महिला बचत गटांना ‘नई रोशनी’चा आधार

परभणी येथील नई रोशनी लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना पूरक उद्योग सुरू करण्यासाठी मोठा आधार मिळाला. याचबरोबरीने रूरल मार्टच्या माध्यमातून गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
Rural Mart for sale of products of woman's self help Group.
Rural Mart for sale of products of woman's self help Group.

परभणी येथील नई रोशनी लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना पूरक उद्योग सुरू करण्यासाठी मोठा आधार मिळाला. याचबरोबरीने रूरल मार्टच्या माध्यमातून गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.  परभणी जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बचत गटांच्या माध्यमातून विविध घरगुती उद्योगातून उत्पन्नाचा स्रोत मिळाल्याने अल्पसंख्याक घटकांतील महिला आत्मनिर्भर झाल्या. नाबार्डच्या सहकार्याने परभणी येथील नई रोशनी लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासह उत्पादने विक्रीसाठी व्यवस्था उभी राहिली. या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे. नई रोशनी लोकसाधन केंद्राची स्थापना  महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत अल्पसंख्याक महिला सक्षमीकरणासाठी १६ डिसेंबर, २०१६ रोजी परभणी येथे नई रोशनी लोकसाधन केंद्राची सुरुवात झाली. याअंतर्गत परभणी आणि पाथरी येथील अल्पसंख्याक महिलांचे ३१७ बचत गट आणि राष्ट्रीय जीवन्नोती अभियानांतर्गत ११८ गटांचा समावेश आहे. एकूण ४३५ बचत गटांमध्ये ४ हजार ७८६ महिला सदस्या आहेत. या गटांतील महिला सदस्यांनी आत्तापर्यंत विविध बॅंकामध्ये ५ कोटी २ लाख रुपयांची बचत केली आहे. बचत गटांतर्गत २२ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.  विविध उद्योगांना सुरुवात  विविध उपक्रम राबविण्यापूर्वी बचत गटांच्या नियमित बैठका होतात. पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. यामुळे महिलांमध्ये उद्योजकीय कौशल्य विकसित झाले. महिलांना विक्री व्यवस्थेबाबत माहिती मिळाली. बॅंकांकडून या गटांना १८ कोटी ४३ लाख रुपयाचे कर्ज मिळाले. उपलब्ध भांडवलातून आतापर्यंत ३२८ महिला बचत गटांनी २,०८६ छोटे -मोठे घरगुती व्यवसाय सुरू केले. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला-फळे विक्री, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसह शिवणकाम, ब्युटी पार्लर, बांगडी विक्री, कापड विक्री, मसाले, शेवया, पापड, लोणचे, कागदी तसेच कापडी पिशव्या, मास्कनिर्मिती आदी व्यवसाय सुरू केले. या केंद्राशी संलग्न बचत गटांपैकी समान व्यवसाय असलेल्या महिलांचे १६ गट तयार करण्यात आले आहेत. या गटांच्या उत्पादनांची विक्री स्थानिक तसेच बाहेरील बाजारपेठेत केली जाते. गटातील महिला व्हॉट्‌सॲप, फेसबुक आदी समाज माध्यमांवर ग्रुप तयार करून उत्पादनांची ऑनलाइन विक्री करतात. लॉकडाउनमध्ये मदत   लॉकडाउनमुळे रोजगार बुडाल्याने रोजमजुरी करणाऱ्या अनेक कुटुंबाच्या रोजीरोटीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य खरेदीसाठी आवश्यक शिधापत्रिका नसलेल्या महिलांना ‘एक हाथ मदतीचा’ या उपक्रमांतर्गत बचत गटातील महिला, नागरिक, विभाग यांचे सहकार्य आणि मदतीतून या महिलांना जीवनावश्यक वस्तूंच्या १५० किटचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधीस मदत महिला आर्थिक विकास महामंडळातून मिळालेल्या सामाजिक बांधिलकीचे भान राखत बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करून मिळणाऱ्या नफ्यातून गतवर्षी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १२ हजार रुपये धनादेशाद्वारे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे जमा करण्यात आले. विविध उत्पादनांची विक्री   रूरल मार्टमध्ये गहू, ज्वारी, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित हातसडीच्या विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले, पापड, लोणची,  महिला तसेच मुलींसाठी तयार ड्रेस, नऊवारी साड्या, नक्षीकाम केलेले  कपडे, सिमेंट कुंड्या, चुली आदी गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे. याचबरोबरीने कार्यालयीन उपयोगासाठीच्या कागदी फाइल्स, बॅाक्स फाइल्स, पेपर कव्हर, कागदी तसेच कापडी पिशव्या, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. रूरल मार्टमधील विविध उत्पादनांच्या विक्रीतून महिलांना मिळणाऱ्या नफ्यातून दहा टक्के रक्कम साधन केंद्र शुल्क म्हणून घेते. उर्वरित ९० टक्के रक्कम संबंधित महिला किंवा गटास दिली जाते. यामुळे बचत गटांच्या उत्पादनांचा प्रचार आणि विक्री होते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन विविध उत्पादनांचा या केंद्रामार्फत पुरवठा केला जातो. नार्बाडचे जिल्हा व्यवस्थापक प्रीतम जंगम, महिला आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय समन्वयक सिद्धराम मासाळे, जिल्हा समन्वयक नीता अंभुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नई रोशनी लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा शाहीन बेगम, व्यवस्थापक जयश्री टेहरे, मीरा कऱ्हाळे, तारामती गायकवाड, सत्यशिला गुडे, पल्लवी गडकरी, सुरेखा खाडे आदी बचत गटातील सदस्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात. उत्पादनांच्या विक्रीसाठी रूरल मार्ट  नई रोशनी लोकसंचलित साधन केंद्रातर्फे मे २०१८ मध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी परभणी शहरात विशेष दालन सुरू करण्यात आले. या दालनात परभणी शहरातील महिला बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येऊ लागली. या विशेष दालनाच्या माध्यमातून विविध उत्पादनांच्या विक्रीतून नऊ लाख रुपयांची उलाढाल झाली. यातून महिला बचत गटांना ५६, ६०० रुपये नफा मिळाला. ग्राहकांची मागणी तसेच ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने फेब्रुवारी महिन्यात या दालनाचा विस्तार करून त्याचे रूपांतर रूरल मार्ट मध्ये करण्यात आले. यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) कडून दोन वर्षांकरिता ३ लाख २१ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मिळाले. या अर्थसहाय्यामध्ये विक्री प्रतिनिधीचे मानधन तसेच जागेचे भाडे या बाबींचा समावेश आहे. फिरते विक्री केंद्र  महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी २६ जानेवारीपासून फिरते विक्री केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्‌घाटन पालक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते झाले. या फिरत्या विक्री केंद्रामार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिला बचत गटांच्या उत्पादनाची विक्री केली जाते. - जयश्री टेहरे,  ८६६८२८७३८७, (व्यवस्थापक, नई रोशनी  लोकसंचलित साधन केंद्र)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com