करारावरील पोल्ट्री व्यवसायातून साधला उत्कर्ष

करारावरील पोल्ट्री व्यवसायातून साधला उत्कर्ष
करारावरील पोल्ट्री व्यवसायातून साधला उत्कर्ष

अमरावती जिल्ह्यातील सावळापूर (ता. अचलपूर) येथील अनिल पाटील यांनी बॅंकेतील नोकरी सोडत शेती व पूरक व्यवसायाचा ध्यास घेतला. करारावरील पोल्ट्री व्यवसायात उतरून, मेहनत आणि योग्य व्यवस्थापनातून या क्षेत्रात नवी ओळख निर्माण केली आहे. धाडसाने घेतलेला हा निर्णय योग्य ठरल्याचे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नाही. आसेगाव-दर्यापूर मार्गावरील सावळापूर फाट्यापासून चार किलोमीटर अंतरावर सावळापूर आहे. या गावात शेती हा मुख्य व्यवसाय असून, सोयाबीन, कपाशी यांसारखी पारंपरिक पिके शेतकरी घेतात. येथील अनिल पाटील यांच्याकडे १२ एकर शेती आहे. मात्र, त्यांना खासगी बॅंकेमध्ये नोकरी असल्याने शेतीकडे फारसे लक्ष देणे शक्य होत नसे. शेतीमध्ये खरिपात कपाशी, सोयाबीन, तूर आणि रब्बी हंगामात गहू पीक घेत. एकरी कपाशीचे केवळ ६ ते ७ क्‍विंटल मिळत असे. पोल्ट्री व्यवसायाची अशी झाली सुरवात अमरावती येथील एका खासगी बॅंकेत अनिल पाटील यांनी लिपीक म्हणून तब्बल १६ वर्ष काम केले. परंतु, नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. शेतीबरोबरच स्वतःचा काही व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छा होती. गेल्या वर्षी धाडस करत नोकरीचा राजीनामा दिला. पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी त्यांनी करारावरील पोल्ट्रीचा पर्याय निवडला. अशाप्रकारे शेतकऱ्यांसोबत कराराने काम कंपन्यांची माहिती घेतली. प्रत्येक कंपनीचे गुणदोष शेतकऱ्यांशी बोलून जाणून घेतले. त्या दरम्यान अमरावती येथील डॉ. शरद भारसाकळे यांच्या अमृता हॅचरीज सोबत करार करण्याचा निर्णय घेतला. कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये त्यांना पक्ष्यांची पहिली बॅच मिळाली. करारामुळे पक्ष्यांसाठी वाढीनुरूप आवश्यक खाद्य, औषधे यासोबतच आवश्यक पशुवैद्यकीय सल्ला उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे विक्रीसाठी बाजारपेठ शोधत राहण्याची धडपड करावी लागत नाही. एकूणच व्यवसायात धोका कमी राहत असल्याने या पर्यायाची निवड केल्याचे अनिल पाटील सांगतात. सात हजार लोकसंख्येच्या गावामध्ये पोल्ट्री व्यवसायाकडे वळणारे अनिल पाटील हे पहिलेच शेतकरी ठरले आहेत. उत्तम व्यवस्थापनावर केले लक्ष केंद्रित १) पोल्ट्री शेड - पोल्ट्री व्यवसायाकरिता ३५ लाख रुपये खर्चून ३० फूट बाय १०० फूट आकाराचे शेड उभारण्यात आले. त्याकरिता बॅंकेकडून १५ लाख रुपये कर्ज स्वरूपात मिळवले आहेत. पोल्ट्री शेडभोवती मका लागवड केली असून, त्यामुळे पक्ष्यांना उन्हाच्या झळा कमी लागतात. त्याचप्रमाणे छतावर सुमारे ६० हजरा रुपये खर्चून मिनी स्प्रिंकलर बसवले आहेत. यामुळे पक्ष्यांवरील ताण कमी राहण्यास मदत होते. २) पक्ष्याचे वजनानुसार मिळतो दर - योग्य व्यवस्थापन केल्यामुळे ४० दिवसात २ किलो ८०० ग्रॅमपर्यंत पक्ष्याचे वजन मिळते. प्रति किलो ६ रुपये कंपनीकडून मिळतात. ३) मरतूक कमी ठेवण्याचे आव्हान असते. मात्र, योग्य व्यवस्थापनामुळे आमच्या मरतुकीचे प्रमाण अत्यल्प असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले. परिणामी मरतुकीवर नियंत्रण मिळविल्यास कंपनीकडून बोनसही मिळतो. ४) सीसीटीव्हीचा वापर - पोल्ट्री शेडमधील पक्ष्यांची तसेच साहित्याची चोरी रोखण्याच्या उद्देशाने संपूर्ण परिसरात ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या यंत्रणेसाठी सुमारे ७० हजार रुपयांचा खर्च आला असला तरी त्याचा व्यवस्थापनासाठी चांगला उपयोग होत असल्याचे पाटील सांगतात. ५) जमिनीवर अंथरण्यासाठी वापरतात गव्हाचा भुस्सा - पक्ष्यांच्या विष्ठेमधील ओलावा शोषला जाऊन, ते कोरडे राहण्यासाठी शेडमध्ये गहू किंवा भाताचा भुसा पसरला जातो. सुरवातीला विकत घेऊन भाताचा भुस्सा वापरत. मात्र पुढे खर्च वाचवण्यासाठी स्वतःच्या शेतीतील गव्हाच्या भुश्शाचा वापर सुरू केला आहे. परिणामी खर्चात बचत झाली. असा आहे ताळेबंद एक बॅॅच निघण्यास सरासरी ४० दिवसांचा कालावधी लागतो. या ३० दिवसांच्या काळासाठी सुमारे ३० हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. यात व्यवस्थापनासाठी मजुरी व वीजबिलाचाही समावेश आहे. त्यांच्याकडे चार मजूर कायमस्वरूपी काम करतात. त्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये प्रति माह वेतन दिले जाते. १५ हजार पक्ष्यांपासून सरासरी वजन ४२ हजार किलोपर्यंत भरते. प्रति किलो सहा रुपये दराप्रमाणे २ लाख ५२ हजार रुपये उत्पन्न मिळते. अन्य सर्व खर्च वजा जाता १ लाख ७५ हजार ते २ लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न ४० दिवसांत मिळते. वर्षभरात सहा बॅच घेण्याचा प्रयत्न असतो. पोल्ट्री खताची होते विक्री ः १५ हजार पक्ष्यांच्या एका बॅंचपासून सरासरी बारा ट्रॉली कोंबडी खताची उपलब्धता होते. यावर्षी शेतामध्ये पोल्ट्री खताचा वापर केल्याने कपाशीचे उत्पादन १० ते ११ क्‍विंटलपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. शेतीमध्ये खत वापरल्यानंतर उर्वरित पोल्ट्री खताची विक्री केली जाते. प्रति ट्रॉली सरासरी ६ हजार रुपये दर आहे. गावातील शेतकऱ्यांसह खल्लार भागातील डाळींब उत्पादकांकडून मागणी असते. कोंबडी खत हे अतिरिक्‍त उत्पन्नाचा पर्याय ठरले आहे. अनिल पाटील, ७९७२८३२९२८

नोकरी सोडून शेती व पूरक व्यवसायामध्ये उतरताना फारसा धोका न पत्करण्यासाठी मी करार पोल्ट्रीचा अंगिकार केला. यात आपल्याला केवळ पक्ष्यांचे योग्य व्यवस्थापन करत वजन मिळवण्यावर लक्ष केंद्रित करता येते त्याचा फायदा होतो. आवश्यक सल्लाही त्वरित उपलब्ध होत असल्याने नवीन व्यवसाय करताना फारशा अडचणी आल्या नाहीत. - अनिल पाटील

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com