गृहद्योगातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल...

औरंगाबाद शहरातील संपदा अनिल बाळापुरे यांनी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन विविध प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीला सुरुवात केली. प्रक्रिया पदार्थांच्या गुणवत्तेच्या जोरावर औरंगाबादसह, बीड, मुंबईतील कायमस्वरूपी ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले आहेत.
गृहद्योगातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल...
प्रक्रिया उद्योगात रमलेल्या संपदा बाळापूरे.

औरंगाबाद शहरातील संपदा अनिल बाळापुरे यांनी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन विविध प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीला सुरुवात केली. प्रक्रिया पदार्थांच्या गुणवत्तेच्या जोरावर औरंगाबादसह, बीड, मुंबईतील कायमस्वरूपी ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील संपदा अनिल बाळापुरे यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण उद्यमशील आहे. कुटुंबातील सदस्यांच्या उपक्रमशीलतेमधून प्रेरित होत संपदाताईंनी चार वर्षांपूर्वी गृह प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. चव आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांचा प्रक्रिया उद्योग वाढीस लागला आहे. औरंगाबादसह, बीड, मुंबईतही काही कायमस्वरूपी ग्राहक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. उत्पादनांना कायमस्वरूपी मागणी वाढल्याने त्यांचा हुरूप वाढला आहे. याशिवाय त्यांचेही कुटुंबाच्या अर्थकारणात योगदान सुरू झाले आहे. तीन भावांच्या कुटुंबात सर्वांत मोठ्या सूनबाई असलेल्या आणि कला शाखेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या संपदाताईंचे पती अनिलराव खासगी कंपनीत नोकरी आणि विमा व्यवसाय करतात. अनिलरावांचे दुसरे बंधू संजयराव न्यायालयात नोकरी करतात त्यांच्या पत्नी खासगी शिकवणी घेतात. तर तिसरे बंधू संतोषराव हे शिक्षक असून त्यांच्या पत्नी शिक्षिका आहेत. अनिलराव व संजयराव यांना प्रत्येकी एक मुलगा, एक मुलगी आणि संतोषराव यांना एक मुलगी असे जवळपास ११ जणांचे एकत्र कुटुंब आहे. थोडक्‍यात, शिकणारी मुलं वगळता कुटुंबातील प्रत्येक जण काही ना काही उद्योग आणि नोकरीतून कुटुंबासाठी अर्थार्जन करतो. कृषी विज्ञान केंद्रातून घेतले प्रशिक्षण कुटुंबातील प्रत्येक जण आपल्यापरीने कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लावत असताना आपण काय करू शकतो, या विचारातून चार वर्षांपूर्वी संपदाताईंनी औरंगाबाद शहरातील पैठण रोडवरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रातून मार्गदर्शन आणि आपल्या आवडीच्या विषयात अर्थात प्रक्रिया उद्योगामध्ये प्रशिक्षण घेतले. यामध्ये त्यांनी आवळा प्रक्रिया आणि विविध प्रकारच्या मसालेनिर्मिती प्रशिक्षणाला प्राधान्याने आत्मसात केले. तिथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्यातील उद्योजिकेला प्रोत्साहन मिळाले. सुरुवातीला ओळखीचे आणि परिसरातील लोकांना त्यांना हव्या असलेल्या गृहपयोगी खाद्यपदार्थ मागणीप्रमाणे तयार करून दिले जातील असा प्रचार केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला अन् त्यांचा गृह उद्योग सुरू झाला. त्यांनी या उद्योगाला ‘सोहम गृह उद्योग’ असे नाव दिले. प्रक्रिया उद्योगाला सुरुवात  संपदाताईंनी २०१७ मध्ये सर्वांत प्रथम घरगुती पद्धतीने चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून लिंबू लोणचे तयार केले. त्याला परिसरातील ग्राहकांकडून चांगली मागणी आली. ग्राहकांच्या मागणीनुसार संपदाताईंनी मिरची लोणचे, लिंबू अधिक मिरची लोणचे, कारळा चटणी, जवस चटणी, जवस मुखवास आदी पदार्थ थोड्या थोड्या प्रमाणात तयार करून मागणीप्रमाणे विक्री सुरू केली. या पदार्थांनाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी पुढे मेतकुट, थालीपीठ, भाजणी पीठ, तसेच सर्वच प्रकारचा दिवाळी फराळ, शेवया, वेफर्स, बटाटा उपवास चकली, बटाटा पापड आदी मागणीप्रमाणे उत्पादन व विक्रीचे नियोजन केले. गुणवत्तेमुळे प्रक्रिया उद्योगाने चांगलीच गती घेतली. संपदाताईंना दरवर्षी साधारणत: ६० ते ७० हजारांपर्यंत दिवाळी फराळ तयार करून देण्याच्या ऑर्डर मिळतात. ऐरवीही फराळाची मागणी त्यांच्याकडे असते. खासकरून त्यांच्या हाताची चकली व ड्रायफ्रूट करंजीचा स्वाद घेतलेले ग्राहक सातत्याने त्यांच्याकडून या पदार्थांची मागणी करतात. पहिला वर्षी बटाट्याचे पदार्थ ५० किलोपर्यंत विकले गेले. आता दरवर्षी त्यांना आठ क्‍विंटलपर्यंत बटाट्याचे पदार्थ तयार करावे लागतात. तसेच मुखवास ७० किलो, चटण्या ५० किलो आणि लिंबू लोणचे २०० किलोपर्यंत दरवर्षी मागणी असते. वर्षाकाठी जवळपास दोन लाखांची उलाढाल या प्रक्रिया उद्योगात होते, असे त्या सांगतात. दिवसेंदिवस सोहम गृह उद्योगाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या पदार्थांची मागणी वाढत असल्याने लवकरच यांत्रिकीकरणाच्या साह्याने मागणीनुसार खाद्यपदार्थ पुरवठा करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. लिंबू लोणचे पाव, अर्धा किलो, एक किलो, कारळा आणि जवस चटणी १०० ग्रॅम, अर्धा किलो, एक किलो, जवस मुखवास ३० ग्रॅम, अर्धा किलो एक किलोच्या पॅकिंगमध्ये त्यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. फराळाचे पदार्थ मागणीप्रमाणे तयार करून दिले जातात. सध्या लिंबू लोणचे (१३० रुपये), मिरची लोणचे (११० रुपये), लिंबू मिरची लोणचे (११० रुपये), जवस चटणी (२२० रुपये), कारळा चटणी (२२० रुपये), बटाटा वेफर्स (४०० रुपये), मुखवास (३२० रुपये) प्रति किलो या दराने विक्री होते. दिवाळी फराळ पदार्थांचे दर त्यावेळच्या परिस्थितीनुसार असतात. अर्थात, हे पदार्थ तयार करताना गुणवत्तेशी तडजोड केली जात नाही. चव उत्तम असल्याने ग्राहकांची मागणी सातत्याने वाढत असल्याचे संपदाताई सांगतात. महिलांना मिळाला रोजगार घरगुती गृहउद्योग सुरू केलेल्या संपदाताई सांगतात, की त्यांच्याकडे तीन महिलांना कायम रोजगार मिळाला आहे. तसेच एका महिलेला गरजेनुसार रोजगार दिला जातो. याव्यतिरिक्त संपदाताईंना या उद्योगासाठी प्रोत्साहन देणारे त्यांचे पती अनिलराव नोकरी आणि व्यवसाय सांभाळून ग्राहकांना खाद्यपदार्थांची ऑर्डर पोहोच करण्याची जबाबदारी पार पाडतात. दीडशेवर कायमस्वरूपी ग्राहक जवळपास चार वर्षांच्या प्रवासात विविध खाद्य पदार्थांची मागणी करणारे औरंगाबाद शहरातील दीडशेवर ग्राहक कुटुंब संपदाताईंच्या उद्योगाशी जोडले गेले आहेत. कोरोनाचे संकटातही या ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा सुरू होता. याशिवाय मुंबईतही आपल्या नातेवाइकांच्या माध्यमातून काही निरंतर मागणी असलेले ग्राहक संपदाताईंच्या गृह उद्योगाशी जोडले गेले आहेत. याशिवाय औरंगाबाद शहरातील सातारा परिसर, उल्कानगरी, रामनगर आदी परिसरांतील चार दुकानांमध्ये त्यांच्या गृह उद्योगातून उत्पादित पदार्थांची विक्री केली जाते. याशिवाय बीडमधील हिरकणी ग्रुप व विविध प्रदर्शनांत सहभागी होऊन बीड शहरातही सोहम गृह उद्योगाच्या माध्यमातून उत्पादित दर्जेदार पदार्थांची विक्री सुरू आहे. महिला उद्योजकांच्या गटात सहभाग गृह उद्योगाच्या माध्यमातून औरंगाबाद नव्हे तर सर्वदूर ओळख निर्माण करणाऱ्या जया साबदे यांच्या पुढाकारातून आकार घेत असलेल्या सिद्धी महिला उद्योजकांच्या बचत गटात संपदाताईंचा सहभाग आहे. या गटामध्ये सहभागी ११ महिला दर महिन्याला २०० रुपयांच्या बचतीसोबत विविध प्रकारचे गृह उद्योग करतात. संपर्क ः संपदा बाळापुरे, ९१४६०४८१८९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.