा कमी उत्पादन मिळाले तर शेतकऱ्यांकडून रक्कम घ्यायची  नाही असे ठरले. त्यापुढे ते मिळाल्यास ठरावीक टक्के रकमेचा किंवा शेतीमाल हिस्सा घेण्याचे ठरले. त्या वर्षी एकरी ९ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यातील दहा टक्के युवकांच्या कंपनीला देण्यात आले. त्यानंतर रब्बी हंगामात ५६ एकरांवर हाच पॅटर्न हरभरा पिकात राबविला. या वेळी शेतीमालाऐवजी रोख रक्कम घेण्यावर भर दिला. त्यात एकरी १२ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा कपाशी व तूर असे मिळून सुमारे ११० एकरांत ही शेती केली जात आहे. रब्बीतही ती कायम राहील. सेन्सर्सचा वापर  हेमंत म्हणाले, की सेन्सर्स आम्हीच तयार केले आहेत. गरजेनुसार बाजारात उपलब्ध असलेल्या सेन्सर्सचा वापरही केला. मात्र आमच्या पातळीवर त्यात सुधारणा केल्या. त्यातील डाटा आमच्या मोबाईलला जोडला आहे. सूर्यप्रकाश, तापमान, या बाबीही तपासणेही शक्य होते. त्याआधारे पाणी व अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याबाबत निर्णय घेतला जातो. मी चार वर्षे अमेरिकेत होतो. तेथील तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आता न्यूमॅटिक पेरणी यंत्राचाही वापर करायचे प्रयत्न आहेत. बियाणे किती खोलवर गेले हे पाहण्यासाठीही सेन्सरचा वापर करणार आहोत. सध्या तंत्रत्रानाबाबची महत्त्वाची मदत परिक्षितकडून होत आहे.    मार्गदर्शन  शेतीतील तांत्रिक बाबींसाठी अनुभवी शेतकरी तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सोयाबीन तज्ज्ञ डॉ. मिलिंद देशमुख, डॉ. जितेंद्र दुर्गे यांचेही मार्गदर्शन घेण्यात येत आहे. त्यातूनच ‘बीबीएफ’च्या वापरालाही चालना मिळाली. पूर्वी जमीन नरम होती. आता ती कडक झाल्याने पाण्याच्या पाळ्या वाढवाव्या लागतात. त्यामुळेच अशा भागात सबसॉयलरचा वापर करण्यात येणार आहे. सध्या खरीप पिकांपुरती ही शेती मर्यादित असली तरी पुढील टप्प्यात फळपिकांतही काम करणार असल्याचे युवक सांगतात. लवकरच या शेतीपद्धतीचा अजून विस्तार करण्याचा या युवकांचा मनोदय आहे.  आधुनिक अ‍ॅप विकसित या युवकांनी मोबाईल ॲपही तयार केले आहे. पेरणीची तारीख निश्‍चित केल्यानंतर पुढील किती दिवसांत कोणकोणती कामे कशी केली पाहिजेत ते त्यातून समजते. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापरही करण्यात येणार आहे. सुरुवातीला अ‍ॅपमध्ये हवामान विषयक ‘अपडेट’ करणारी यंत्रणाही होती. पीक व्यवस्थापनात त्याची मदत होते. प्रत्यक्ष शेतात व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तींना मोबाईल व दुचाकीही सुविधा पुरविण्यात आली आहे. मोबाईलवर अ‍ॅपवर दररोज ‘अलर्ट’  मिळतात. उपग्रहावरील छायाचित्रे, तसेच शेतातील ॲग्रॉनॉमिस्ट जी छायचित्रे व व्हिडिओ पाठवतात त्या माहितीचे पृथक्करण करण्यात येते. त्यावरून शेतीतील व्यवस्थापनाची दिशा मिळते.   आम्हा तिघांपैकी अनिल वगळता आमच्या दोघांची शेती नाही. मात्र शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान वापर, नवनिर्मिती, अभ्यास, व मार्गदर्शन यातून आम्ही शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो आहोत.मागील वर्षी त्यातूनच सोयाबीनमधील खोडकिड्याची समस्या आम्ही दूर केली. येत्या काळात रोबोटिक तंत्रही आम्ही वापरणार आहोत.  - हेमंत जयस्वाल  ७०३०१५७७९७,   ९५१८९२४८६१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com