आदर्श असावा तर खडतरे कुटुंबासारखा

मुक्त गोठा पद्धत, नेटके व्यवस्थापन, कुटुंबाची एकी व पूरक उत्पन्नाचे विविध स्रोत तयार करून बीबीदारफळ (जि. सोलापूर) येथील ब्रम्हदेव खडतरे व कुटुंबाने दुग्धोत्पादनासह शेतीत प्रगती साधली आहे. मूरघास, आजारी जनावरांसाठी कप्पी, सुधारित तंत्र यांचाही वापर योग्य पद्धतीने करून व्यवसायाचे अर्थकारण जपले आहे.
मुक्त गोठ्यातील गायी आणि सुलभ गव्हाण.
मुक्त गोठ्यातील गायी आणि सुलभ गव्हाण.

मुक्त गोठा पद्धत, नेटके व्यवस्थापन, कुटुंबाची एकी व पूरक उत्पन्नाचे विविध स्रोत तयार करून बीबीदारफळ (जि. सोलापूर) येथील ब्रम्हदेव खडतरे व कुटुंबाने दुग्धोत्पादनासह शेतीत प्रगती साधली आहे. मूरघास, आजारी जनावरांसाठी कप्पी, सुधारित तंत्र यांचाही वापर योग्य पद्धतीने करून व्यवसायाचे अर्थकारण जपले आहे. सोलापूर-बार्शी महामार्गापासून आत बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) गावात प्रवेशताच ब्रम्हदेव अर्जुन खडतरे यांची शेती आहे. सहा एकरांत साडेतीन एकर ऊस, अडीच एकर चारापिके आहेत. ब्रम्हदेव २००५ पासून शेतीकडे वळले. माळरानाच्या मध्यम, हलक्या जमिनीत पाण्याची अडचण होती. सन २००७ मध्ये गावाच्या उत्तरेकडील गांधी तलावातून पाइपलाइन केली. मग सारे कुटुंब शेतातच राबू लागले. लगेच उत्पन्न मिळेल आणि आर्थिक स्रोत वाढेल अशी परिस्थिती नव्हती. ज्वारी, गहू असे करीत ते ऊसशेतीकडे वळले. थोडी उत्पन्नवाढ झाली, पण ती पुरेशी नव्हती. सन २०११ मध्ये पूरक म्हणून दुग्ध व्यवसायाचा विचार केला. दोन गायींपासून सुरवातही झाली. व्यवसाय विस्तार दहा वर्षांपूर्वी सुरु केलेला व्यवसाय खडतरे कुटुंबाने मेहनतीने वाढवला. वर्षाला एक-दोन करत आजमितीला २० संकरित (एचएफ) गायींचा गोठा तयार झाला आहे. मुक्तगोठा पद्धती स्वीकारली. शेती कमी असल्याने अडचण होती. त्यामुळे मुक्त गोठ्यासाठी वीस फूट रुंद आणि १३० फूट लांब अशा पद्धतीचे प्रशस्त पत्रा शेड उभारले. त्यात गायींना फिरण्यासाठी भोवताली कुंपण घालून आत मोकळी जागा ठेवली. पिण्याच्या पाण्यासाठी हौद, चाऱ्यासाठी प्रशस्त गव्हाण केली. मुक्त गोठ्यामुळे वेळ, श्रम कमी झाले. चारा-पाण्याच्या ठराविक वेळा ठरवल्यामुळे आणि जागेवरच देता येत असल्याने धावपळ कमी झाली. दररोज दोनशे लिटर संकलन

 • वर्षभराचा विचार करता दररोज सुमारे १८० ते २०० लिटर दूध संकलन.
 • गावानजीक खासगी डेअरीला दूध पुरवठा. प्रति लिटर २७ रुपये दर.
 • उत्पन्न व खर्च यांचा विचार करता मासिक ३० टक्के फायदा. घरच्या सर्वांचे श्रम, चारा घरीच तयार करणे यातून खर्च कमी केला.
 • मुरघास फायद्याचा गुणवत्तापूर्ण दुग्धोत्पादनासाठी ओला, सुका चारा, तयार पशुखाद्य, कॅल्शियम, मिनरल मिक्शर आदी दिले जाते. मात्र तुलनेत मुरघास सर्वाधिक परवडतो. सध्या १५ टन तयार आहे. मुरघास निर्मिती

 • दोन- तीन एकरांत मका लागवड.
 • मक्याचे दाणे दुधाच्या अवस्थेत आल्यानंतर कापणी करून कुट्टी.
 • कुट्टीत एक किलो मीठ, एक किलो कल्चर पावडर मिसळून चांगले मिश्रण केले जाते.
 • प्रति एक टन क्षमतेच्या बॅगेत भरले जाते. चांगले पॅकिंग करून हवाबंद केले जाते.
 • दीड महिन्याने बॅग उघडली जाते. या काळात चारा चांगला मुरतो.
 • तो चविष्ट, पौष्टिक ठरतोच, शिवाय दूध उत्पादन आणि फॅटही वाढते.
 • जनावरांचे व्यवस्थापन (ठळक बाबी)

 • सकाळी साडेसहा वाजता प्रति गाय तीन किलो तयार खाद्य, एक किलो भरडा, पाव किलो चिपळी पेंड, पावकिलो गहू भुस्सा असे साधारण साडेचार ते पाच किलो खाद्य.
 • सकाळी सात वाजता यंत्राद्वारे दूधकाढणी.
 • कडवळ, गवताची कुट्टी करून चारा. (प्रति गाय सुमारे दहा किलो प्रमाणात).
 • त्यानंतर गायींना परिसरात मोकळे सोडले जाते.
 • दुपारी चार वाजता प्रति गाय प्रत्येकी पाच किलोप्रमाणे मुरघास.
 • सायंकाळी पाच वाजता तयार खाद्य, भरडा, चिपळी पेंड, गहु भुस्सा याप्रमाणे साडेचार ते पाच किलो खाद्य.
 • सायंकाळी सहा वाजता पुन्हा दूधकाढणी.
 • महिलांचा वाटा अधिक ब्रम्हदेव व पत्नी प्रतिक्षा, मोठा भाऊ रामचंद्र व पत्नी उज्वला, छोटा भाऊ विष्णू व पत्नी संध्या, वडील असे १५ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. महिलावर्ग अधिक झोकून देऊन राबतात. चारा देण्यापासून ते धारा काढण्यापर्यंत मुख्य जबाबदारी त्यांचीच असते. व्यवसायातील यशात त्यांचा वाटा सर्वाधिक असल्याचे ब्रम्हदेव सांगतात. शेणखताचा उसाला फायदा वर्षाला ५० हून अधिक ट्रॅाली घरच्या शेणखताचा वापर तीन ते साडेतीन एकर उसात वापर केल्याने रासायनिक खतांचा वापर कमी होतो. एकरी ७० टनांपर्यंत उत्पादन मिळते. पेरणी, मळणीचा पूरक उद्योग केवळ दुग्ध व्यवसाय व शेतीवर भिस्त न ठेवता ट्रॅक्टर, मळणी यंत्र घेतले आहे. बीबीदारफळ परिसरात त्याद्वारे कांदा, गहू, ज्वारी, हरभरा पेरणी तर तूर, मूग, मटकी, सोयाबीन, गहू, हरभरा यांची मळणी करून दिला जाते. त्यातून अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. आजारी गायी कप्पी काहीवेळा गायी आजारी पडतात. उपचार करूनही लवकर उठत नाहीत. त्यासाठी लोखंडी कप्पी तयार केली आहे. त्यात गायीला झोळीत बसवून कप्पीच्या साह्याने अलगद वर उचलत उभे करण्यासाठी ताकद दिली जाते. कप्पीला चाके बसवली आहेत. त्यामुळे थेट गोठ्यात नेता येते. परिसरातील शेतकऱ्यांनाही प्रतिदिन ३५० रुपये भाडेशुल्क आकारून त्यातून उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. संपर्क-ब्रम्हदेव खडतरे- ९७६६२६८६७३

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com