जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी ‘आयव्हीएफ' तंत्र फायदेशीर

तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील दयाराम साहेबराव ठेंगील यांच्याकडील दहा होल्स्टिन फ्रिजियन सरोगेटेड गाईंमध्ये गेल्या डिसेंबर महिन्यात आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता. त्यापैकी आठ गाई गाभण राहिल्या. त्यापैकी दोन गाई व्यायल्या आहेत.
Tamkhada (Dist. Satara): Dayaram Thengil and Dr. Shyam Zanwar with Holstein Friesian Surrogate Cows
Tamkhada (Dist. Satara): Dayaram Thengil and Dr. Shyam Zanwar with Holstein Friesian Surrogate Cows

तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील पशुपालक दयाराम साहेबराव ठेंगील यांच्याकडील दहा होल्स्टिन फ्रिजियन सरोगेटेड गाईंमध्ये गेल्या डिसेंबर महिन्यात आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला होता. त्यापैकी आठ गाई गाभण राहिल्या. त्यापैकी दोन गाई व्यायल्या आहेत. येत्या दहा दिवसात उर्वरित सहा गाई विणार आहेत. आत्तापर्यंत आयव्हीएफ तंत्रज्ञानामध्ये केवळ ३५ ते ४० टक्के यश मिळाले होते. परंतु दयाराम ठेंगील यांच्याकडील गाईंमध्ये केलेल्या आयव्हीएफ प्रत्यारोपणात गाय गाभण राहण्याचे प्रमाण ८० टक्यांपर्यंत गेले आहे, हे तंत्रज्ञानाचे यश आहे, अशी माहिती जे के ट्रस्ट संस्थेचे मुख्य पशूतज्ज्ञ डॉ. श्याम झंवर यांनी सांगितले. जातिवंत कालवडींची पैदास  आयव्हीएफ (टेस्ट ट्यूब बेबी) तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना डॉ.श्याम झंवर म्हणाले की, पाश्चिमात्य देशातील जातिवंत गाईंच्या पैदाशीसाठी वापरण्यात येणारे आयव्हीएफ तंत्रज्ञान हे भारतीय हवामान तसेच येथील गाई,म्हशींसाठी अनुकूल ठरणारे आहे. आमच्या जे के ट्रस्टच्या प्रक्षेत्रावरील ‘समाधी‘ या जातिवंत गीर दाता कालवडीपासून मिळविलेले दहा आयव्हीएफ भ्रूण ३० डिसेंबर,२०२० मध्ये दयाराम ठेंगील यांच्याकडील दहा होल्स्टिन फ्रिजियन जातीच्या सरोगेटेड गाईंमध्ये प्रत्यारोपीत करण्यात आले होते. यापैकी आठ गाई गाभण राहिल्या. या तंत्रज्ञानात सेक्स सॉर्टेड सिमेन वापरल्यामुळे पुढील आठवड्यामध्ये या गाई मादी वासरांना जन्म देणे अपेक्षित आहे. ‘समाधी‘च्या आईचे एका वेतातील दूध ३,५०० ते ४,००० लिटर आहे. आयव्हीएफसाठी ब्राझीलच्या ‘एस्पॅन्टो‘ या जगप्रसिद्ध गीर वळूचे सेक्स सॉर्टेड सिमेन वापरण्यात आले. या वळूच्या आईचे एका वेतातील दूध तेरा हजार लिटर आहे. त्यामुळे आयव्हीएफ तंत्रज्ञानातून तयार झालेल्या कालवडी जेव्हा दुधात येतील, तेव्हा त्या एका वेतामध्ये ४ ते ५ हजार लिटर दूध देणे अपेक्षित आहे. आयव्हीएफ भ्रूण प्रत्यारोपण प्रकल्पाबाबत डॉ.श्याम झंवर म्हणाले की,जेके ट्रस्ट ही पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणारी एक नामांकित स्वयंसेवी संस्था आहे. वडगाव रासाई (जि.पुणे) येथे संस्थेची अत्याधुनिक दर्जाची आयव्हीएफ आणि इ.टी.प्रयोगशाळा आहे. २०१६ मध्ये गीर आणि साहिवाल या दुधाळ देशी गायींपासून टेस्ट ट्यूब बेबी तयार करण्यासाठी या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीत आमच्या प्रक्षेत्रावरील ‘समाधी‘ या उत्कृष्ट गीर दाता कालवडीपासून एकूण ७४ आयव्हीएफ गर्भधारणा यशस्वीरीत्या झाल्या. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत १०० आयव्हीएफ गर्भधारणा पूर्ण होतील. या ७४ आयव्हीएफ गर्भधारणेपैकी ३० वासरांचा जन्म पुणे, नगर आणि सातारा जिल्ह्यांसह देशाच्या विविध भागांतील पशुपालकांच्या गोठ्यात झाला आहे. प्रतिक्रिया प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा उत्कृष्ट देशी दुधाळ देशी गाईंची जलद गतीने वाढ करण्याचा आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकूळ मिशन या योजनेशी अनुरूप आहे. एक गाय साधारणपणे तिच्या आयुष्यात जास्तीत जास्त ८ ते १० वासरांना जन्म देऊ शकते. परंतु आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे एका वर्षात एका दाता गाईपासून मिळविलेल्या गुणवत्तापूर्ण भ्रूण प्रत्यारोपण सरोगेटेड गाईमध्ये करून ४० ते ५० मादी वासरे जन्माला येतील. हे तंत्रज्ञान देशी तसेच संकरित जातींच्या दुधाळ गाई तसेच म्हशींच्या पैदाशीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.आम्ही गुजरातमधील बन्नी जातीच्या म्हशीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. -डॉ.श्याम झंवर, पशूतज्ज्ञ, ९८२१०६६९११ माझ्या गोठ्यात सध्या ६३ होल्स्टिन फ्रिजियन गाई आणि वासरे आहेत. त्यापैकी डिसेंबर,२०२० मध्ये माझ्याकडील दहा होल्स्टिन फ्रिजियन गाईंमध्ये गीर जातीचे आयव्ही एफ भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आले. त्यापैकी आठ गाई या तंत्रज्ञानाने गाभण राहिल्या. त्यापैकी दोन गाई नुकत्याच व्यायल्या असून त्यांना दोन गीर जातीची नर वासरे झाली. ही वासरे जेके ट्रस्ट ने पैदास कार्यक्रमासाठी नेली आहे. येत्या आठवड्यात उर्वरित सहा गाई विणार आहेत. माझ्या गोठ्यामध्ये जातिवंत दुधाळ होल्स्टिन फ्रिजियन गाई तयार करण्यासाठी सेक्स सॉर्टेड सिमेन वापरून आयव्ही एफ भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यामुळे गाईंची संख्या कमी ठेऊन दूध उत्पादन वाढेल. दूध विक्रीच्या बरोबरीने मला जातिवंत कालवडी विकसित करून शेतकऱ्यांना विकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. - दयाराम ठेंगील, ९७६३८५६५५८ तामखडा (ता.फलटण,जि.सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com