
भाजीपाला लागवडीसह कुक्कुटपालन, पशुपालन, शिलाईकाम यांसारख्या पूरक व्यवसायामधून बचत गटातील महिलांना वर्षभर रोजगार मिळू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील साठरेबांबर येथील तुळजाभवानी स्वयंसाह्यता समूह आणि वळके येथील जांगळदेव स्वयंसाह्यता समूहातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. महिला बचत गटांच्या चळवळीला चालना देण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात शासनाच्या ‘उमेद’ अभियानाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. उमेदच्या अर्चना भंडारी, प्रेरणा घडशी, पूजा भुवड, ग्रामसंघाच्या अध्यक्षा रेश्मा गावडे यांनी महिलांना एकत्रित करून समूह स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या माध्यमातून साठरेबांबर येथे जानेवारी, २०१५ मध्ये तुळजाभवानी स्वयंसाह्यता समूहाची स्थापना झाली. या समूहामध्ये अस्मी अजितकुमार शिंदे (अध्यक्ष), विजया दाजी रसाळ (सचीव), प्रेरणा प्रशांत चव्हाण (कोशाध्यक्ष), सिद्धी संदीप रसाळ, प्रमिला प्रकाश यादव, श्रावणी रसाळ, अनुष्का शिंदे, विजया सावंत, रेश्मा यादव, अनिता शिंदे, स्वाती यादव, शुभांगी रसाळ या सदस्या कार्यरत आहेत. विविध पिकांच्या लागवडीस सुरुवात पहिल्याच वर्षी गटाने विविध पिकांच्या लागवडीचा निर्णय घेतला. घरची भातशेती सांभाळून समूहातील बारा महिलांनी मिळून दहा गुंठे जमिनीवर नाचणीची लागवड केली होती. पीक लागवडीसाठी सदस्यांना कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळाले. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी महिलांनी शेणखत, गांडूळ खताचा जास्तीत जास्त वापर केला. दहा गुंठे क्षेत्रातून गटाला ८० किलो नाचणी मिळाली. त्यातील ५० किलो नाचणी ५० रुपये प्रति किलो दराने विकली. उर्वरित तीस किलो नाचणी त्यांनी गटामध्ये वाटून घेतली. त्यानंतर गटाने कुळीथ लागवड केली. तीन महिन्यात त्यांना १०० किलो उत्पादन मिळाले. कुळथाची साठ रुपये प्रति किलो दराने विक्री केली.
कलिंगड लागवड भाजीपाला लागवडीनंतर गटाने दहा गुंठे जमिनीवर कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला. तीन महिन्यात ८०० किलो कलिंगड उत्पादन झाले. जागेवर पाच रुपये प्रमाणे विक्री झाली. फळाचा आकार लहान असल्यामुळे कमी दर मिळाला. परंतु कलिंगडमधून उत्पन्नाची शाश्वती अधिक असल्याने दरवर्षी कलिंगड लागवड केली जाते अशी माहिती अस्मी शिंदे यांनी दिली. भाजीपाला विक्रीसाठी यंत्रणा मुंबई-गोवा महामार्गापासून चार किलोमीटर अंतरावर साठरेबांबर हे गाव आहे. पाली येथे आठवडा बाजार भरतो. हे गाव मध्यवर्ती ठिकाण असल्याने तिथे आजूबाजूच्या गावांतील लोक येतात. हे लक्षात घेऊन बचत गटातील महिला भाजीपाला विक्रीसाठी पाली बाजारपेठेत जातात. आठवड्यातील अन्य दिवशी गावातील वाडी-वस्तीवर भाजीपाला विक्री केली जाते. त्याचबरोबर काही दुकानांमध्येही भाजीपाला विक्रीसाठी ठेवला जातो. हळद लागवडीतून हमखास उत्पन्न सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या हळदीला प्रचंड मागणी असल्यामुळे गटातील प्रत्येक महिला दोन ते तीन गुंठे जमिनीवर हळद लागवड करतात. सर्व सदस्यांचे दोनशे किलोहून अधिक हळद उत्पादन होते. हळदीला प्रति किलो अडीचशे रुपये दर मिळतो. या पिकास व्यवस्थापनाचा खर्च जास्त येत नसल्यामुळे घरच्या वापराबरोबरच विक्रीमधून दोन हजार रुपये मिळतात, असे अस्मी शिंदे यांनी सांगितले. पशुपालनातून उत्पन्नाची जोड भाजीपाला लागवडीबरोबर अस्मि शिंदे यांनी पशुपालनाला चालना दिली आहे. गटातून मिळालेल्या पैशातून त्यांनी दोन गावठी आणि एक जर्सी गाय विकत घेतली. सध्या त्यांना दिवसाला दहा लिटर दूध मिळते. चाळीस रुपये प्रमाणे त्याची गावातील आठ कुटुंबांना विक्री केली जाते. संपर्क : अस्मी शिंदे, ९८६०३५८६९२ (अध्यक्ष, तुळजाभवानी स्वयंसाह्यता समूह)
वळकेतील गटाचा कुक्कुटपालनावर भर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर भातशेतीची कामे सुरू केली जातात. त्या वेळी शेतकरी मिरगातील राखण देतात. त्यासाठी कोंबड्यांना मागणी असते. हे लक्षात घेऊन वळकेतील जांगळदेव स्वयंसाह्यता समूहातील महिलांनी कुक्कुटपालनाला चालना दिली आहे. सध्या या गटामध्ये सुरेखा पातेरे (अध्यक्ष), प्राची तांदळे (सचिव), माधवी तांदळे (कोशाध्यक्ष), सुनीता गोरे, सारथी पातेरे, स्नेहल पातेरे, दमयंती सावंत, वैशाली ताम्हनकर, मयूरी जोईल, सारीका ताम्हनकर कार्यरत आहेत. कोंबडीपालनाला सुरुवात तीन वर्षांपूर्वी या महिलांनी कुक्कुटपालनाला सुरुवात केली. दहा जणींच्या या गटातील प्रत्येक महिलेकडे सरासरी २० ते २५ कोंबड्या असतात. महिलांनी कावेरी, डीपी क्रॉस आणि गावठी कोंबड्यांचे संगोपन केले आहे. महिन्यातून पाच ते सहा कोंबड्यांची विक्री होते. दीड ते पावणेदोन किलोची एक कोंबडी साधारणपणे अडीचशे ते तीनशे रुपयांना विकली जाते. जवळच असलेल्या पाली येथील बाजारपेठेमधील आठवडा बाजारात गटातील सदस्या कोंबड्या विक्रीसाठी जातात. यातून गटातील प्रत्येक सदस्याला दर महा किमान हजार रुपये मिळतात. आठवड्याच्या घरखर्चाला यामधून पैसा मिळत असल्याचे वैशाली ताम्हनकर यांनी सांगितले. ...असे आहे नियोजन
संपर्क : वैशाली ताम्हनकर, ९४२२७०१७६१ (सदस्य, जांगळदेव महिला गट) जांगळदेव गटातील महिलांना कुक्कुटपालनातून आर्थिक आधार मिळत आहे. भविष्यात प्रत्येक महिलेकडे शंभर कोंबड्यांची बॅच असावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. - प्रेरणा घडशी, प्रतिनिधी, उमेद
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.