शेतीमध्ये बदलली पीक पद्धती

मादणी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील संदीप प्रकाशराव मेटांगळे यांनी नोकरी सांभाळून घरच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल केला. शेतीमध्ये पारंपरिक पिकांच्या बरोबरीने फळबाग, शेडनेट आणि बाजारपेठेचा अंदाज घेत हंगामी पिकांच्या लागवडीचे नियोजन त्यांनी केले आहे.
Sandeep Metangale in his farm.
Sandeep Metangale in his farm.

मादणी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील संदीप प्रकाशराव मेटांगळे यांनी नोकरी सांभाळून घरच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल केला. शेतीमध्ये पारंपरिक पिकांच्या बरोबरीने फळबाग, शेडनेट आणि बाजारपेठेचा अंदाज घेत हंगामी पिकांच्या लागवडीचे नियोजन त्यांनी केले आहे.  मादणी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावशिवारात मेटांगळे कुटुंबाची पन्नास एकर शेती आहे. जमीन चांगल्या दर्जाची असल्याने पारंपरिक पिकांचे चांगले उत्पादन मिळते. खरिपात सोयाबीन, तूर आणि रब्बीत हरभरा उत्पादनासाठी गावशिवाराची ओळख आहे. संदीप आणि त्यांचे बंधू अतुल हे दोघेही नोकरीच्या निमित्ताने गावापासून लांब असल्याने शेती वडील सांभाळतात. मागील पाच वर्षांपासून संदीप यांनी शेती विकासाला सुरुवात केली. अतुल हे इंदूर येथे नोकरीनिमित्त कार्यरत आहे. संदीप यांनी दहा वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र गेल्या पाच वर्षांपासून ते पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दर आठवड्याला सुटीच्या दिवशी शेतावर जाऊन पीक व्यवस्थापनाचे नियोजन करतात. त्यांचे वडील प्रकाशराव हे मजुरांकडून कामांचे नियोजन प्रत्यक्षात आणतात. त्यातून शेतीचे चित्र बदलू लागले आहे. पारंपरिक पिकांसह फलोत्पादन, बीजोत्पादनाकडे वळलेल्या पीक पद्धतीचा त्यांना आर्थिक लाभ मिळू लागला आहे. खरिपात सोयाबीन २५ एकर आणि रब्बीत २५ एकरांवर हरभऱ्याची लागवड असते. लागवडीसाठी वेगवेगळ्या जातींची निवड केली जाते. सोयाबीनचे एकरी ८ ते १० क्विंटल आणि हरभऱ्याचे ९ ते १० क्विंटल उत्पादन येते. जमिनीच्या सुपीकतेसाठी शेणखताचा वापर केला जातो. सध्या मेटांगळे कुटुंबाकडे तीन म्हशी आहेत. याचबरोबरीने गरजेनुसार परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून शेणखताची खरेदी केली जाते. पाणी व्यवस्थापनाचे नियोजन  मेटांगळे कुटुंबीयांनी पन्नास एकर क्षेत्रासाठी बारमाही सिंचन व्यवस्था केली आहे. तीन विहिरींवर सौरऊर्जा पंप बसविले आहेत. शाश्‍वत पाणीपुरवठ्यासाठी शेतीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रकल्पापासून पाइपलाइन करून शेतामध्ये पाणी आणले आहे. जानेवारी अखेरपर्यंत विहिरी तळ गाठतात. त्यामुळे शाश्‍वत पाणीपुरवठ्यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या योजनेतून मागील वर्षी ३४ मीटर बाय ३४ मीटर आकारमानाचे शेततळे घेतले. यामुळे फळबागा  तसेच बागायती पिकांसाठी पाण्याची व्यवस्था निर्माण झाली. या पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी त्यांनी ठिबक, तुषार सिंचनाचा अवलंब केला आहे.  रोजगारनिर्मितीला चालना  शेतीत पीक पद्धती बदलण्याचा फायदा जसा मेटांगळे कुटुंबाला होत आहे, तशाच पद्धतीने रोजगारनिर्मितीलाही मदत झाली. या शेतीतील कामांसाठी वर्षभर ९ ते १० महिला मजूर व दोन पुरुष कामाला असतात. हंगामात ही संख्या आणखी वाढते. शेडनेट उभारल्यामुळे कुशल कामगारांची निर्मिती होऊ लागली आहे. शेडनेटमध्ये बीजोत्पादन घेताना परपरागीकरण, बीजनिर्मिती आणि इतर तांत्रिक कामे सांभाळण्यासाठी मजूर तयार होत आहेत. त्यामुळे मजुरांमध्येही कौशल्य विकास आणि उत्पन्न वाढ होत आहे.  अर्ध्या एकरात शेडनेट  मेटांगळे कुटुंब संरक्षित शेतीकडे वळले आहे. कृषी विभागाच्या मदतीने त्यांनी २० गुंठे क्षेत्रावर शेडनेट उभे केले. यंदा त्यामध्ये टोमॅटोचे बीजोत्पादन घेतलेले आहे. यासाठी खासगी बियाणे कंपनीसोबत करार केला आहे. टोमॅटोचे आतापर्यंत २५ किलो बियाणे तयार झाले  आहे. जल, मृद्‍संधारणासाठी  बांधबंदिस्ती  मेटांगळे यांनी जल, मृद्‍संधारणासाठी संपूर्ण शेताची बांधबंदिस्ती करून घेतली. आयडब्ल्यूएमपी योजनेच्या साह्याने त्यांनी हे काम केले. बांधबंदिस्तीमुळे संपूर्ण शेतशिवारात पडणारे पावसाचे पाणी जागेवर मुरते. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून रहातो. विहिरीमध्येही पाणीपातळीत वाढ होते. शेताचे बांध मोठ्या आकाराचे असल्याने त्यावर दरवर्षी तुरीची लागवड केली जाते. यंदा संपूर्ण मोठ्या बांधावर लावलेल्या तुरीचे १० क्विंटल उत्पादन मिळाले. काही बांधावर केसर आंबा कलमे आणि साग रोपांची लागवड केली आहे.त्यामुळे बांधाची जागा देखील उत्पादनक्षम झाली आहे.  संत्रा बागेचे नियोजन  खरीप, रब्बी हंगामावर अवलंबून असलेल्या या भागात फलोत्पादनाचे क्षेत्र विस्तारत आहेत. संदीप यांनी काळानुरूप कुटुंबाच्या शेतीत पीक पद्धतीमध्ये बदलाला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी संत्रा लागवडीवर भर दिला. सध्या त्यांच्याकडे १५ एकरांत संत्रा बाग उभी होत आहे. यातील काही लागवड ही चार वर्षांपूर्वी, काही तीन व दोन वर्षांपूर्वीची आहे. नागपुरी संत्र्यासह दीड एकरात किन्नो संत्र्यांची त्यांनी लागवड केली आहे. सध्या योग्य व्यवस्थापनामुळे चांगली वाढ होत आहे.   मेटांगळे संत्रा बागेत हंगामानुसार विविध आंतरपिकांचे नियोजन करतात. यंदा चार एकरांमध्ये त्यांनी पपई आणि हळदीची लागवड केली. पपईच्या आंतरपिकातून खर्च वजा जाता चांगला दर असल्याने एक लाखाचे उत्पन्न मिळाले. सध्या हळदीच्या पिकाची देखील जोमदार वाढ झाली आहे. संत्रा कलमे वाढीच्या अवस्थेत असल्याने पपई, हळद वाढीसाठी कुठलाही अडथळा आलेला नाही. सात एकर संत्रा लागवडीमध्ये बीजोत्पादनासाठी कांदा लागवड आहे. दरवर्षी कांदा बीजोत्पादनातून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. गेल्या वर्षी त्यांनी तीन एकरामध्ये केळी लागवड केली होती. वाढीच्या पहिल्या टप्यात आंतरपीक म्हणून त्यांनी हरभरा लागवड केली. हरभऱ्याच्या उत्पन्नातून केळी लागवडीचा खर्च निघाला. यंदा दीड एकरातील किन्नो संत्र्यामध्ये आच्छादन तंत्राचा वापर करून टरबूज, मिरची लागवड केली असून, ही दोन्ही पिके चांगली बहरलेली आहे. संपर्क- संदीप मेटांगळे,  ७३५०४०५७७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com