भरडधान्यांचे मल्टिमिलेट लाडू, नाचणी बिस्किटे, नूडल्स

पुणेनजीक उरुळीकांचन येथील कृषी पदवीधर महेश लोंढे यांनी नाचणी, राळा, वरई, भगर, सावा, बाजरी, ज्वारी आदी भरडधान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. आरोग्यदायी, पौष्टिक अशा या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना आश्‍वासक बाजारपेठ तयार करून वार्षिक उलाढाल २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत नेली आहे. परदेशातही निर्यातीचा प्रयत्न सुरू आहे.
Various products made from coarse grains
Various products made from coarse grains

पुणेनजीक उरुळीकांचन येथील कृषी पदवीधर महेश लोंढे यांनी नाचणी, राळा, वरई, भगर, सावा, बाजरी, ज्वारी आदी भरडधान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. आरोग्यदायी, पौष्टिक अशा या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना आश्‍वासक बाजारपेठ तयार करून वार्षिक उलाढाल २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत नेली आहे. परदेशातही निर्यातीचा प्रयत्न सुरू आहे.   पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उरुळी कांचन येथे महेश आणि दत्तात्रय या लोंढे बंधूंचे घर व दीड एकर शेती आहे. कुटुंबात सर्वच शिक्षक आहेत. मात्र नव्या पिढीचे महेश यांनी कृषी क्षेत्रातीव पदवी घेत उद्योजक होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. भरडधान्ये अर्थात नाचणी, राळा, वरई, भगर, सावा, बाजरी, ज्वारी आदींचे आरोग्यासाठी व कुपोषण दूर करण्यासाठीचे महत्त्व महेश जाणून होते. व्यायामासोबत जीवनसत्त्वयुक्त व ग्लूटेन फ्री आहाराला ग्राहकांनी प्राधान्य दिलं तर ते फायदेशीर ठरेल असा विचार त्यांनी केला. त्या दृष्टीने या धान्यांवर आधारित उत्पादने तयार करण्यासाठी पावले उचलली. त्यासाठी भारत आणि महाराष्ट्रातील धान्यांचा अभ्यास केला. उद्योगापूर्वीची तयारी  भारतातील कोणत्या कंपन्या अशी उत्पादने तयार करतात? निर्यात कुठे होते? त्यांचे मूल्य, ‘मार्केटिंग’ कसे होते असा सर्वांगीण अभ्यास महेश यांनी केला. उत्पादने निर्मितीत कुशल होण्यासाठी हैदराबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेटस’ या संस्थेत प्रशिक्षण घेतलं. त्याच संस्थेत नोकरीची संधीही आली. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तेथे दोन वर्षे नोकरीचा अनुभवही घेतला. पण उद्योजक व्हायचं  पक्कं केलं होते. त्यामुळे राजीनामा देऊन महेश गावी परतले.  उद्योगाची सुरुवात    राष्ट्रीय कृषी योजना तसेच केंद्रीय समाज कल्याण मंत्रालयाकडून ‘ॲग्री बिझनेस प्लॅन’अंतर्गत वीस व्यक्तींची निवड झाली. त्यात महेश यांचाही समावेश होता. त्याद्वारे अनुक्रमे अडीच लाख आणि पाच लाख रुपयांचं ‘स्टार्ट अप’ भांडवल मिळालं. ‘यूथ एड फाउंडेशन’ व मुकुल माधव फाउंडेशन’ यांनीही  २५ हजार रुपये दिले. पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ‘सीईओपी’, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे ‘व्हेंचर सेंटर’, औरंगाबाद येथील मॅजिक सेंटर, रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान यांचीही मदत झाली. घराजवळच एक हजार चौरस फूट जागा उपलब्ध केली. भरडधान्य बारीक करण्यासाठी चक्की, वजनकाटा आदी बाबी घेतल्या.  उद्योग दृष्टिक्षेपात 

 • पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत करार शेती. काही माल नंदूरबार भागातील शेतकऱ्यांकडून घेण्यात येतो. 
 • ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा यांच्यापासून मिश्रलाडू (मल्टिमिलेट) हे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन.  
 • नाचणीपासून ‘ग्लुटेन फ्री’ बिस्किटे. इडली तसेच उपमा रवानिर्मिती. त्यासाठी पुण्याहून यंत्र खरेदी.
 • शेवया व नूडल्स निर्मितीसाठी हैदराबाद येथून यंत्रसामग्री. दिवसाला ५० किलोपर्यंत त्याद्वारे उत्पादन.
 • आजमितीला ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक. 
 • आश्‍वासक उलाढाल   सुरुवातीला विक्री करताना अनेक अडचणी आल्या. मात्र ग्राहकांमध्ये आरोग्यदायी उत्पादनांचे महत्त्व पटवून दिल्यानंतर व त्यांच्यात जागरूकता वाढू लागल्याने प्रतिसाद चांगला मिळत गेला. ‘मिलेट नाऊ’ असा ब्रँड तयार केला आहे. थेट ग्राहक, खासगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था व व्यावसायिक अशा विविध स्तरावर बाजारपेठ मिळाली आहे. चालू वर्षी दिवाळीत सुमारे ५०० किलो लाडू, नवरात्रीत दोन टन भगर व वरई पीठ विकले. लाडू, बिस्किटे, पोहे, नूडल्स, रवा अशा ७० हून अधिक उत्पादनांची१० टनांहून अधिक तर प्रक्रियायुक्त धान्याची २० ते २२ टनांपर्यंत विक्री झाली. सोशल माध्यमे व ऑनलाइन याद्वारे पुणे, मुंबई, नाशिकसह परराज्यांत दिल्ली, डेहराडून, बंगळूर, हैदराबाद, भुवनेश्‍वरपर्यंत आपली उत्पादने महेश यांनी पोहोचवली आहेत. गेल्या वर्षी सुमारे २५ लाखांपर्यंत तर चालू वर्षी आतापर्यंत ३२ लाख रुपयांपर्यंत उलाढाल झाली. आर्थिक वर्ष संपेपर्यंत त्यात काही लाखांची वाढ अपेक्षित आहे.   उत्पादनांचे दर (रुपये)  

 •     पाच धान्यांचा संच- पाच किलोस ५०० रु. 
 •     मल्टिमिलेट लाडू- ५०० रुपये प्रति किलो
 •     बिस्किटे- ३५० रु. प्रति किलो
 •     नूडल्स- ( ९ प्रकारचे)- प्रति नग- ६० रु. 
 •     शेवया- २०० रु. प्रति किलो
 •     मिलेट पोहे- १५० रु. प्रति किलो
 • ‘एनआरसी’ सोबत करार  नाचणीत कॅल्शिअमचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याच्या पिठाचे आणखी मूल्यवर्धन करण्याचा प्रयत्न आहे. वाइनसाठी द्राक्षे वापरल्यानंतर मागे राहणाऱ्या सालींचा समावेश या पिठात करण्याचा व  बिस्किटे तयार करण्याचा प्रयोग सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रासोबत (मांजरी- पुणे) करार केला आहे. या सालीत ‘अँटी ऑक्सिडंट्‌स’ असतात. त्यामुळे तयार होणारे उत्पादन अधिक पौष्टिक असेल. प्रायोगिक तत्त्वावर अभ्यास   पुरंदर तालुक्यातील काळदरी, बहिरवाडी या गावांतील गरोदर महिलांना अंगणवाडी सेविकांमार्फत दररोज नाचणीचा लाडू महेश यांच्यातर्फे पुरवला जात आहे. त्याच्या नियमित सेवनाने महिलांच्या शरीरात जीवनसत्त्वे व पोषक पदार्थांचे वाढणारे प्रमाण याविषयावर महेश अभ्यास करीत आहेत. महिलांमध्ये जागृती आल्यास घरच्या सर्व सदस्यांकडूनही लाडवाचे नियमित सेवन होईल. शाळेत पोषक आहार म्हणून त्याला चालना मिळेल असा प्रयत्न महेश यांचा सुरू आहे.  निर्यातीसाठी प्रयत्न महेश यांनी अग्रोझी ऑरगॅनिक कंपनीची नुकतीच स्थापन केली आहे. मुंबईच्या चेंबर्स ऑफ कॉमर्ससोबत करार करण्याचे त्यांचे प्रयत्न असून त्या माध्यमातून थायलंड, व्हिएतनाम, कोलंबिया येथे उत्पादने निर्यातीची संधी व प्रयत्न सुरू आहे.   - महेश लोंढे  ८७९९९९६२५४

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com