पूरक उद्योगातून शेती झाली किफायतशीर

भातशेतीसह पशुपालन व्यवसायामध्ये उतरत एकात्मिक शेती व्यवस्थापनाचे मॉडेल शेंबवणे (ता.संगमेश्वर,जि.रत्नागिरी) येथील प्रदीप सुरेश दरडे या युवा शेतकऱ्याने उभे केले आहे. भातशेतीबरोबरच भाजीपाला, कडधान्य लागवड, शेळी तसेच गोपालन आणि आंबा,काजू फळबागायतीमधून उत्पन्नाचे साधन तयार केले आहे.
पूरक उद्योगातून शेती झाली किफायतशीर
Darade's goat rearing project

भातशेतीसह पशुपालन व्यवसायामध्ये उतरत एकात्मिक शेती व्यवस्थापनाचे मॉडेल शेंबवणे (ता.संगमेश्वर,जि.रत्नागिरी) येथील प्रदीप सुरेश दरडे या युवा शेतकऱ्याने उभे केले आहे. भातशेतीबरोबरच भाजीपाला, कडधान्य लागवड, शेळी तसेच गोपालन आणि आंबा,काजू फळबागायतीमधून उत्पन्नाचे साधन तयार केले आहे.  शेंबवणे (ता. संगमेश्वर,जि.रत्नागिरी) येथील सुरेश दराडे यांचे कुटुंब हे पारंपरिक शेती करणारे.भात शेती आणि दोन गावठी गाईच्या दुधाची गावात विक्री हे त्यांचे मिळकतीचे साधन होते. परंतु चार वर्षांचा कृषी अभ्यासक्रम पूर्ण केलेला त्यांचा मुलगा प्रदीप याने शेतीला व्यावसायिक स्वरूप आणण्यास सुरवात केली. बारावी नंतर प्रदीपने २००८ साली मातृमंदिर शिक्षण संस्थेमधून कृषी विषयातील दोन वर्षांचा कृषी डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर लांजा तालुक्यातील एका खासगी कृषी फर्ममध्ये नोकरीस सुरवात केली. त्याचवेळी  मांडकी-पालवण येथील कृषी महाविद्यालयातून बहिःस्थ पद्धतीने चार वर्षांचा कृषी पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला.  नोकरी आणि शिक्षण सुरू असताना प्रदीपने २०११ साली काजूच्या वेंगुर्ला ४ आणि ७ जातीची एक हजार कलमे बांधली. योग्य वाढ झाल्यानंतर शेंबवणे येथील स्वतःच्या तीन एकर क्षेत्रात लागवड केली. काजूबरोबरच शंभर हापूसची कलमेही त्याने लावली. एकूण दहा एकर जमिनीपैकी पाच एकरामध्ये आंबा-काजू कलमांची लागवड केली. हे करत असताना गुहागर तालुक्यात शेती सल्लागार तसेच शहापूर (जि. ठाणे) येथे खासगी फर्ममध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले. तेथे परदेशी भाज्यांच्या लागवडीचे तंत्र आत्मसात केले.

भातशेतीमध्ये सुधारणा

 • सुमारे पाच एकरामध्ये भातशेतीसाठी वेळ आणि मजूर टंचाई लक्षात घेऊन पॉवर टिलर  घेतला. 
 • अधिक उत्पादन देणाऱ्या भाताच्या सुधारित आणि संकरित जातींची निवड.
 • जमीन सुपिकतेसाठी लेंडीखत आणि शेणखताचा वापर. शिफारशीनुसार रासायनिक खतांचा वापर. 
 • योग्य पीक व्यवस्थापनातून एकरी ८ ते १० क्विंटल भात उत्पादन. पन्नास टक्के तांदळाची गावशिवारात विक्री. उर्वरित तांदूळ हा घरासाठी ठेवला जातो.
 • हंगामी भाजीपाला लागवड 

 • प्रदीपचे आई-वडील हे काही प्रमाणात कडधान्य लागवड करत होते; मात्र प्रदीपने त्यामध्ये व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न सुरु केला. पाण्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी नदीवर पंप बसवला. 
 • २०१८ पासून दोन एकरावर मुळा, लाल व हिरवा माठ, चवळी, पावटा आणि मूग लागवडीला सुरवात.  
 • ऑक्टोबर महिन्यात भात काढणीनंतर विविध हंगामी भाजीपाल्याचे नियोजन. 
 • भाजीपाला पिकासाठी शेणखत, लेंडीखताचा जास्तीत जास्त वापर.
 • शिफारशीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक कीड नाशकांचा वापर. तसेच दशपर्णी अर्क, गोमूत्राचीदेखील फवारणी. 
 • हिरवा माठ, लाल माठाची भाजी दीड महिन्यात विक्रीला तयार होते.पावटा, चवळीची काढणी फेब्रुवारी महिन्यात. 
 • मार्च महिन्यात सुमारे अर्धा एकरावर मुगाची पेरणी. 
 • भाजीपाला विक्रीची जबाबदारी प्रदीपची आई सांभाळते. गावशिवार तसेच परिसरातील कडवई बाजारात भाजीपाला विक्री. वर्षभरात भाजीपाला विक्रीतून एक लाख रुपयांची उलाढाल. 
 • आंबा,काजू फळबागेतूनही उत्पन्न  प्रदीपने नोकरी करत असताना लागवड केलेल्या वेंगुर्ला ४ आणि ७ जातीच्या काजू कलमांपासून गतवर्षीपासून उत्पादन सुरु झाले आहे. तीन एकरावरील काजू कलमांच्यापासून वर्षाला दीड टन काजू बी मिळते. बाजारात काजू बी चा किलोचा दर ९० ते १०० रुपये आहे. वर्षाला यामधून एक लाख रुपयांची उलाढाल होते. हापूसची शंभर कलमे असून त्यामधून वर्षाला ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. काजू, आंबा कलमांना लेंडीखत, शेणखताचा जास्तीत जास्त वापर केला जातो. त्याचबरोबरीने शिफारशीत रासायनिक खतांचा वापर केला जातो. शेतीबांधावर लिंबू,आवळा, जांभूळ,कोकम,शेवगा,पेरू,जाम,करवंद लागवड आहे.प्रदिपबरोबर आई, वडील, बहीण आणि पत्नी असे कुटुंबातील सदस्य शेती आणि पूरक व्यवसायात मदत करत असल्याने मजुरांची शक्यतो गरज लागत नाही.  शेळीपालनास सुरवात  भातशेती, भाजीपाला लागवडीला व्यावसायिक स्वरूप देताना प्रदीपने सेंद्रिय खतांच्या उपलब्धतेसाठी तीन वर्षांपूर्वी शेळीपालनास सुरवात केली. सुरवातीला कोकण कन्याळ आणि उस्मानाबादी जातीच्या दहा शेळ्या आणल्या. यातून एक वर्षानंतर सहा बकऱ्यांची विक्री केली. त्यामधून जास्त उत्पन्न मिळाले नाही, मात्र व्यवसायाचा अनुभव मिळाला. उरलेल्या शेळ्यांपासून पैदास सुरु केली.  गेल्यावर्षी सोळा बोकडांची त्याने विक्री केली. वीस किलोचा एक बोकड सर्वसाधारण ८ ते १० हजार रुपयांना विकला जातो. शिमगा,ईदसाठी बोकडांना चांगली मागणी असते. सध्या २२ बोकड विक्रीसाठी तयार आहे. शेळ्या,बोकड आणि करडे मिळून गोठ्यामध्ये ६० जनावरे आहेत. शेळ्यांना दररोज चरायला सोडले जाते. खाद्यामध्ये पेंडीचा वापर केला जातो. वर्षातून तीन वेळा लसीकरण केले जाते. शेळीपालनातून वर्षाला किमान एक लाखांची उलाढाल होते.  दुग्ध व्यवसायाची जोड  पूर्वीपासून प्रदीपच्या घरी दोन गावठी गाई होत्या. गावातील दुधाची मागणी लक्षात घेऊन प्रदीपने दोन वर्षांपूर्वी जर्सी गाई विकत घेतल्या. पावसाळ्यामध्ये भरपूर हिरवा चारा उपलब्ध असतो, मात्र डिसेंबर ते  मे महिन्यापर्यंत हिरवा चारा लागवड करावी लागते. गाईंना खाद्यामध्ये हत्ती गवत, मका चारा,चवळीचा पाला आणि डोंगरी गवत दिले जाते. त्यामुळे दुधाचे प्रमाण टिकून आहे.  चारपैकी दोन गाई सध्या दुधात आहेत. दिवसाला वीस लिटर दूध उत्पादन होते. हे दूध डेअरीत ३० रुपये लिटर या दराने विकले जाते.  प्रदीपने येत्या वर्षभरात प्रति दिन १०० लिटर दुग्धोत्पादनाचे लक्ष निर्धारित केले आहे. त्यादृष्टीने नवीन गाईंची खरेदी करण्यात येणार आहे. गाईंना वर्षभर चारा उपलब्ध होण्यासाठी दहा गुंठे जमिनीवर हत्ती गवत आणि मक्याची लागवड केली आहे.   सेंद्रिय खतांची उपलब्धता  शेतीसाठी आवश्यक लेंडी आणि शेणखत तयार करण्यासाठी प्रदीपने तीन टाक्या बांधलेल्या आहेत. यातील दोन टाक्या १० बाय ४ मीटरच्या आहेत. शेळ्यांच्या लेंड्या टाक्यांमध्ये सहा महिने जमा करून ठेवल्या जातात.त्यानंतर ते शेतीमध्ये मिसळले जाते. एक खड्यात शेणखताची साठवण केली जाते. वर्षभरानंतर या शेणखताचा वापर शेतीमध्ये केला जातो. यामुळे सेंद्रिय खत विकत घ्यावे लागत नाही. स्वतः सेंद्रिय खताची उपलब्धता केल्याने वर्षभरात पन्नास हजारांची बचत झाली आहे. - प्रदीप दरडे  ७२१८२८०००२

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.