शेतीला मिळाली पशुधनाची जोड

बचत गटांच्या माध्यमातून महिला कधी एकत्रपणे, तर कधी वैयक्तिक पूरक व्यवसाय उभारून विकासाच्या वाटेवर आहेत. यापैकी एक आहेत तळोशी (ता. जावळी, जि. सातारा) येथील सुधा दिलीप चिकणे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुधाताईंनी पशुपालन, तसेच कुक्कुटपालनाला चांगली सुरुवात केली आहे.
Dilip and Sudhatai with goats.
Dilip and Sudhatai with goats.

बचत गटांच्या माध्यमातून महिला कधी एकत्रपणे, तर कधी वैयक्तिक पूरक व्यवसाय उभारून विकासाच्या वाटेवर आहेत. यापैकी एक आहेत तळोशी (ता. जावळी, जि. सातारा) येथील सुधा दिलीप चिकणे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुधाताईंनी पशुपालन, तसेच कुक्कुटपालनाला चांगली सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी हा डोंगरी तसेच जास्त पर्जन्यमान असलेला तालुका म्हणून ओळख आहे. या तालुक्यात डोंगराच्या कुशीत तळोशी हे छोटे गाव. साधारणपणे १९९८ पासून या गावामध्ये महिला बचत गट चळवळ चांगल्या पद्धतीने सुरू झाली. गावातील श्रमिक महिला पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन बचत गटांची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून २४५ महिला गट कार्यरत असून, सुमारे चार हजार महिला जोडलेल्या आहेत. १९९९ मध्ये सुधा दिलीप चिकणे आणि महिलांनी जन्नीमाता महिला बचत गटाची स्थापना केली. गटातील सतरा महिलांनी प्रारंभी गावातील शेततळ्याच्या माध्यमातून सामूहिक शेतीचा प्रयोग केला. त्यानंतर या महिलांनी गटातून कर्ज घेऊन किराणा दुकान, शिवण काम आणि कपड्यांची दुकाने सुरू केली. काही महिलांनी सामूहिकपणे हातसडी तांदूळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पीक बदलाला सुरुवात... तळोशी गावातील महिलांनी शेती आणि पूरक व्यवसायातून प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. यापैकीच एक आहेत सुधा चिकणे. शेतीबरोबर श्रमिक महिला पतसंस्थेत महिला गटाच्या उभारणीसाठी त्या नोकरी देखील करतात. चिकणे यांच्या कुटुंबाची एक एकर शेती असून ती पारंपरिक पद्धतीने केली जात होती. पती मुंबई येथे नोकरीला होते. मात्र कोरोनाच्या काळात पतीची नोकरी गेल्याने ते गावी आले. सुधा यांनी कुटुंबाच्या आर्थिक नियोजनासाठी शेती पद्धतीमध्ये बदल करण्याचे ठरविले. यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली साथ मिळाली. तळ्याच्या पाण्यावर त्यांनी पहिल्या टप्यात शेतात विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड सुरू केली. ताजेपणा आणि चांगल्या गुणवत्तेमुळे स्थानिक बाजारपेठेत बटाटे, कांदा, घेवडा असा भाजीपाला हातोहात खपू लागला. जोडीला त्या भातशेती करतात. यंदा दीड गुंठे क्षेत्रावर त्यांनी स्ट्रॉबेरीचा प्लॉटदेखील केला. शेतात त्यांनी गेल्यावर्षी कूपनलिकादेखील खोदली आहे. पूरक व्यवसायाची सुरुवात  सुधाताईंचा बचत गट श्रमिक महिला ग्रामीण पतसंस्थेला जोडला आहे. बचतीमुळे गटातील उद्यमशील महिलांना एक ते तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ लागले. त्याचा लाभ घेऊन सुधाताईंनी शेळीपालनाला सुरुवात केली. २०१९ मध्ये साध्या पद्धतीने १० फूट बाय २१ फूट आकाराचा गोठा बांधला. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन तीन उस्मानाबादी आणि तीन बिटल जातीच्या शेळ्यांची खरेदी केली. सुधाताई सकाळी गोठ्यातील कामे उरकून पतसंस्थेमध्ये नोकरीसाठी जातात. तर त्यांचे पती शेळ्यांना चरण्यासाठी डोंगरात घेऊन जातात. गेल्या वर्षी डोंगरात शेळ्या चरावयास नेल्या असताना बिबट्याने तीन शेळ्या खाऊन टाकल्या. यामध्ये मोठी आर्थिक हानी झाली. परंतु न खचता सुधाताईंनी पुन्हा कर्ज घेऊन शेळीपालन सुरूच ठेवले. टप्प्प्याटप्प्याने गोठ्यामध्ये शेळ्यांची वाढ होत गेली. सध्या सुधाताईंकडे शेळी, बोकडांची संख्या वीसच्या वर गेली आहे. योग्य वयाच्या बोकडांची त्यांनी विक्री सुरू केली. डोंगरात फिरणाऱ्या शेळ्या आणि बोकडांना काटकपणा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून चांगली मागणी असते. एक ते दीड वर्षाच्या बोकडाला सरासरी १७ हजारांचा दर त्यांना मिळाला. गेल्या वर्षभरात शेळीपालनातून साठ हजारांची मिळकत त्यांना झाली आहे. गाई, म्हशींचा गोठा  सुधाताईंनी शेळीपालनात स्थिरस्थावर होताच गाय, म्हैस संगोपनाला सुरुवात केली. यासाठी बचत गटातून दोन लाख रुपये कर्ज घेतले. २४ फूट बाय ४० फूट आकाराचा साध्या पद्धतीचा गोठा उभारला. टप्प्याटप्प्याने या गोठ्यात गाई, म्हशींची संख्या वाढू लागली. सध्या त्यांच्याकडे २ खिलार गाई आणि नऊ मुऱ्हा, मेहसाणा जातीच्या म्हशी आहेत. सध्या एक म्हैस दुधात असून, प्रति दिन आठ लिटर दूध मिळते. हे दूध खासगी डेअरीला दिले जाते. पुढे दुधाचे उत्पादन वाढल्यानंतर घरगुती रतीबातून विक्रीचे नियोजन सुधाताईंनी केले आहे. जनावरे जास्त असल्याने शेणखतही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. हे सर्व शेणखत स्वतःच्या शेतीमध्ये वापरले जात असल्याने जमिनीची सुपीकता वाढली आहे. तसेच पीक उत्पादनात वाढ देखील मिळाली आहे. याचबरोबरीने सुधाताईंनी गेल्या वर्षीपासून गांडूळ खतनिर्मितीला सुरुवात केली. यंदा त्यांनी एक टन गांडूळ खत विक्रीसाठी तयार ठेवले आहे. कुक्कुटपालनाची जोड सुधाताईंनी शेळीपालन व दुग्ध व्यवसायाच्या बरोबरीने पाच महिन्यांपूर्वी कुक्कुटपालनाला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात त्यांनी वनराजा जातीची १०० पिले आणली. त्यांचे चांगले संगोपन केले. तीन महिन्यांनी त्यातील कोंबडा, कोंबडीची विक्री सुरू केली. कोंबडा ५०० रुपये आणि कोंबडी २५० रुपये दराने विकली जाते. गावशिवारात कोंबड्यांना चांगली मागणी असल्याने यातून आत्तापर्यंत पंचवीस हजारांची उलाढाल झाली आहे. आर्थिक बचतीला कष्टाची जोड देत साधलेली प्रगती हे बचत गट चळवळीचे यश असल्याचे सुधाताई सांगतात. एक एकरात विविध पिकांची लागवड सुधाताईंच्या कुटुंबाची एक एकर शेती आहे. या शेतीमध्येही त्यांनी बाजारपेठेचा कल पाहून पीक नियोजन केले आहे. यामध्ये भात, बटाटा, घेवडा, आदि भाजीपाला पिकांबरोबर स्ट्रॅाबेरी लागवड केली आहे. यंदा दीड गुंठे क्षेत्रावर स्ट्रॅाबेरीची लागवड केली आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. ऐन हंगामात एक आड दिवस ४० किलो स्ट्रॅाबेरीचे उत्पादन मिळत होते. ही स्ट्रॅाबेरी शेतकरी संघाच्या माध्यमातून मुंबई येथे विक्रीस जात होती. या पिकातून खर्च वजा जाता चाळीस हजारांची उलाढाल झाल्याची त्या सांगतात. कुटुंबाची मिळाली साथ... कष्टाची आम्हाला सवय होतीच. आता गटामुळे बचतीची सवय लावून घेतली. मात्र मार्गदर्शन आणि भांडवलाची त्रुटी होती. नाबार्ड तसेच बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. (कै.) डॉ. राजाराम चिकणे, श्रमिक महिला ग्रामीण पतसंस्थेच्या विद्या सुर्वे यांनी प्रोत्साहन देत भांडवल उपलब्ध करून दिले. शेती आणि पूरक व्यवसायात पती दिलीप आणि मुलगा ऋषिकेश, मुलगी नेहा, पुतण्या सार्थक, बहिणीचा मुलगा संदेश आणि भाचा निहाल यांची चांगली मदत मिळत असल्याचे सुधाताई सांगतात. संपर्क ः सुधाताई चिकणे, ७०३०४५२७८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com