मोबाईल अन्‌ प्रक्षेत्रभेटीतून मिळतोय पीक, पशू व्यवस्थापन सल्ला

हवामान बदलाच्या काळात तातडीने हवामान, पीक नियोजन सल्ले महत्त्वाचे ठरतात. हे सल्ले शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी मागील अडीच वर्षांपासून बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्राने मोबाईल तंत्रज्ञान आणि प्रक्षेत्र भेट उपक्रमाचा चांगला उपयोग केला आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला आहे.
मोबाईल अन्‌ प्रक्षेत्रभेटीतून मिळतोय पीक, पशू व्यवस्थापन सल्ला
Expert from Krishi Vigyan Kendra giving advice on crop management and agricultural message on mobile.

हवामान बदलाच्या काळात तातडीने हवामान, पीक नियोजन सल्ले महत्त्वाचे ठरतात. हे सल्ले शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी मागील अडीच वर्षांपासून बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्राने मोबाईल तंत्रज्ञान आणि प्रक्षेत्र भेट उपक्रमाचा चांगला उपयोग केला आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला आहे. शेतीत अपेक्षित उत्पादन, उत्पन्न मिळविण्यासाठी पेरणीयोग्य जमीन तयार करण्यापासून ते कापणी, मळणी करून तयार झालेला शेतीमाल साठवणूक महत्त्वाची बाब. तसेच बाजारपेठेतील दळणवळणापर्यंत हवामान आणि त्याचे घटक (कमाल तापमान, किमान तापमान, वाऱ्याचा ताशी वेग, वाऱ्याची दिशा, आर्द्रता, पर्जन्यमान, आकाशाची अवस्था-निरभ्र/ढगाळ आणि प्रखर सूर्य किरणांचा कालावधी.) सातत्याने बदलत आहेत. त्याचा शेतकऱ्यांच्या अर्थचक्रावर परिणाम होताना दिसतो. शेतकऱ्यांना संवेदनक्षम हवामान बदलाशी समरस करता यावे यासाठी भारतीय मौसम विज्ञान विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी विद्यापीठांचा संयुक्त उपक्रम म्हणून देशातील हवामान संवेदनशील जिल्ह्यात जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्रांची सुरुवात झाली. सध्या राज्यातील अकरा कृषी विज्ञान केंद्रात हा उपक्रम सुरू आहे. त्यामधील एक केंद्र बुलडाणा कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत आहे. हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका भारतीय हवामान खाते (आयएमडी) हे पाच दिवसांचा अंदाज जिल्हा केंद्राला पाठवते. त्यानुसार केंद्रातील तज्ज्ञ त्यांच्या विषयाशी निगडित पीक व पशू व्यवस्थापनाबाबत सल्ले देतात. त्याचे एकत्रित संकलन करून कृषी सल्ला पत्रिका तयार केली जाते. त्यातील संदेश शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलवर पोचवला जातो. यामध्ये दिल्या जाणाऱ्या सल्ल्याला शास्त्रीय आधार, शिफारस असते. बुलडाणा येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. या केंद्राद्वारे गेल्या अडीच वर्षांपासून दर मंगळवार आणि शुक्रवारी सुमारे ३० हजारांवर शेतकऱ्यांना मोबाईलवर हवामान आधारित कृषी सल्ला पाठवला जातो. कृषी विज्ञान केंद्रातील कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार, कृषी अभियंता राहुल चव्हाण, प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल तारू यांच्या समन्वयातून देण्यात येणारा कृषी सल्ला बुलडाणा जिल्ह्याच्या १३ तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतो आहे.

 • तेरा तालुकानिहाय आणि पीकनिहाय कृषी सल्ला पत्रिका. याद्वारे येत्या पाच दिवसाच्या काळात हवामान अंदाजानुसार पिकांमध्ये करावयाची कामे, कीड, रोग व्यवस्थापन, सिंचन, खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, आंतरमशागत, मूलस्थानी मृद्‌ व जल संवर्धन, माती परीक्षण, फळबाग व्यवस्थापन, कापणी व साठवणूक सल्ला.
 •  पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, शेळीपालन सल्ला.
 •  हवामान अंदाजाच्या आधारे शेतकऱ्यांचे नियोजन.
 •  कृषी पत्रिकेचे नोंदणीकृत ३० हजारांवर वाचक.
 •  विविध तालुक्यांचा विचार करता बुलडाणा ३,१७७, चिखली ३,८५०, देऊळगावराजा २५६८, जळगाव जामोद १,००५, खामगाव २,७२७, लोणार २,४९४, मलकापूर १,७३३, मेहकर ३२८४, मोताळा २,४९२, नांदुरा १,८६७, संग्रामपूर १,२७२, शेगाव ९९४, सिंदखेडराजा २,६५९ असे एकूण तेरा तालुक्यातील ३०,११८ शेतकऱ्यांपर्यंत कृषी सल्ला जातो. याशिवाय शेतकरी ते शेतकरी आणि राज्य शासनाच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या समन्वयाने हा सल्ला सुमारे एक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो.
 •  शेतकऱ्यांच्या शेतीवर दर बुधवार आणि गुरुवारी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन. यामध्ये कृषी विज्ञान केंद्रातील सर्व विषय तज्ज्ञांचा समावेश.
 • कृषी सल्ला पत्रिकेची उपयोगिता  जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे दिल्या जाणाऱ्या हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिकेची उपयोगिता जाणून घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून जमिनीची मशागत, पेरणी (जातींची निवड, बीजप्रक्रिया, बियाण्याचे प्रमाण / हेक्टर, पेरणी पद्धत), खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, ओलित व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, कापणी, मळणी, साठवणूक अशा शेतीच्या कामात हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिकेचा किती अंशी उपयोग झाला याची प्रतिक्रिया म्हणून गुगल फॉर्म आणि भारतीय हवामान खात्याच्या प्रमाणकानुसार नोंद प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आणि हंगाम संपताना घेतली जाते. आजपर्यंत साडेसातशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी यामध्ये आपल्या नोंदी जमा केल्या आहेत. हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिकेचा उपयोग शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांनुसार आणि तालुक्यातील हवामान परिस्थितीनुसार होतो. जिल्ह्यातील शेतकरी संवेदनक्षम हवामान बदलाशी समरस व्हावा, तसेच प्रत्येक शेतकऱ्याने हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिकेचा अवलंब करून हवामान साक्षर होऊन आपल्या शेतीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांचे अनुभव ‘‘या वर्षी सोयाबीन काढणीला आले असताना पावसामध्ये चार-पाच दिवसांचा उघाड असेल, अशी माहिती मिळताच मी हा काळ साधून ७५ क्विंटल सोयाबीन वाचवले. त्यानंतर पुढे सलग पाऊस झाला. सध्या अनेक जण हवामानाचे अंदाज देतात. परंतु ते मान्य न करता पहिल्यांदा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करून माहिती तपासतो. या पत्रिकेतून पुढील पाच दिवसांचे हवामान अंदाज तसेच पीक सल्ला, फळबाग नियोजन, भाजीपाला विक्री व्यवस्थापन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, पिकाची काढणी व साठवणुकीविषयी आमच्या शिवारातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते. ही माहिती माझ्या गावातील शेतकऱ्यांना देतो. - मोहन जगताप, (वळती, जि. बुलडाणा) ‘‘यंदा मी १९ जूनला सोयाबीनची पेरणी करणार होतो. जमिनीत ओल कमी होती. परंतु मी पेरणीपूर्वी ‘केव्हीके‘ला संपर्क केला. तज्ज्ञांनी सांगितले, की आणखी तीन ते चार दिवस पेरणी करू नका. पावसाची शक्यता नाही. हा सल्ला लक्षात घेऊन पुढे पावसाच्या अंदाजानुसारच सोयाबीन पेरणी केली. कीड, रोगनियंत्रणासाठी सल्ला फायद्याचा ठरला. आम्ही शेतकरी गावात कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला ‘शेतकरी हवामान जागरूकता अभियान’ कार्यक्रम घेत असतो. - विजय भुतेकर (सवणा, जि. बुलडाणा) संपर्क : मनेश यदुलवार,९८८१३४४०६८ डॉ. अनिल तारू, ९४०५०४५२६४

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com