बारमाही भाजीपाला उत्पादन : ‘गेडेकर पॅटर्न’

सुसूत्रता, पीक विविधता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, लागवडीचा योग्य हंगाम निवडणे, बाजारपेठांचा अभ्यास अशा विविध घटकांचा अभ्यास विनायक गेडेकर (रा. पावडदौना, जि. नागपूर) यांनी केला आहे. त्यातून वर्षभर ताजे उत्पन्न देत राहणाऱ्या भाजीपाला उत्पादनाचा ‘गेडेकर पॅटर्न’ यशस्वी केला आहे.
Vinayak Gedekar taking chili production on poly mulching
Vinayak Gedekar taking chili production on poly mulching

सुसूत्रता, पीक विविधता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, लागवडीचा योग्य हंगाम निवडणे, बाजारपेठांचा अभ्यास अशा विविध घटकांचा अभ्यास विनायक गेडेकर (रा. पावडदौना, जि. नागपूर) यांनी केला आहे. त्यातून वर्षभर ताजे उत्पन्न देत राहणाऱ्या भाजीपाला उत्पादनाचा ‘गेडेकर पॅटर्न’ यशस्वी केला आहे.  पावडदौना (ता. मौदा, जि. नागपूर) गावात धान (भात), हरभरा, सोयाबीन आदी पिके घेतली जातात. येथील विनायक गेडेकर यांची वडिलोपार्जित ३५ एकर शेती आहे. सुरुवातीला त्यांनी कापड विक्री व्यवसाय केला. परंतु एवढी मोठी शेती कोणाच्या भरवशावर सोडणार अशी चिंता घरच्या वडीलधाऱ्या सदस्यांना सतावत होती. कुटुंबात पाच विवाहित बहिणी व कर्ते म्हणून विनायक हे एकुलते एक होते. अखेर विचारांती घरच्यांचा सल्ला प्रमाण मानत विनायक यांनी कापड व्यवसाय सोडून पूर्ण शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुधारित शेतीचा अंगीकार  सुरुवातीला विनायक यांनी विविध पिकांना विविध हंगामांत असलेली मागणी, दर व बाजारपेठ यांचा अभ्यास केला. अकोला, छत्तीसगड भागांत फिरून व्यावसायिक पीक पद्धतीची माहिती घेतली. त्यासाठी काही शेतकऱ्यांकडे मुक्कामही केला. पारंपरिक पिके सोडून भाजीपाला शेतीत उतरायचे नक्की केले. गेल्या काही वर्षांपासून मग अनुभव व सुधारित तंत्रज्ञान यांचा मेळ घालत टप्प्याटप्प्याने अजून सुधारणा केल्या.  वर्षभर भाजीपाला पीक पद्धत 

 • खरीप, रब्बी अशा हंगामाने वर्षभर विविध भाजीपाला पिके. प्रत्येक पिकाची लागवड प्रत्येक दीड महिन्याने. त्यामुळे एक उत्पन्न काढणीस येते त्या वेळी दुसरे उत्पादनक्षम होत असते. एका खेपेस दर चांगला मिळाला नाही तर दुसऱ्या वेळेस त्यामुळे मिळू शकतो.
 • कारले, दोडका, चवळी, पपई व त्यात कोबी, टोमॅटो, मिरची, काकडी, गिलके अशी अडीच एकरांपासून ते तीन- चार एकरांपर्यंत क्षेत्र.  
 •  ''रोटेशन’ पद्धतीत अशी सुमारे दहा पिके वर्षभर.  
 • बहुपीक पद्धतीमुळे एका पिकाचे दर पडल्यास दुसरे पीक वाचवते.  
 •  डिसेंबर- जानेवारीत सुमारे १५ एकरांत कलिंगड लागवड. एप्रिलमध्ये काढणी. दररोज सरासरी १० ते १२ टन माल हाती लागत असल्याने विविध बाजारपेठांत माल पाठविणे शक्य.
 •  प्रत्येक पिकाची सरासरी दररोज एक ते दीड टन मालाची काढणी सुरू असतेच. 
 • पपईत कोबी घेण्यात येतो. कोबी उत्पन्नातून पपईतील खर्च कमी होतो.  
 • विक्री व्यवस्था  भंडारा, रामटेक, उमरेड व नागपूरची कळमणा बाजार समिती या बाजारपेठा सुमारे ३५ ते ५० किलोमीटर अंतरावर आहेत. तेथील व्यापाऱ्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यांच्याकडून दरांबाबत ‘अपडेट’ मिळते. त्यानंतर कोणत्या बाजारात विक्रीसाठी माल पाठवायचा याबाबत निर्णय घेतला जातो. वाहतुकीसाठी स्वतःचे वाहन आहे. भाजीपालानिहाय सरासरी दर किलोला १० रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यंत मिळतात. व्यवस्थापनातील बाबी 

 • वेलवर्गीय पिकांसाठी बांबू व तारांचा मंडप असतो. बांबू सुमारे पाच वर्षे टिकतात. त्यानंतर बदलले जातात. तार काही वर्षांत खराब होऊन तुकडे पडण्यास सुरुवात होते. या समस्येचे समाधान विनायक शोधू लागले. छत्तीसगड- रायपूर भागात प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. या भागात मजबूत प्लॅस्टिक दोऱ्याविषयी (केन) माहिती मिळाली. १९० रुपये प्रति किलो त्याचा दर आहे. एकरी १५ किलो त्याची गरज राहते. मंडप टाकण्यासाठी तारांना हा पर्याय ठरतो. तारेचा टिकवण कालावधी एक वर्ष तर या केनचा तीन वर्षे असल्याचे विनायक सांगतात. 
 • शेतीमाल व निविष्ठा ने-आण करण्यासाठी शेतरस्त्यांची सुविधा केली आहे. सुरुवातीला सात एकरांवरच भाजीपाला होता. त्यातील उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने सुधारणांवर भर दिला.
 • शेती आधी कोरडवाहू होती. सिंचनाची सोय करण्यासाठी दीड लाख रुपये खर्चून ६५ फूट विहीर खोदली. विहिरीला मुबलक पाणी असल्याने बारमाही पाण्याची सोय झाली. एक बोअरवेलही घेतली असून सिंचन बळकटीकरण झाले आहे. 
 •  बहुतेक सर्व पिकांना पॉली मल्चिंगचा वापर होतो. त्यामुळे तणनियंत्रण होते. बाष्पीभवन रोखता येते. जमीन भुसभुशीत राहते. झाडाच्या मुळांना पसरण्यास मदत होते. आंतरमशागत व अन्य कामांसाठी दोन ट्रॅक्टर्सचे पर्याय आहेत.
 •  ३५ एकरांवरील भाजीपाला पिकांसाठी मध्यवर्ती स्वयंचलित ठिबक यंत्रणेचा पर्याय निवडला. त्यातून खते- पाण्याचे वेळापत्रक निश्‍चित केले जाते. सहा टँक्स असून त्याद्वारे विद्राव्य खते देण्याचे नियोजन होते. ही यंत्रणा मोबाईलशी ‘कनेक्ट’ आहे. त्यातील ‘अ‍ॅप’मध्ये वेळ निश्‍चित केल्यानंतर खतपुरवठा होतो. या यंत्रणेवर सुमारे १२ लाख रुपयांचा खर्च झाला. बँक ऑफ बडोदाने कर्ज दिले. 
 • बारमाही पीक पद्धतीतून ताजे उत्पन्न मिळत राहते. कौटुंबिक खर्चाचे नियोजन करून काही रक्कम शेती विकासासाठी खर्च होते. त्यामुळेच शेती फायद्याची करणे शक्य झाल्याचे विनायक सांगतात. 
 • हंगामाचे नियोजन   विनायक सांगतात की जूनमध्ये बहुतांश शेतकरी एकाचवेळी भाजीपाला लागवड करतात. पुढे सर्वांचा माल एकाचवेळी बाजारात येऊन दर पडतात. त्यामुळे मी लागवडीचे दोन टप्पे करतो. उदाहरणार्थ, जूनमध्ये लावलेल्या काकडीस किलोला २ रुपयांपर्यंत दर मिळाल्याचा अनुभव आला. हीच काकडी जुलैमध्ये घेतली तर गोकुळअष्टमी, गणपती उत्सव व अन्य सणांना मागणी वाढून १० रुपये दर मिळतो असे लक्षात आले. असाच विचार अन्य पिकांत केला जातो. टोमॅटो, मिरचीची लागवड सप्टेंबरच्या काळात असते. काकडी, कलिंगडाची काढणी झाल्यानंतर एक महिना शेत रिकामे ठेवले जाते. मेमध्ये जमीन तापवली जाते. त्यामुळे किडी-रोगांना अटकाव ठेवता येतो.     - विनायक गेडेकर  ९७६५८६१६९७

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com