स्वयंसाह्यता महिला समूहाची शेती, अर्थकारणाला बळकटी

केऱ्हाळा बु.(ता.रावेर,जि.जळगाव) गावातील महिलांनी एकत्र येऊन शेती व्यवसायासह माउली स्वयंसाह्यता महिला समूहाची स्थापना केली. या समूहाने शेती विकासाच्या बरोबरीने मिनी डाळ मिल, पापड आणि मसालानिर्मिती उद्योगात आघाडी घेतली आहे.
Promoting mini dal mill and spice manufacturing industry through the group.
Promoting mini dal mill and spice manufacturing industry through the group.

केऱ्हाळा बु.(ता.रावेर,जि.जळगाव) गावातील महिलांनी एकत्र येऊन शेती व्यवसायासह माउली स्वयंसाह्यता महिला समूहाची स्थापना केली. या समूहाने शेती विकासाच्या बरोबरीने मिनी डाळ मिल, पापड आणि मसालानिर्मिती उद्योगात आघाडी  घेतली आहे.  केऱ्हाळा बु.(ता. रावेर, जि. जळगाव) गावशिवार केळी उत्पादनासाठी आघाडीवर आहे. याचबरोबरीने मका, गहू, हरभरा, कलिंगड, कांदा आदी पिकेही शिवारात आहेत. या गावातील वंदना जयेश पाटील आणि वैशाली राजेंद्र पाटील या शेतकरी कुटुंबातील उपक्रमशील महिला. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन शेती उत्पादनांपासून उपपदार्थ तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात पापडनिर्मितीवर लक्ष केंद्रित केले. प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने त्यांनी २०१८ मध्ये माउली स्वयंसाह्यता महिला समूहाची स्थापना केली. सध्या समूहामध्ये वंदना पाटील या अध्यक्ष असून, वैशाली पाटील सचिव आहेत. शैला पाटील, वैशाली  पाटील, सुनंदा पाटील, योगिता पाटील, कुमुद पाटील, सुनंदा महाजन, मंगला पाटील आणि आशा महाजन या समूह सदस्या आहेत. उद्योगाला सुरुवात महिला समूहाने २०२० मध्ये पापडनिर्मिती उद्योगाला सुरुवात केली. सुरुवातीला लहान पापड यंत्र घेतले. यासाठी महिलांनी ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली. पापड उद्योगासाठी ३० बाय २० फूट आकाराचे पत्र्यांचे शेड तयार केले. विजेची व्यवस्था केली. गुणवत्तापूर्ण पापडनिर्मितीमुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे आधुनिक पापड यंत्राची गरज भासू लागली. ही गरज पूर्ण करण्यासाठी समूहातील सदस्यांनी पैसे जमा केले. चार लाख रुपयांचे आधुनिक पापड यंत्र समूहाने खरेदी केले. या यंत्रासोबत ड्रायर आणि इतर यंत्रणा असून, त्यांची क्षमताही अधिक आहे. यंत्रावर पापड तयार करून ते वाळविणेही शक्य आहे. या यंत्राद्वारे प्रामुख्याने उडदाचे पापड तयार केले जातात. तसेच महिला हाताने नागली, साबुदाणा, तांदळाचे पापड तयार करतात. शेतकऱ्यांकडून उडदाची खरेदी महिला समूहातर्फे पापडाची थेट ग्राहकांना विक्री केली जाते. आगाऊ नोंदणीनुसार नागली, तांदळाचे पापड तयार केले जातात. उडदाच्या पापडाची जास्तीत जास्त निर्मिती केली जाते. यासाठी दर वर्षी थेट शेतकऱ्यांकडून सात ते आठ क्विंटल उडदाची खरेदी केली जाते. नागली, साबुदाणा, मसाले आणि तांदळाची खरेदी  बाजारपेठेतून केली जाते.   उत्पादन विक्रीचे दर उत्पादन खर्चानुसार पापड विक्रीचे वेगवेगळे दर आहेत. उडीद पापड २२० रुपये प्रति किलो या दराने विकले जातात. त्यामध्ये वेगवेगळे स्वाद आहेत. याचबरोबरीने लसूण मिरची, मसाला पापडनिर्मिती केली जाते. उडीद-मसाला पापड २४० रुपये प्रति किलो, नागली पापड ४०० रुपये प्रति शेकडा, साबुदाणा पापड ३०० रुपये प्रति शेकडा आणि तांदळाचे पापड २५० रुपये शेकडा या दराने विकले जातात. गव्हाची स्वच्छता करण्यासाठी १४० रुपये प्रति क्विंटल असा दर आकारला जातो. डाळनिर्मितीसाठी प्रति किलो पाच रुपये दर आहे. मसाले तयार करून देण्यासाठी २० रुपये प्रति किलो असा दर आकारला जातो. खर्च आणि उत्पादनाचे गणित कोरोनाच्या पहिल्या लॉकडाउनमध्ये समूहाच्या लघुउद्योगाची उलाढाल अत्यल्प होती. या काळात लघुउद्योग १०० टक्के बंद होता. तसेच वाहतुकीवरही निर्बंध होते. यामुळे अडचणी आल्या. परंतु कोरोना व्यतिरिक्त काळात दर महिना कच्च्या मालासह सात ते आठ हजार रुपये पापडनिर्मितीचा खर्च असतो. स्वतः महिला यामध्ये काम करत असल्याने मजुरी खर्च शून्य आहे. डिसेंबर ते मे या काळात दर महिना किमान १५ ते २० हजार रुपये निव्वळ नफा समूहाला मिळतो. प्रक्रिया उद्योगात समूहातील चार महिला सक्रिय असून, त्या भागीदारीने वित्तीय नियोजन पाहतात.  शिरपूर, पुण्यापर्यंत विक्री पापडाची विक्री केऱ्हाळा आणि परिसरातील गावांमध्ये केली जाते. याशिवाय मोरगाव, रावेर, धुळे, शिरपूर, पुणे शहरातही पापडांना मागणी आहे. मागणीनुसार पापडनिर्मिती केली जाते. विक्रीसाठी कुटुंबातील मंडळीची मदत होते. जळगाव जिल्ह्यात मार्केटिंगचे जाळे अधिक घट्ट करण्यावरही समूहाचे काम सुरू आहे. यासाठी प्रमुख किराणा दुकानदारांकडे संपर्क करण्यात आला आहे. मजुरी खर्च टाळण्यावर भर पापडनिर्मिती, डाळ उद्योग व मसालानिर्मितीचे काम गटातील महिला करतात. मजुरांची मदत घेतली जात नाही. यामुळे मजुरी खर्चात बचत होते. हा लघुउद्योग जानेवारी ते मे अखेरपर्यंत जास्त प्रमाणात कार्यरत असतो. यादरम्यान गटातील महिला सतत व्यस्त असतात. जूननंतर आपापल्या शेताची कामे सुरू होतात. पावसाळ्यात हा लघुउद्योग अल्प क्षमतेने काम करतो.

कृषी यंत्रणांशी समन्वय... पापडनिर्मिती उद्योगासाठी समूहातील सदस्यांना पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ महेश महाजन तसेच रावेर पंचायत समितीमधील उमेद अभियानाचे समन्वयक अंकुश जोशी, गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांचे मार्गदर्शन, तांत्रिक मदत झाली. यासोबत कृषी विभागाच्या संपर्कातही महिला समूह आहे. यामुळे उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रदर्शन, मागणी याबाबत माहिती मिळते. समूहातील महिला कुटुंबाची शेतीदेखील चांगल्या प्रकारे सांभाळतात. केळी, गहू, मका उत्पादनवाढीसाठी व्यवस्थापनात सुधारणा, नवीन योजना, तंत्रज्ञान याबाबतही जाणून घेण्याचा आग्रह, जिज्ञासा महिला समूहामध्ये आहे. उद्योगाचा विस्तार महिला समूहातर्फे लघुउद्योग पापड निर्मितीपर्यंत मर्यादित न ठेवता पुढे नेण्याची धडपडही सतत सुरू होती. यातून ७५ हजार रुपये गुंतवणूक करून महिलांनी मिनी डाळ मिल, तसेच पंधरा हजारांचे मसाला निर्मिती यंत्र खरेदी केले. मिनी डाळ मिलमध्ये हरभरा, तूरडाळ निर्मिती केली जाते. तसेच गव्हाची स्वच्छता (क्लिनिंग) करता येते.  मसाला यंत्रामुळे मागणीनुसार ओले, कोरडे मसाले तयार केले जातात. लग्न समारंभ, शुभकार्य आदींसाठी मसाले तयार करून देण्याच्या ऑर्डर जानेवारी ते मे दरम्यान अधिक असतात. केऱ्हाळा गाव शिवारात गहू आणि तूर लागवड मोठ्या प्रमाणात होते. यामुळे गहू स्वच्छता, तूरडाळ निर्मितीचे काम समूहाला मिळू लागले आहे. आगामी काळात शेवया निर्मितीदेखील सुरू करण्याचा गटाचा मनोदय आहे. - वैशाली पाटील  ७०३०६६८६४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com