निराधार विधवांना ‘शेक हॅंड’ फाउंडेशनचा मदतीचा हात

परभणी जिल्ह्यातील मांडळाखळी येथील शरद लोहट यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या शेक हॅंड फाउंडेशनकडून आत्महत्यग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा तसेच ग्रामीण गरजू निराधार शेतमजूर विधवा महिलांना मदतीचा हात दिला जातो. फाउंडेशनने उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत.
निराधार विधवांना ‘शेक हॅंड’ फाउंडेशनचा मदतीचा हात
The Foundation helps destitute widows on the occasion of Diwali.

परभणी जिल्ह्यातील मांडळाखळी येथील शरद लोहट यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या शेक हॅंड फाउंडेशनकडून आत्महत्यग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा तसेच ग्रामीण गरजू निराधार शेतमजूर विधवा महिलांना मदतीचा हात दिला जातो. फाउंडेशनने उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. शरद प्रभाकर लोहट यांच्या मांडाखळी येथे २० एकर शेती आहे.  शरद २००७ पासून परभणी जिल्हा परिषदेच्या उमरी येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी सुवर्णमाला या गावातील संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शरद यांना महाविद्यालयीन जीवनापासून समाजकार्याची आवड होती. गावात शेतकरी गट, मांडाखळी ॲग्रो प्रोड्यूर्स कंपनी स्थापनेत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. समाजाच्या ऋणातून उतराई होण्याच्या भूमिकेतून विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र घेऊन त्यांनी १५ ऑगस्ट २०१८ मध्ये शेक हॅंड फाउंडेशनची स्थापना केली.  शेक हॅंड फाउंडेशनचे काम संस्थापक अध्यक्ष शरद लोहट, सचिव संतोष चव्हाण, मुंजाभाऊ शिळवणे, भास्कर वाघ, विकास पांचाळ, धर्मराज बहिरट, प्रल्हाद चव्हाण, रामेश्‍वर जाधव, धनंजय इक्कर, रवी लोहट, विकास बिरादार, सतीश चव्हाण आदी सदस्य पाहतात. फाउंडेशनमध्ये पहिल्या वर्षी १० ते १५ सदस्य होते. सध्या विविध क्षेत्रांतील ५०० ते ६०० व्यक्ती फाउंडेशन सोबत काम करत आहेत. त्यांपैकी २० ते ३० सदस्य दर महिन्याला ५०० रुपयांची नियमित बचत करतात. इतर सदस्यांपैकी काही जण तीन तर काही सहा महिन्याला आर्थिक मदत करतात. पहिल्या वर्षी हजार रुपयांपासून सुरू झालेली मदत २०१९-२० मध्ये ९ लाखांपर्यंत पोहोचली. फाउंडेशनमार्फत आजवरपर्यंत साडेचार लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. विविध सोशल मीडियावरील ग्रुपच्या माध्यमातून उपक्रमांचे नियोजन केले जाते.  विधवा शेतकरी महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पतीच्या निधनानंतर एकट्यानेच संसाराचा गाडा पुढे रेटण्याची वेळ येते. उपजीविकेसह मुलामुलींच्या शिक्षणाचे प्रश्‍न निर्माण होतात. संकटाच्या स्थितीत मदतीचा हात मिळाला तर जीवन जगण्यासाठी उमेद आणि बळ मिळते. त्यातही उपजीविकेसाठी उत्पन्नाचे साधन मिळाले तर कुणाकडे हात पसरायची गरज पडत नाही. या उदात्त हेतूने शेक हॅंड फाउंडेशन मागील तीन वर्षांपासून गरजू निराधार महिला शोध घेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली.   विद्यार्थ्यांचे पालक होण्याचा प्रयत्न...

 •  वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. गतवर्षी ३११ विद्यार्थ्यांना, तर या वर्षी ५५१ विद्यार्थ्यांना वर्षभराचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. 
 •  गतवर्षी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत उद्‍भवलेल्या पूर स्थितीत फाउंडेशनतर्फे ३ हजारांवर विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यंदा रायगड जिल्ह्यातील तळिये गावातील आपत्तिग्रस्त विद्यार्थ्यांना वर्षभराचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 
 • फाउंडेशनचे हे कार्य अविरतपणे कुठलाही खंड न पडता सुरु आहे. कुठल्याही शासकीय मदतीशिवाय, लोकसहभागातून निराधार विधवांना मदत केली जाते. फाउंडेशनचे कार्य परभणीपुरते मर्यादित न राहता हिंगोली, उस्मानाबाद, जालना, विदर्भ, तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणातही विस्तारले आहे.
 • फाउंडेशनचे विविध उपक्रम 

 • आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, निराधार विधवा महिलांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती संकलित केली जाते. त्यानंतर संबंधित कुटुंबांना उपजीविकेसाठी खरोखरच साधनाची आवश्यकता आहे का याची पडताळणीकरून मागणीनुसार उत्पन्नाच्या साधनाची पूर्तता. 
 •  शंभरहून अधिक महिलांना शिलाई यंत्र, पिठाची गिरणी, मसाले गिरणी, शेळ्या आदींचे वाटप. 
 • दरवर्षी दिवाळीमध्ये गरजू कुटुंबांना किराणा साहित्य, दिवे, साडी, फराळ  इत्यादी वाटप .
 • महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन. मदत केलेल्या महिला आपले अनुभव इतरांसमोर कथन करतात. त्यातून इतर महिलांना प्रेरणा मिळते. 
 • फाउंडेशनने विधवा महिलांच्या मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या आरोग्यविषयक समस्या, विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न करणे हे देखील उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
 • - शरद लोहट, संस्थापक, शेक हॅंड फाउंडेशन   ८८८८०८०८६८, ७५०७५७५७५९

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.