कुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती

न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४ प्रयोगशील महिला दोन बचत गटांच्या माध्यमातून एकत्र आल्या. गेल्या दोन वर्षांत या महिला विविध प्रकारची प्रशिक्षणे घेऊन स्वयंपूर्ण बनल्या आहेत.शेतीपूरक व्यवसायांच्या बरोबरीने विविध प्रकारचे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन महिला स्वयंपूर्ण बनल्या आहेत.
vermicompost production and poultry chicks upbringing
vermicompost production and poultry chicks upbringing

न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४ प्रयोगशील महिला दोन बचत गटांच्या माध्यमातून एकत्र आल्या. गेल्या दोन वर्षांत या महिला विविध प्रकारची प्रशिक्षणे घेऊन स्वयंपूर्ण बनल्या आहेत. लॉकडाउन सारख्या कठीण काळातही त्यांचे आर्थिक स्रोत मजबूत झाले. शेतीपूरक व्यवसायांच्या बरोबरीने विविध प्रकारचे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन महिला स्वयंपूर्ण बनल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदेरी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरी गावापासून चार किलोमीटर अंतरावर न्यू राजापूर (काळमवाडी वसाहत) हे गाव आहे. या गावातील अंबिका आणि गृहिणी महिला बचत गटाच्या २४ महिलांनी एकत्र येऊन दोन वर्षांपासून विविध व्यवसाय सुरू केले आहेत.  पोषण बागेतून नवी दिशा  महिला गटाच्यादृष्टीने पोषण बाग ही एक नवीन संकल्पना ठरली आहे. महिलांना स्वयंसिद्धा संस्थेच्या मार्फत पोषण बागेचे व्यवस्थापन शिकवण्यात आले. यामध्ये सेंद्रिय भाजीपाला करताना कोणती काळजी घ्यावी याचे बारकावे सांगण्यात आले.  यानुसार वैशाली पाटील व उज्वला पाटील यांनी पोषण बागेची उभारणी केली. वैशाली पाटील यांच्या एक गुंठे क्षेत्रामध्ये पोषण बागेचा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये सुमारे १७ प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात आली. पोषण बागेतील भाजीपाला पिकांना गांडूळ खत आणि व्हर्मिवॉशचा वापर करण्यात आला. पोषण बागेमध्ये शेपू ,पोकळा, मुळा, मेथी, दोडका, कारली, वांगी, दुधी, भोपळा, गवारी, भेंडी कोथिंबीर, उन्हाळी काकडी, घेवडा आदी भाजीपाल्याची लागवड करण्यात आली. कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क, कांदा, लसूण, मिरची अर्काचा वापर करण्यात आला. सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला  उत्पादन केल्याने या भाज्यांना परिसरातूनही मागणी आली.  दैनंदिन स्वयंपाकासाठी भाजीपाला वापरून उर्वरित भाजीपाला परिसरातील ग्राहकांना विकण्यात आला. यातून या महिलांना सुमारे अडीच हजार रुपयांचा फायदा झाला. कमी क्षेत्रातही चांगल्या पद्धतीने भाजीपाल्याची लागवड केल्यास दररोज विक्री होऊ शकते, याचा अनुभव या महिलांना मिळाला. पोषक बागेची पद्धत या महिलांनी पुढे सुरू ठेवली आहे.      लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर कुठेच भाजीपाला मिळत नव्हता, पण या महिलांकडे विविध प्रकारचा भाजीपाला उपलब्ध असल्याने ग्राहकांनी घरी येऊन भाजीपाल्याची खरेदी केली. छोट्या क्षेत्रात विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली तरी दररोजच्या खर्चासाठी ही रक्कम उपयुक्त ठरत असल्याचे वैशाली पाटील यांनी सांगितले.  - वैशाली पाटील  ७७५७९५७७६५ कुक्कुटपालनातून मिळाले आर्थिक स्थैर्य शेतीला जोडधंदा म्हणून वैशाली डोंगरे यांनी सुधारित गावरान कोंबड्यांचे संगोपन सुरू केले. याबाबत त्या म्हणाल्या, की बचत गटात येण्यापूर्वी आम्ही केवळ शेतीवर अवलंबून होतो. जेवढे शेतात पिकते तेवढ्यावरच समाधान मानावे लागत होते. दोन वर्षांपूर्वी आम्ही बचत गटांच्या माध्यमातून एकत्र आलो आणि आम्हाला व्यवसायाचे एक नवी दिशा मिळाली. माझ्याकडे पहिल्यापासून दहा ते बारा कोंबड्या होत्या पण बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला याबाबतचे प्रशिक्षण मिळाले. काही ठिकाणी आम्ही भेटी दिल्या. यामुळे कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त व्यवसाय कसा करायचा याचे गणित समजले. यानुसार आम्ही गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. अंडी आणि कोंबड्यांची विक्री असे व्यवसायाचे स्वरूप ठेवले.  लॉकडाउनच्या काळात बाजारपेठ बंद असल्याने आमच्याकडील कोंबड्या आणि अंड्यांना चांगली मागणी होती. पहिल्यांदा मी २५ रुपयांस एक या प्रमाणे एक दिवसाची कोंबडी पिले आणली. पहिले २१ दिवस ही पिले सांभाळली.त्यानंतर त्याची ८० रुपयांना विक्री केली. काही कोंबड्या तीन महिने वाढवून त्यांची मागणीनुसार प्रति किलोस तीनशे ते पाचशे रुपये या दराने विक्री सुरू केली. गेल्या वर्षभरापासून आम्ही या व्यवसायात प्रगती केली आहे. या वर्षभरात ठरावीक कालावधीत आम्ही चारशे कोंबड्यांची विक्री केली आहे. सध्या दररोज ८० ते १०० अंडी आमच्याकडून विकली जातात. एक अंडे सात रुपये प्रमाणे विकले जाते. आमच्या गावाच्या जवळ हुपरी, पट्टणकोडोलीसारखी व्यापारपेठ असल्याने कोंबडी आणि अंड्यांना चांगली मागणी आहे. कुक्कुटपालनात घरचे सगळे सदस्य मदत करतात. ठरावीक वेळेत कोंबड्यांना लसीकरण, खाद्य पाणी नियोजन वेळेनुसार केले जाते. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असताना कुक्कुटपालन व्यवसाय आमच्यासाठी खूप फायदेशीर ठरला. कोंबडी खताचा वापर शेतीसाठी केला. गेल्या तीन महिन्यातील खर्च वजा जाऊन पंचवीस हजार रुपये शिल्लक राहिले. गट स्थापनेपूर्वी शेतीशिवाय अन्य कोणताच उत्पन्नाचा स्रोत फारसा नव्हता, पण कुकुटपालनामुळे दररोज पैसा मिळत असल्याने आम्हाला हा व्यवसाय आर्थिक आधार देणारा ठरला आहे. - वैशाली डोंगरे  ९०७५९५२६०९ दहा महिलांनी सुरू केले कुक्कुटपालन वैशाली डोंगरे यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केल्यानंतर अन्य महिलांनाही या व्यवसायाचा फायदा लक्षात आला. यातून दहा नवीन लघू उद्योजक महिला तयार झाल्या. डोंगरे यांच्याकडून अंडी घेऊन पिले तयार करून त्याची विक्री करण्याला महिलांनी प्राधान्य दिले. छोट्या प्रमाणात का होईना कुक्कुटपालनातून दररोज आर्थिक कमाई होण्यास सुरुवात झाली आहे.  ‘स्वयंसिद्धा’कडून मार्गदर्शन... न्यू राजापूरच्या महिलांनी चिकाटीने, जिद्दीने अनेक व्यवसाय सुरू केले आहेत. त्यात त्यांना यश येत आहे. कोल्हापुरातील 'स्वयंसिद्धा‘संस्थेतर्फे त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये शेती व शेतीपूरक उद्योग, खाद्यपदार्थ निर्मिती आणि विक्री, फळबाग लागवड, रोपवाटिका, मशरूम निर्मिती आदींचे प्रशिक्षणही दिले जाते. याचा मोठा फायदा महिलांना झाला आहे. महिलांचे परिश्रम लक्षात घेऊन काही बँका त्यांना कर्ज देण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि. यांनी या महिलांना प्रशिक्षण देऊन आर्थिक बळ दिले. ‘स्वयंसिद्धा‘च्या संचालिका कांचनताई परुळेकर यांनी सातत्याने महिलांना प्रोत्साहित करण्याचे काम केले. तसेच वैजयंती पाटील या महिलांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन  करतात. - वैजयंती पाटील, (प्रशिक्षक)  ९५७९६३९३१४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com