जिद्द अन् प्रयोगशीलतेतून निर्माण केली ओळख

पती निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अंगावर आली. जवळ भांडवल नाही, मात्र जिद्द होती. त्याच बळावर विंचूर (ता. निफाड, जि. नाशिक) येथील रत्नप्रभा आनंदा वाघ यांनी संधीचा शोध घेतला. प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी आवळा, नाचणीपासून पदार्थनिर्मिती आणि ग्राहकांची साखळी तयार केली.
value added products of aamla
value added products of aamla

पती निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अंगावर आली. जवळ भांडवल नाही, मात्र जिद्द होती. त्याच बळावर विंचूर (ता. निफाड, जि. नाशिक) येथील रत्नप्रभा आनंदा वाघ यांनी संधीचा शोध घेतला. प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी आवळा, नाचणीपासून पदार्थनिर्मिती आणि ग्राहकांची साखळी तयार केली.  विंचूर (ता. निफाड, जि. नाशिक) येथील श्रीमती रत्नप्रभा आनंदा वाघ यांनी शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देत परिसरात प्रयोगशील महिला शेतकरी म्हणून ओळख तयार केली आहे. पतीच्या अकाली निधनानंतर शेती आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. लहान मुले आणि घर चालवायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातून शेतीमाल प्रक्रियेबाबत प्रशिक्षण घेतले. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पहिल्यांदा आवळा प्रक्रियेला सुरुवात केली. शेतीमध्ये हंगामी भाजीपाला पिकांचे नियोजन केले.  प्रक्रिया उत्पादनांच्या गुणवत्तेवर बाजारपेठेत अल्पावधीत त्यांनी ओळख तयार केली. यातून प्रपंच सावरला, घराचे स्वप्नही साकारले. परिस्थितीशी दोन हात करत मुलांनाही चांगल्या पद्धतीने घडवले. सध्या दीड एकर शेतीमध्ये कांदा, शेपू, पालक, मेथी, हिरवी मिरची, लसूण, भेंडी, गवार लागवड असते. सेंद्रिय उत्पादनावर त्यांचा भर आहे. शेतकरी गटाच्या त्या सक्रिय सदस्या आहेत. स्वतःपुरते मर्यादित न राहता परिसरातील आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडून कच्च्या मालाची खरेदी सुरुवातीला रत्नप्रभा वाघ नाशिकमधून आवळ्यांची खरेदी करत होत्या. मात्र वाहतुकीची अडचण आणि माफक दरात आवळ्याची उपलब्धता होण्यासाठी त्यांनी येवला, विंचूर बाजारपेठ निवडली. प्रक्रिया उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात कृषी विज्ञान केंद्रातील गृह विज्ञान शाखेच्या विषय विशेषज्ञ अर्चना देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रक्रियेसाठी दर्जेदार आवळ्यांची उपलब्धता स्थानिक पातळीवर कशी होऊ शकेल याचा अभ्यास केला. त्यानुसार येवला, विंचूर परिसरातील शेतकऱ्यांकडून थेट आवळा खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना दोन पैसे जास्तीचे मिळावेत, असा त्यांनी दृष्टिकोन जपला.त्यामुळे आता थेट शेतकऱ्यांकडून प्रक्रिया उद्योगाला आवळ्याचा पुरवठा होतो. गरजेनुसार वर्षभरात १५ क्विंटलपर्यंत आवळ्याची खरेदी होते.   ‘मयूरी गृह उद्योग’ नावाने ब्रॅण्ड आवळ्यावर प्रक्रिया करून कॅण्डी, मुखवास, सुपारी, सरबत आणि लोणचे निर्मितीवर भर दिला आहे. याचबरोबरीने नाचणी पापड, फिंगर चिप्स तसेच विविध प्रकारचे पापड व वाळवणाचे पदार्थही त्या बनवितात. उत्पादन खर्च जाऊन दोन पैसे कसे उरतील, अशा पद्धतीने वाघ यांनी प्रक्रिया उद्योगाचे नियोजन केले.   ‘मयूरी गृह उद्योग’ या नावाने त्यांनी उत्पादनांचे ब्रॅण्डिंग केले. कोणत्याही रासायनिक पदार्थांशिवाय संरक्षित केलेली ही उत्पादने आहेत. ग्राहकांची मागणी ओळखून साखर, गूळ, मीठ यांचा वापर करून विविध आवळा उत्पादनांची निर्मिती केली जाते. मधुमेह रुग्णांकडून अत्यंत कमी साखर असलेल्या आवळा कॅण्डीला मागणी असते. महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली, हरियाना, राजस्थान, छत्तीसगड राज्यांतील प्रदर्शनात सहभागी होत उत्पादनांची बाजारपेठ विस्तारली. सेंद्रिय उत्पादनांच्या निर्मितीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर आठवडे बाजार, विविध प्रदर्शने, मेळावे यामध्ये देखील उत्पादनांची विक्री होते. स्वच्छता, चव आणि गुणवत्तेवर त्यांनी विशेष भर दिल्याने ग्राहकांच्याकडून विविध उत्पादनांना चांगली मागणी असते. वर्षभरात प्रक्रिया उद्योगातून दीड लाखांची उलाढाल होते.  मनुका विक्रीची जोड आवळ्याची उपलब्धता हंगामी असते. त्यामुळे वर्षभर विक्री व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी आवळा उत्पादनांना जोड म्हणून रत्नप्रभा वाघ या थेट शेतकऱ्यांकडून मनुक्यांची घाऊक पद्धतीने खरेदी करतात. मनुक्यांची प्रतवारी करून ग्राहकांना मागणीनुसार पाकिटातून विक्री केली जाते. यातून वर्षभरात पन्नास हजारांची उलाढाल होते. प्रशिक्षणातून पूरक उद्योगाला चालना काळाची गरज ओळखून रत्नप्रभा वाघ यांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड देण्याचा निर्णय घेतला. यासाठी आवळा, सोयाबीन, नागली प्रक्रिया, मधमाशीपालन, गांडूळ खतनिर्मिती, पॉलिहाउस व्यवस्थापन, बचत गट निर्मिती या प्रशिक्षणात सहभागी झाल्या. याशिवाय भारत सरकारच्या सूक्ष्म व लघू उद्योग मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित ‘उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रमातही त्यांनी भाग घेतला होता. यामुळे देशातील बदलत्या बाजारपेठेनुसार उत्पादन, गुणवत्ता जपत प्रक्रिया उत्पादनांचा पुरवठा याबाबत कौशल्य त्यांनी आत्मसात केले.  पंचशील महिला बचत गटाची उभारणी प्रशिक्षण, उत्पादन निर्मिती आणि थेट विक्रीमुळे रत्नप्रभा वाघ यांचा आत्मविश्‍वास उंचावला. अनुभवातून त्यांनी पंचशील महिला बचत गटाची उभारणी केली. या माध्यमातून परिसरातील महिलांना त्या मार्गदर्शन करतात. स्थानिक पातळीवर उपलब्ध कच्च्या मालावर प्रक्रिया उद्योगाची उभारणीकरून महिलांना रोजगार देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कृषी विज्ञान केंद्र, नाशिक यांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. आकाशवाणीवरील चर्चेमध्येही त्या सहभागी होतात. आज ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांच्या प्रक्रिया उद्योगाला भेट देतात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार, प्रदर्शने बंद झाल्याने उत्पादनांची विक्री व्यवस्था अडचणीत आली. या अडचणीवर मात करत रत्नप्रभा वाघ यांनी देशी कोंबडीपालनाला सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे ४० कोंबड्या आहेत. ग्राहकांना कोंबडी आणि अंड्याची विक्री केली जाते.यातून दर महिन्याला सरासरी चार हजार रुपये उत्पन्न मिळते.  देशपातळीवर गौरव 

  • फळ प्रक्रियेतून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी डॉ. एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनकडून ‘रिसर्च फेलो’ म्हणून सन्मान.
  • स्नेहबंध सेवाभावी संस्था, नाशिक यांच्याकडून ‘आदर्श माता पुरस्कार’.
  • महाराष्ट्र शासनाच्यावतीने फळप्रक्रिया उत्पादनांची यशस्वी विक्री केल्याबद्दल ‘विशेष प्रशस्तीपत्र’ देऊन सन्मान.
  • ‘ॲग्रोवन’मुळे उद्यमशीलतेला चालना रत्नप्रभा वाघ दैनिक ‘ॲग्रोवन’च्या नियमित वाचक आहेत. या माध्यमातून महिला सक्षमीकरण संबंधित यशोगाथा, नवीन संकल्पना मिळतात. त्यामुळे बाजारातील संधी समजतात. शेतकऱ्यांसोबत उद्यमशील महिलांसाठी ‘ॲग्रोवन’ दिशादर्शक असल्याचे त्या सांगतात. ॲग्रोवन प्रदर्शनात सहभागी होऊन त्यांनी उत्पादनांची यशस्वी विक्री देखील केली आहे.  - रत्नप्रभा वाघ,  ९८८१३१२६९०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com