माळरानावर फळबागांमधून समृद्धी

वाट्याला आलेल्या डोंगराळ माळरानाची बांधबंदिस्ती केली. मेहनतीने व विचारपूर्वक आखणी करून सिंचन व्यवस्थापन व डाळिंब, सीताफळ, लिंबू आदी फळबाग उभारली. पंचवीस वर्षांपासून त्यात सातत्य ठेवले. त्यातून लोणी मसदपूर (जि. नगर) येथील विष्णू कारभारी झगडे यांनी माळरानावर समृद्धी आणण्याची किमया साधली आहे.
माळरानावर फळबागांमधून समृद्धी
pomegranate cultivation

वाट्याला आलेल्या डोंगराळ माळरानाची बांधबंदिस्ती केली. मेहनतीने व विचारपूर्वक आखणी करून सिंचन व्यवस्थापन व डाळिंब, सीताफळ, लिंबू आदी फळबाग उभारली. पंचवीस वर्षांपासून त्यात सातत्य ठेवले. त्यातून लोणी मसदपूर (जि. नगर) येथील विष्णू कारभारी झगडे यांनी माळरानावर समृद्धी आणण्याची किमया साधली आहे. नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील बहुतांश भाग दुष्काळी आहे. या तालुक्यात लोणी मसदपूर हे नगर-सोलापूर सीमेवर वसलेले गाव आहे. येथे विष्णू कारभारी झगडे यांच्यासह चौघा भावांचे कुटुंब राहते. बंधू दिलीप व कल्याण पुण्यात असतात. धाकटे बंधू सिकंदर यांचा कर्जतला व्यवसाय आहे. सर्व बंधू उच्चशिक्षित प्रत्येकाचे स्वतंत्र कुटुंब आहे. चौघा बंधूंची वडिलोपार्जित ६५ एकर शेती होती. पैकी विष्णू यांच्या हिश्‍शाला माळरानावरील २८ एकर शेती आली. तेथील जमिनीची बांधबंदिस्ती, सपाटीकरण करून ती पिकाऊ करण्यासाठी मेहनत घेतली. फळबागांतून समृद्धी

 • ज्वारी, बाजरी, गहू, कांदा ही पारंपरिक पिके होती. अकरावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर विष्णू १९८९ पासून शेतीकडे वळले. फळपिकांचे उत्पादन घेताना पंचवीस वर्षांचा अनुभव कामी आला सर्वप्रथम १९९५ मध्ये साडेतीन एकरांवर लिंबाची लागवड केली. त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागले. लिंबासोबत भाजीपाला उत्पादनालाही प्राधान्य दिले. दहा वर्षांनंतर चार एकर क्षेत्रावर पपई व त्यात कांद्याचे आंतरपीक घेतले. त्यात दीड ते दोन लाख रुपयांचा कांदा झाला. पपईनेही चांगले उत्पन्न दिले.
 • सन २००८ मध्ये पुन्हा ८ एकर पपई आणि पाच एकरांवर केळी घेतली. सन २००५ मध्ये २२ गुंठे क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन घेतले. या सर्व प्रयत्नांमधून चांगली आर्थिक प्रगती साधता आली.
 • फळबागेचा विस्तार २८ एकर खडकाळ क्षेत्रापैकी पाच ते सहा एकर क्षेत्र वहितीखाली होते. त्यात सन २०१४ पर्यत तीन वर्षे सिमला मिरची, टोमॅटोचे उत्पादन घेतले. मिरचीचे समाधानकारक उत्पन्न झाले नाही. मात्र टोमॅटोने हात दिला. सन २०१४ मध्ये सात एकरांत पपईची लागवड केली. त्यातून काही लाख रुपये उत्पन्न मिळवत आर्थिक बळकटी मिळाली. सन २०१६ मध्ये तीन एकरांत डाळिंब, दीड एकरावर पेरू, तीन एकरांत सीताफळाची लागवड केली. उर्वरित पंधरा एकर माळरानाची पुढे दुरुस्ती आणि बांधबंदिस्ती केली. अन्य ठिकाणाहून तिथे माती आणून वापरली. पुढे चार एकरांत लिंबू, अडीच एकरांत संत्रा, आठ एकरांवर डाळिंब व दीड एकरात केळी लागवड केली आहे. सध्या डाळिंब, सीताफळ, केळी, लिंबू आणि संत्रा पीक हाती येते आहे. बहुतांश वेळा जागेवरच फळांची विक्री होते. यंदा राहाता व आळेफाटा येथे डाळिंबाची विक्री केली. सरासरी ६५ रुपये प्रति किलो दर मिळाला. सीताफळाला ४० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळतो. आता शेतीची पूर्ण बांधबंदिस्ती केली आहे. ओबडधोबड शेताचे सपाटीकरण करून एकाच मापाचे टप्पे केले आहेत बांधावर तसेच शेततलावाच्या भोवती मिळून आठ विविध आंब्याच्या जातींची लागवड केली आहे. यंदा संत्रा, लिंबू पिकांत कांद्याचे आंतरपीक घेतले आहे. एक एकरांत ड्रॅगन फ्रूट घेण्याचे नियोजन आहे. व्यवस्थापनातील ठळक बाबी

 • बागेचे व्यवस्थापन व अन्य कामांसाठी दररोज दोन पुरुष व साधारण पाच ते सहा महिला मजूर कार्यरत असतात. पत्नी पुष्पा यांच्यासोबत विष्णूही शेतात राबतात.
 • संपूर्ण पंचवीस एकरांला ठिबक सिंचन. श्रम हलके करण्यासाठी एकाच जागेवरून पाणी सोडण्यासाठी यंत्रणा केली आहे.
 • कृषी विभागाच्या अनुदान निधीतून पाऊण गुंठा जागेवर एक टन क्षमतेचे पॅकहाउस उभारले आहे.
 • माजी मंत्री राम शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील यांच्यासह विविध मान्यवर व शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.
 • विहीर पुनर्भरण चार वर्षांपूर्वी सपाटीकरण, बांधबंदिस्ती केलेल्या शेतात २०१८ मध्ये सुमारे ८० फूट खोल विहीर खोदली आहे. शेतातील पाणी शेतीतच जिरवण्यासाठी विहीर पुनर्भरणाचा प्रयोग राबवला. त्यासाठी शेतातील पाणी विहिरीच्या जवळ आणण्यासाठी वेगवेगळ्या भागातून भूमिगत पाच चाऱ्या केल्या आहेत. एक चांगला पाऊस झाला तरी विहिरीला पाणी उपलब्ध होते. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के, कृषी सहाय्यक अनिल तोडकर यांनी मार्गदर्शन केले. शेततळ्याने दुष्काळात तारले विष्णू यांनी २०११ मध्ये कृषी विभागाच्या मदतीने तीन कोटी १६ लाख लिटर क्षमतेचा शेततलाव उभारला. या भागातील तो सर्वांत मोठा असावा. येथून पाच किलोमीटर अंतरावर मांगी (ता. करमाळा) तलावाचा फुगवटा आहे. तेथून पाइपलाइन करून पाणी आणले. पावसाळ्यात तलाव भरतो. पावणेदोन एकर क्षेत्रावरील या तलावाने दुष्काळात तारले आहे. कुटुंब झाले उच्चशिक्षित अखंड प्रयत्न, चिकाटी, फळबाग पद्धतीची विचारपूर्वक केलेली आखणी, सिंचनासाठी केलेले प्रयत्न फळाला आले आहेत. आर्थिक प्रगती साधून कुटुंबातील मुले उच्चशिक्षित करता आली. सपना, स्वप्नील व सुजित ही मुले अभियंता झाली आहेत. शहरात घर घेण्याचे स्वप्नही पूर्ण करता आले. संपर्क ः विष्णू झगडे, ९६५७६९५६६१

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.