रसायन अवशेषमुक्त शेतीचा ध्यास

रसायन अवशेषमुक्त शेतीचा ध्यास
रसायन अवशेषमुक्त शेतीचा ध्यास

अॅग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती अॅवॉर्ड    प्रभाकर भिला चौधरी, सुभाषनगर, जुने धुळे, ता. जि. धुळे ----------------------------------------------------------- प्रभाकर भिला चौधरी यांनी गेल्या १६ वर्षांत आपल्या पिकांसाठी बाहेरून कुठलंही रासायनिक खत, किटकनाशक वापरलेलं नाही. सगळी शेती सेंद्रिय पद्धतीची आहे. देशी बियाणे, गांडूळ खत, जीवामृत, मल्चिंग यांचा वापर ते करतात. सेंद्रिय शेतीचं एक तंत्र त्यांनी विकसित केलं आहे.

प्रभाकररावांना वडिलांकडून ३ बिघे जमीन वाट्याला आली. छोटा-मोठा व्यापार करून त्यांनी ती २० एकरांपर्यंत वाढवली. विहीर खोदली. दुधाचा व्यवसाय केला. बीएच्या पहिल्या वर्षात शिक्षणाला रामराम ठोकला; आणि पूर्णवेळ शेतीत उडी घेतली. त्यांनी १९७६ मध्ये जमीन कसण्यास सुरवात केली. तेव्हा शेतीत खतं-रसायनांचा वापर जवळपास नव्हताच. आधुनिक शेतीपध्दतीची तेव्हा नुकतीच कुठं सुरवात झाली होती. खतं, किटकनाशकांचा वापर करावा, यासाठी कृषी विभागाकडून प्रचार, प्रसार सुरू झाला होता. प्रभाकररावांवरही त्याचा प्रभाव पडला. पिकांचं जास्त उत्पादन मिळावं म्हणून त्यांनी रासायनिक खतं, किटकनाशकांचा भरपूर वापर सुरू केला. त्याचे दुष्परिणाम १९९५-९६ मध्ये लक्षात यायला लागले. परंतु ते सगळं तातडीने बंद करणंही शक्य नव्हतं. मग प्रभाकररावांनी टप्प्याटप्प्याने सेंद्रिय पद्धतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सगळं नियोजन केलं. ते चोख पार पाडलं. अखेर २००० मध्ये त्यांनी संपूर्ण सेंद्रिय शेती सुरू केली.

रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत खालावला होता. जमिनीची सुपीकता कमी झाली होती. प्रभाकररावांंनी सगळ्यात पहिल्यांदा जमिनीचं आरोग्य सुधारण्याचं काम हाती घेतलं. गांडुळ खतापासून सुरूवात केली. गांडूळ म्हणजे शेतीला खत पुरवणारा जिवंत कारखाना. सुरवातीला पुण्याहून ५०० रुपयांची गांडुळं आणली. शेतात सगळीकडे गांडुळं पसरली. गांडूळ झाडाच्या मुळाजवळ खोलवर जातात. जमीन भुसभुशीत करतात. पिकांसाठी त्याचा फायदा झाला. गांडुळाच्या खाद्यासाठी शेणखत पुरेसे हवे, यासाठी देशी गायी पाळल्या.

दुसऱ्या टप्प्यात त्यांनी जीवामृतावर भर दिला. जीवामृत म्हणजे गोमूत्र, गूळ, कडधान्य कुजवून ते पिकांना पाण्यावाटे दिले जाते. त्यातून सूक्ष्म जीवांचा, अन्नद्रव्यांचा पुरवठा होता.

पिकांवरच्या मित्रकिडी, शत्रुकिडी ओळखून केवळ हानीकारक किडींचं व्यवस्थापन करण्याचं तंत्र त्यांनी अवगत केलं. कडूलिंबासह दहा प्रकारच्या वनस्पतींचा पाला सडवून त्याचं मिश्रण तयार केलं. त्यात लिंबोळी पावडर भिजवून त्या दशपर्णी अर्काची पिकांवर फवारणी केली. जैविक साखळीला धक्का न लागता पिकांचं संरक्षण साध्य झालं.

संपूर्ण सेंद्रिय शेती करायची तर बियाणेही देशीच हवे. प्रकाशसिंह रघुवंशी यांनी विकसित केलेलं गव्हाचं कुदरत हे वाण उत्तर प्रदेशातून मागवलं. त्याची एकेक ओंबी नऊ इंच लांब अाहे. गावरान बियाण्यांचा फायदा म्हणजे दरवर्षी नवीन बियाणं विकत घ्यायची गरज नाही. गहू, कपाशीसारख्या पिकांना भाजीपाला व मोगऱ्यासारख्या पिकांची जोड दिली. त्यातून रोजचं उत्पन्न सुरू झालं. विशेष म्हणजे मोगऱ्याची शेतीही सेंद्रिय पद्धतीचीच आहे. प्रभाकरराव शेतात कोणताच काडीकचरा जाळत नाहीत. तर तो रोटाव्हेटरमधून बारीक करून जमिनीत मिसळतात. शेतीच्या चौफेर बांधावर लिंबाची आणि गिरीपुष्पाची झाडं लावलीत. विंडब्रेक म्हणून अशोकाची झाडं लावलीत. मल्चिंग करतात. त्यामुळे तणांचा त्रास कमी होतो. शिवाय पाण्याचीही मोठी बचत होते. प्रभाकरराव आपल्या शेतात विविध कंपन्यांचे सीड प्लॉट घेतात. अर्थात ते सुध्दा सेंद्रिय पध्दतीनेच.

पाण्याची संपूर्ण सोय असूनही वर्षातून दोनच पिकं घेण्याचं पथ्य ते पाळतात. माणसाला विश्रांतीची गरज असते, तशी ती जमिनीला पण असते हा त्यामागचा विचार. जमिनीतला बायोमास वाढवण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. आपण जमिनीला जे देतो, त्याच्या कितीतरी पट ती आपल्याला परत करते, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

प्रभाकररावांनी आता सेंद्रिय भाजीपाला युनिट सुरू करण्याचं मनावर घेतलं आहे. तसंच देशी गायीचं दूध घरपोच पोचविण्याचं त्यांचं नियोजन आहे. पंचक्रोशीतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्याचं काम त्यांनी हाती घेतलंय. येणाऱ्या पिढीला विषमुक्त अन्न मिळावे, हा त्यांचा संकल्प आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com