बारमाही भाजीपाला पिकांसह थेट विक्री व्यवस्था

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाधवडे येथील रमाकांत यादव यांनी हंगामनिहाय शेतीमाल गरज व मागणी ओळखून दोन एकरांत बारमाही भाजीपाला पीक व्यवस्थापन केले आहे. वर्षभर विविध आठवडी बाजारांतून थेट विक्रीचे परिश्रम घेत त्यांनी नफ्याचे मार्जिन व आर्थिक व कौटुंबिक प्रगती साधली आहे.
Ramakant selling watermelons directly at the stall under 'Vikel to Pickel'.
Ramakant selling watermelons directly at the stall under 'Vikel to Pickel'.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाधवडे येथील रमाकांत यादव यांनी हंगामनिहाय शेतीमाल गरज व मागणी ओळखून दोन एकरांत बारमाही भाजीपाला पीक व्यवस्थापन केले आहे. पावसाळ्यात पाऊस भरपूर असूनही त्यादृष्टीने पिके निवडली. वर्षभर विविध आठवडी बाजारांतून थेट विक्रीचे परिश्रम घेत त्यांनी नफ्याचे मार्जिन व आर्थिक व कौटुंबिक प्रगती साधली आहे. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर नाधवडे (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) गाव आहे. परिसरात बारमाही वाहणारे उमाळ्यांचे स्रोत असून, राज्यभर प्रसिद्ध असलेला नापणे धबधबा बारमाही वाहतो. काही वर्षांपूर्वी गावाच्या पश्‍चिमेला लघुसिंचन प्रकल्प झाला. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली. काजू क्षेत्र वाढले. भुईमूग, कुळीथ, चवळी अशी पिकेही शेतकरी घेतात. याच गावातील रमाकांत यादव यांनी पदवी व बीपीएडपर्यंत शिक्षण पूर्ण केले. घरातील सदस्यांच्या आग्रहाखातर नोकरीचा शोध घेतला. पण समाधानकारक नोकरी न मिळाल्याने शेतीतच प्रगती करायचा निर्णय घेतला. सुरुवातीचे कष्ट भात हेच मुख्य पीक होते. पण उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून भातानंतर पालेभाज्या, मुळा आदी आदी घेण्याचा निर्णय घेतला. डोक्यावर टोपली घेऊन घरोघरी फिरून पालेभाज्यांची विक्री सुरू केली. ताजी भाजी दारात मिळू लागल्याने ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग शेजारचे शिडवणे, शेर्पे या गावात रमाकांत भाजी घेऊन जाऊ लागले. पदवीधर असून, नोकरी करायची सोडून डोक्यावर टोपली घेऊन भाजी कसली विकतो असे टोमणे ऐकायला मिळाले. पण रमाकांत यांनी टीकेकडे लक्ष न देता काम सुरू ठेवले. कोणतेही वाहन नसल्याने घरापासून चार- पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागे. पहाटे लवकर उठून भाजी काढायची. स्वच्छ धुऊन टोपलीत भरायची आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जायचे असा दिनक्रम होता. यात वेळ, कष्ट व पैसा यांची कसरत करावी लागली. मार्गदर्शन ठरले उपयुक्त पदवीधर तरुण डोक्यावर टोपली घेऊन भाजीपाला विक्री करतो हे कळल्यावर तत्कालीन कृषी सहाय्यक कै.. विवेकानंद नाईक रमाकांत यांच्या घरी गेले. कोकणातील बाजारपेठांमध्ये येणारा भाजीपाला कोल्हापूर, सांगली, बेळगाव आदी भागांतून येतो. मागणीच्या अत्यंत कमी उत्पादन स्थानिक स्तरावर होते. ही बाब नाईक चांगली जाणून असल्याने त्यांनी रमाकांत यांना वर्षभर घ्यावयाचा भाजीपाला, लागवड तंत्र व थेट विक्रीचे शास्त्र शिकवले. रमाकांत यांना त्यानुसार खरिपात भोपळ्याचे भरघोस उत्पादन व उत्पन्न मिळवले. मग उत्साह अजून वाढला. थेट विक्री पुढे रमाकांत यांनी कलिंगड उत्पादनावरही भर दिला. ठोक तसेच काही प्रमाणात थेट विक्री सुरू केली. एकदा कलिंगडाचे दर गडगडून चार ते पाच रुपये प्रति किलोवर आले. मग स्थानिक बाजारपेठ, मुख्य रस्त्यांवर स्टॉल उभारून थेट विक्रीच सुरू केली. त्यानंतर आजगायत सर्व मालासाठी ही पद्धत सुरू केली. रमाकांत यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 

  • शेतीचा ११ वर्षांचा अनुभव.
  • एकूण अडीच एकर जमीन. पैकी दोन एकर भाजीपाला. पावसाळ्यात पालेभाज्यांवर भर. भोपळा, दोडका. पडवळ, मुळा, कलिंगड, भेंडी, गवार, वांगी, वाल, कारले, घेवडा, भुईमूग अशी प्रत्येकी ८ ते १० गुंठ्यांत बारमाही विविध हंगामांत पिके.
  • मल्चिंग, सोडपाणी तसेच काही पिकांसाठी ठिबक सिंचन.
  • दरवर्षी दोन एकरांत १५ ते १६ ट्रॉली शेणखत. दोन जनावरे. गावातील शेतकऱ्यांकडूनही शेणखताची खरेदी.
  • यंदा अति पाऊस व अवकाळीत सतत २० ते २२ दिवसांत भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. परंतु रमाकांत नाउमेद झाले नाहीत. नव्या उमेदीने त्यांनी पुढील नियोजन सुरू केले.
  • थेट विक्री व्यवस्था 

  • गावापासून सुमारे ९ किलोमीटरवर आठवडी बाजार भरणाऱ्या गावपेठा. उदा. तळेरे, खारेपाटण, वैभववाडी. स्वतःच्या मालवाहू गाडीत दररोज १०० ते १५० किलोपर्यंत ताजा शेतीमाल घेऊन जातात.
  • थेट विक्रीमुळे किलोला ४५ ते ५० रुपये दर मिळतो. व्यापाऱ्यांनी विक्री केल्यास हाच दर २० रुपयांपर्यंतच मिळतो असा रमाकांत यांना अनुभव.
  • ज्या शेतकऱ्यांना थेट विक्री शक्य होत नाही अशांचा माल घेऊन त्याचीही विक्री करून स्वतःबरोबर त्यांना चांगला दर मिळवून देतात.
  • वर्षभरात एकूण उलाढाल सुमारे चार लाख रुपये.
  • आपल्याला आलेल्या अडचणी अन्य शेतकऱ्यांना येऊ नयेत यासाठी मोफत मार्गदर्शनही करतात.
  • ग्राहकांमध्ये तयार केली ओळख रमाकांत अनेक वर्षांपासून विविध बाजारपेठांमध्ये विक्री करतात. गुणवत्ता, ताजा माल व विश्वासार्हता या कसोट्यांवर त्यांनी ग्राहकांमध्ये आपली ओळख तयार केली आहे. काही ग्राहक त्यांच्याकडे पिशवी देऊन अन्य कामांसाठी जातात. परतताना रमाकांत यांच्याकडून भरलेली पिशवी घेऊन जातात. प्रगती साधली  

  • शेतीतील उत्पन्नातूनच रमाकांत यांनी आर्थिक व कौटुंबिक प्रगती साधली. सन २०१३ मध्ये पाइपलाइन, मोटारपंपासाठी एक लाख रुपये, २०१६ मध्ये ठिबक, मल्चिंगसाठी ५० हजार रुपये,
  • २०१७ मध्ये ४० हजार रुपये कर्ज घ्यावे लागले. पण सर्व कर्जाची नियमित परतफेड शेतीतील उत्पन्नातून केली. टप्प्याटप्प्याने दुचाकी व मालवाहू वाहनही घेतले. आई, पत्नी व मुले यांच्यासोबत त्यांचा संसार सुखासमाधानाचा सुरू आहे.
  • संपर्क ः रमाकांत यादव, ७०८३८९४८३२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com