कुक्कुटपालन, फलोत्पादनातून मिळवले आर्थिक स्थैर्य

विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर दीपक खैरनार यांना कमी पगाराची नोकरी मिळाली. पण ती रडतखडत करत राहण्यापेक्षा आपली शेती कधीही बरी, हा विचार करून फलोत्पादनाला कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. उत्तम आर्थिक नियोजनातून स्थैर्य आणि शेतीचा आनंदही मिळवत आहेत.
कुक्कुटपालन, फलोत्पादनातून मिळवले आर्थिक स्थैर्य
Deepak Khairnar feeding the birds

विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर दीपक खैरनार यांना कमी पगाराची नोकरी मिळाली. पण ती रडतखडत करत राहण्यापेक्षा आपली शेती कधीही बरी, हा विचार करून फलोत्पादनाला कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. उत्तम आर्थिक नियोजनातून स्थैर्य आणि शेतीचा आनंदही मिळवत आहेत. नाशिक जिल्ह्यातील आखातवाडे (ता. सटाणा) येथील दीपक हरिश्‍चंद्र खैरनार यांचे २००७ मध्ये विज्ञान शाखेतून पदवी मिळवली. २००८ मध्ये एका खासगी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून नोकरीही मिळाली. मात्र पगार अवघा २ हजार रुपये. त्यातून कुटुंबांचा खर्च भागण्याचीच मुश्कील. अशा नोकरीपेक्षा आपली शेतीच बरी, हा विचार करून त्यांनी पुन्हा गावाची वाट धरली. २००९ पासून अभ्यासूवृत्तीने शेती व कुक्कुटपालन व्यवसाय करतानाच कामाची एक शिस्त बसवलेली आहे. व्यवसायाला सुरुवात २००९ मध्ये नोकरी सोडल्यानंतर शेतीपूरक म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचे ठरवले. बॅंकेकडून ५ लाख रुपये कर्ज घेत ५ हजार पक्षीक्षमतेचे शेड उभारले. करार पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसायात शास्त्रीय पद्धतींचा अवलंब, त्यास उत्तम व्यवस्थापनाची जोड दिली. योग्य परतावा व सुविधा देणाऱ्या कंपनीबरोबर व्यवसाय करत आल्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून यशस्वी झाले आहेत. कंपनीकडून पक्षी, कुक्कुटखाद्य, औषधे मिळतात. तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. कुक्कुटपालन व्यवसायात एकदाच केलेल्या गुंतवणुकीवर स्वतःचे कष्ट, व्यवस्थापन यामुळे आर्थिक घडी सावरल्याचे दीपक सांगतात. काटेकोर नियोजन हीच ताकद

 • नवीन पक्ष्यांची प्लेसमेंट करण्यापूर्वी भांड्यांची स्वच्छता व पक्षिगृह निर्जंतुकीकरणासाठी बेडवर चुना मारून त्यावर भाताचे तूस पसरविण्यात येते. 
 • पिलांच्या संख्येनुसार खाद्य व पिण्याची भांड्यांची व्यवस्था.
 • कुक्कुटखाद्य खराब होऊ नये यासाठी पक्षिगृहात स्वच्छ व कोरड्या ठिकाणी साठवणूक व्यवस्था केली आहे. 
 • पक्ष्यांसाठी विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याने पाण्याचा सामू नियंत्रण, स्वच्छता व निर्जंतुकीकरणाकडे लक्ष ठेवावे लागते.  
 • उत्तम आरोग्यासाठी प्रतिजैविके व रोग प्रतिकारकशक्ती वाढीसाठी शिफारशीनुसार औषधे पाण्यातून दिली जातात. त्यामुळे पक्ष्यांची किमान मरतूक, अपेक्षित वाढ होण्यासह वजन मिळते. 
 • कुटुंब केंद्रित व्यवस्थापनामुळे मजुरांवर अवलंबून राहावे लागत नाही.
 • पिले आल्यानंतर ब्रूडिंग प्रक्रिया; पहिले २ आठवडे निरीक्षण.
 • बदलत्या हवामानात हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूंत तापमान नियंत्रण.
 • दैनंदिन पक्ष्यांचे खाद्य, औषधे, आरोग्य, वजन, मरतूक याबाबत दैनंदिन नोंदी
 • वेळापत्रक निश्‍चित केल्यानुसार दिवसातून दोन वेळेस खाद्यवितरण.
 • पिलांची मरतूक झाल्यानंतर शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. 
 • व्यवसाय दृष्टिक्षेपात 

 • एकूण पक्षिगृहे - १
 • आकारमान - १७० बाय ३० फूट
 • पक्षी संगोपन क्षमता - ५ हजार
 • एक बॅच ही ४२ ते ४५ दिवसांची. वर्षभरात ५ बॅच, सरासरी २५  हजार पक्ष्यांचे संगोपन
 • करार केलेली कंपनी पक्षी संगोपन, देखभाल व मरतूक या बाबी तपासून प्रतिकिलो पक्षी वजनाप्रमाणे सरासरी ५ रुपये प्रमाणे संगोपन दर देते. पक्षी विक्रीयोग्य (वजन २२०० ते २५०० ग्रॅम) झाल्यानंतर करार कंपनी घेऊन जाते. म्हणजेच प्रति पक्षी सरासरी १२ रुपये मिळतात. एका बॅचमागे (पाच हजार पक्ष्यांचे) ६० हजार रुपये या प्रमाणे वार्षिक (साधारण पाच बॅच) ३ लाख रुपये उत्पन्न हाती येते.   
 • एकूण उत्पादन खर्च 

 • पाणी, वीज, मजुरी प्रति पक्षी खर्च...२.५ रुपये
 • प्रति बॅच कुक्कुटपालन खर्च...१० हजार रु. 
 • (करार पद्धतीत खाद्य व औषध खर्च कंपनीकडे असतो.)
 • निव्वळ नफा 

 • ५ बॅचच्या संगोपनातून ३ लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यातून ५० ते ५५ हजार उत्पादन खर्च वजा जाता २ लाख ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा हाती राहतो. 
 • प्रत्येक बॅचनंतर ४ ट्रॉली प्रमाणे वर्षाला २० ट्रॉली खत मिळते. त्यातील निम्मे स्वतःच्या शेतीसाठी वापरले जाते. उर्वरित खत प्रति ट्रॉली ५ हजार रुपयांप्रमाणे विक्री केली जाते. त्यातून ५० हजार रुपये उत्पन्न मिळते.
 • फलोत्पादनातही अभ्यासपूर्ण कामकाज शेतीत नावीन्यपूर्ण पीक प्रयोग करण्यापूर्वी बाजारपेठेत मागणी, कमी खर्चात व कमी जोखमीची फळपिके घेण्याकडे त्यांच्या कल राहिला आहे. शेतीत बहुपीक पद्धतीचा अवलंब करणे आवडीचा भाग आहे. कमीत कमी खर्चाच्या पिकांची ते प्राधान्याने निवड करून लागवड करतात. उदा. लिंबू, बोर तर पूर्वी त्यांनी शेवगा ३ वर्षे लागवड केली होती. २०१३ पासून डाळिंब शेती सुरू केली. सुरुवातीला सिंचन सुविधांचा अभाव, नैसर्गिक आपत्ती, तेलकट डाग, मर रोग अशी अडचणी आल्या तरी त्या काळात पूरक व्यवसायातून उत्पन्न येत असल्याने तग धरता आला. शेती व पूरक व्यवसायामध्ये पत्नी सोनाली यांची मोलाची मदत होते. आवश्यकता भासल्यास बाहेरील मनुष्यबळही घेतले जाते. तण व्यवस्थापन, शेतीमाल काढणी, हाताळणी, प्रतवारी, त्यांची विक्री ही सर्व कामे ते स्वतः पाहतात. आर्थिक शिस्तीचा असाही आदर्श 

 • प्रति वर्षी किमान ५ लाखांचा निव्वळ नफा कमावण्याचे नियोजन व ध्येय दीपक यांनी ठेवले आहे. काम करणाऱ्या पती-पत्नींचे उत्पन्न प्रत्येकी २० हजार रुपये मिळालेच पाहिजे, असा त्यांचा यामागील विचार.      
 • मिळालेल्या प्रत्येक पैशांचा अचूक आणि गरजेनुसार वापर झाला पाहिजे. 
 • वर्षाला किमान ५० हजार रुपयांची बचत करण्याचा प्रयत्न असतो.  
 • आपल्या २ मुलींचे शिक्षण, भविष्यातील योजनांसाठी काही आवर्ती ठेव ठेवली जाते. विमा काढला आहे. 
 • घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर केल्यामुळे आर्थिक पत निर्माण झाली आहे. मात्र शक्यतो कर्ज, उसनवारी करण्याची गरजच भासणार नाही, याकडे लक्ष देतो. पहिल्या पाच लाखाच्या कर्जानंतर योग्य आर्थिक नियोजन केल्यामुळे उसनवारी, कर्ज यांची गरज पडली नसल्याचे ते अभिमानाने सांगतात. 
 • शेती उत्पन्नातून काही रक्कम पुन्हा शेतीत गुंतवायची. यामध्ये त्यांनी शेततळे निर्मिती, पाइपलाइन इ. कामे त्यांनी केली. 
 • - दीपक खैरनार  ९४२१५००३०३

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.