
कुठल्याही व्यवसायात टक्के-टोणपे, यश -अपयश येतच असतात. कागदावर व्यवसायाची गणिते मांडून कोणी यशस्वी होत नाही. त्यासाठी हवी असते जिद्द व मेहनत. त्या बळावरच संतोष प्रमोद पुणजे या युवकाने साहिवाल पालनात यशाकडे झेप घेतली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगापासून वीस कि.मी. अंतरावर सरवडी गाव. येथे संतोष पुणजे यांची वडिलोपार्जित पंधरा एकर अर्ध बागायती शेती. वडिलांचा लातूर येथे साखरेचा व्यवसाय. संतोषचे सर्व शिक्षण लातूर येथे झाले असले तरी लहानपणापासून त्याला शेती व गुराढोरांची खूप आवड. २००३ मध्ये बी. कॉम.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर शेतीत कामाला सुरुवात केली. ठिबकवर तूर, आले, झेंडू, ऊस अशा प्रयोगातून बऱ्यापैकी उत्पादन मिळवलेले. सुमारे दहा वर्षे साठ कि.मी. जाऊन येऊन शेती करताना निसर्गाच्या बेभरवशीपणामुळे फारसे हातात शिल्लक उरत नव्हते. त्यातच २०१५ मध्ये वडिलांचे अकाली निधन झाल्याने कुटुंबाचा भार संतोषवर पडला. वडिलांच्या व्यवसायात त्याला फारसा रस नव्हता. त्यामुळे दुधाच्या व्यवसायाचा विचार सुरू केला. जिल्ह्याच्या ठिकाणी दर्जेदार दुधाला मागणी खूप. म्हशी किंवा संकरित गाईंपेक्षाही देशी गाईंचे पालन करण्याचा निर्णय घेतला. देशी गायींमध्ये कोणत्या घ्यायच्या, याबाबत विचार सुरू केला. गीर गाई मराठवाड्यातल्या हवामानात, त्यातही बंदिस्त गोठ्यात यशस्वी झाल्याचे उदाहरण त्याला आढळले नाही. देवणी, लाल कंधारी या स्थानिक गाईचे दूध उत्पादन कमी. म्हणून कोरडा चारा, शुष्क वातावरणात टिकून राहणाऱ्या व चांगले दूध देणाऱ्या मध्यम बांध्याच्या, लाल व गव्हाळ रंग, काटक शरीरयष्टीच्या साहिवाल पालनाचा विचार पक्का केला. २०१७ ला गावाच्या पुनर्वसनासाठी गावाशेजारची २ एकर शेती गेल्याने बऱ्यापैकी पैसे हातात आलेले. मे २०१८ मध्ये प्रत्येकी ६५ हजार रुपये या प्रमाणे नऊ गाई (त्यात दुसऱ्या व तिसऱ्या वेताच्या निवडून, तर काही वासरासह दुभत्या) आणल्या. लातूरपासून पाच, सहा किलोमीटरवर पेठ शिवारात भाड्याने जागा घेत पत्र्याचे शेड उभारून गोठा केला. स्थानिक कामगार, कमी अनुभव यामुळे त्या दीड वर्षात आठ, दहा वासरे व लाळ्या खुरकूत रोगाने तीन गाई दगावल्या. मग दूध घटले. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ जमेना. भाड्याची जागा सोडून घरी मोकळ्या जागेत सात, आठ गायी चार महिने सांभाळल्या. या वेळी पशुवैद्यकाच्या ओळखीतून पशुसंवर्धन आयुक्त डॉ. पडिले संपर्कात आले. त्यांना संतोषची जिद्द व जागेची अडचण लक्षात आली. त्यांनी गायी ठेवायची सोय केली, तरी शहरातील मध्यवस्तीची जागा, चारा, पाणी व शेण यांच्या अडचणी वाढू लागल्या. पुन्हा नव्या जागेचा शोध सुरू झाला. सुदैवाने लातूर शेजारील खाडगाव शिवारात रिंग रोडलगत योगेश पाटील यांची मोठी शेती व गोठा होता. कुशल कामगाराच्या अभावामुळे त्यांनी दुग्ध व्यवसाय बंद केलेला. त्यांनी जुन्या गोठ्याची दुरुस्ती व लाइट, पाणी अशा सोई करून देतानाच अडीच एकर जागा प्रति माह बावीस हजार रु. प्रमाणे भाड्याने देऊ केली. ‘आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन’ असेच झाले. दोन एकर शेतीमध्ये मका व गजराज गवत लावले. आधी विकत आणलेल्यांपैकी पाच, सहा गाई शिल्लक असल्या, तरी त्या अपेक्षित दूध देत नव्हत्या. त्या विकल्या. गंगानगर (राजस्थान) येथून जाणकार, विश्वासू व्यक्तीला सोबत नेऊन एकदा आठ आणि दुसऱ्यांदा नऊ जातिवंत गाई आणल्या. असे असते नियोजन
उत्पन्न आणि खर्च
भविष्यातील नियोजन -गोठ्यातच गाईंची वाढ करत संख्या दोनशेपर्यंत नेणे. - दूध उत्पादन व प्रक्रिया पदार्थ निर्मितीसाठी स्वयंचलित यंत्रणा उभारणे. त्यातून दही, ताक, मसाला दूध, तूप यांचे ब्रॅण्डिंग करणे. - संतोष पुणजे, ७२६३०१०००८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.