इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग उत्पादन

इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग उत्पादन
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग उत्पादन

सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील शेतकरी सूर्यकांत शंकरराव दोरुगडे हे गेल्या दहा वर्षांपासून इक्रीसॅट पद्धतीने उन्हाळी भुईमुगाचे चांगले उत्पादन घेत आहेत. त्यांनी बियाणे प्रक्षेत्र, खते देण्याची पद्धत, पीक व्यवस्थापनात नावीन्य जपलेच, त्याचबरोबरीने विक्री व्यवस्थेतही कौशल्य वापरत जादा दर मिळवला. शेतकरी संपर्क आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी भुईमुगातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख तयार केली आहे. आजऱ्यापासून सहा किलोमीटर अंतरावर सोहाळे गाव आहे. या ठिकाणी सूर्यकांत दोरुगडे यांची पाच एकर शेती आहे. बहुतांश जमीन काळी, तांबडी आहे. पाच एकरांपैकी तीन एकर क्षेत्रावर ऊस लागवड, तर दोन एकर क्षेत्रामध्ये खरीप हंगामात भात आणि उन्हाळी हंगामात भुईमुगाची लागवड असते. गेल्या दहा वर्षांपासून दोरूगडे उन्हाळी भुईमूग लागवड करीत आहेत. या पिकातूनही चांगला नफा मिळविता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. दर्जेदार बियाणे निर्मितीवर भर ः सूर्यकांत दोरुगडे हे दर वर्षी भुईमुगाच्या धनलक्ष्मी या स्थानिक जातीची लागवड करतात. कारण बाजारपेठेत ओल्या शेंगासाठी या जातीला चांगली मागणी आहे. चांगल्या उत्पादनासाठी दोरूगडे घरच्या घरी दर्जेदार बियाणे निर्मिती करतात. यासाठी पाऊस कमी झाल्यावर ऑगस्ट महिन्यात पंधरा ते वीस गुंठे क्षेत्रात बीजोत्पादन घेतले जाते. यासाठी साडेतीन फुटांचा गादी वाफा केला जातो. त्यामध्ये रासायनिक खत, सेंद्रिय खत मिसळून बीजप्रक्रिया केलेल्या बियाणाची चार ओळीत टोकण केली जाते. योग्य पीक व्यवस्थापन ठेवत साधारणपणे नोव्हेंबर अखेरपर्यंत शेंगा तयार होतात. या शेंगा वाळवून उन्हाळी लागवडीसाठी बियाणे तयार केले जाते. काही शेंगांची बियाणे म्हणून शेतकऱ्यांना विक्री केली जाते. इक्रीसॅट पद्धतीने लागवड

 • जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकरी दोन ट्राली शेणखत मिसळून जमीन भिजवून घेतली जाते.
 • वाफशावर उभी-आडवी नांगरट करून साडेतीन फुटांचा गादीवाफा तयार केला जातो. दोन गादी वाफ्यामध्ये दोन फुटांची सरी.
 • १५ जानेवारीदरम्यान गादी वाफे तयार झाल्यानंतर त्यावर मार्करच्या साह्याने एक फुटाची बारीक सरी घेतली जाते. वाफ्यावर चार ओळी बसतात. सरीमध्ये रासायनिक आणि सेंद्रिय खत दिले जाते.
 • एकरी साठ किलो डीएपी, दोनशे किलो सेंद्रिय खत एकत्र मिसळून दिले जाते.
 • सरीत नऊ इंचावर दोन दाणे या प्रमाणे टोकण.
 • प्रतिकिलो बियाण्यास दोन ग्रॅम कार्बेन्डाझीमची बीजप्रक्रिया. त्यानंतर पेरणीपूर्वी प्रति १० किलोस २५० ग्रॅम पी.एस.बी. जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया. यामुळे बियाणाची चांगली उगवण.
 • एकरी साठ किलो बियाणे. पीक व्यवस्थापन ः

 • टोकण केल्यानंतर लगेच पाणी दिले जाते.
 • पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार पाट पाणी, तसेच तुषार सिंचनाने पाणी नियोजन.
 • दुसरे पाणी पिकाच्या आवश्‍यकतेनुसार पंचवीस ते तीस दिवसांनी दिले जाते.
 • दोन पाण्याचा कालावधी जाणीवपूर्वक उशिरा ठेवला जातो. या कालावधीमुळे ओलाव्याच्या दिशेने मुळांची वाढ होते. पिकाचे पेरे लांब होत नाहीत, त्यामुळे आऱ्या जमिनीपर्यंत लवकर पोचतात.
 • फुलोऱ्याच्या अवस्थेत पाणी दिले जाते. यानंतर दहा ते पंधरा दिवस अंतराने पाटपाणी.
 • फुलोऱ्यानंतर शिफारशीनुसार विद्राव्य खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची आलटून पालटून फवारणी.
 • शेंगा धरण्याच्या अवस्थेत सूक्ष्मअन्नद्रव्याची दुसरी फवारणी.
 •  वाढीच्या टप्प्यात शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी.
 •  शेंगा चांगल्या भरण्यासाठी पोटॅशयुक्त विद्राव्य खताची तिसरी फवारणी.
 •  सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे पीक आणि शेंगांची चांगली वाढ.
 • भुईमूग शेतीची वैशिष्ट्ये ः

 •  ओल्या शेंगांचे एकरी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन.
 •  वाशी बाजारात ओल्या शेंगांची विक्री, किलोस सरासरी ४० ते ५० रुपये दर.
 •  खर्च वजा जाता बाजारपेठेतील दरानुसार सरासरी एकरी सत्तर हजारांचा नफा.
 •  गुणवत्तेमुळे बाजार दरापेक्षा किलोला तब्बल दहा रुपयांचा जादा दर.
 • स्वत:चा बियाणे प्रक्षेत्र असल्याने दर्जेदार बियाणांची उपलब्धता.
 •  पेरणीच्या अगोदर खतांचा बेसल डोस.
 • गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी.
 • एकूण उत्पादनाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शेंगांमध्ये ३ ते ४ दाणे.
 • एकरी भाताचे सरासरी ३० ते ३२ क्विंटल, उसाचे ५० टन उत्पादनात सातत्य.
 • कौशल्याने मिळविले मार्केट आजरा भागातील शेतकरी भुईमूग शेंगांची विक्री संकेश्‍वर, बेळगाव, आजरा, कोल्हापूर बाजारपेठेत करतात. या बाजारपेठेत ओल्या शेंगेचा दर साधारणत: ३० रुपये किलोपर्यंत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सूर्यकांत दोरूगडे यांना येडे निपाणी (जि. सांगली) येथील शेतकऱ्यांना प्रतिकिलो ४० ते ४२ रुपयांपर्यत दर मिळत असल्याची माहिती मिळाली. तेथील शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. या शेतकरी गटाच्या माध्यमातून काही वर्षे ओल्या शेंगांची विक्री केल्यानंतर वाशीतील काही व्यापाऱ्यांशी दोरूगडे यांचा संपर्क झाला. शेंगेचा दर्जा पाहून त्यांनी ५० रुपये किलोंपर्यंत दर देण्याची तयारी दर्शविली. पण, प्रवास खर्चाचा प्रश्‍न होता. यातूनही त्यांनी मार्ग काढला. आजऱ्याहून वाशी मार्केटजवळील महामार्गापर्यंत दोरुगडे यांनी शेंगा पोती वाहतूक खर्च करायचा आणि तेथून वाशी मार्केटपर्यंत व्यापाऱ्यांनी खर्च करायचा, असा तोडगा निघाला. आता ओली शेंगाची पोती ट्रॅव्हल्स गाडीने सानपाड्यापर्यंत स्वत: दोरूगडे पाठवतात. तेथून व्यापारी स्व-खर्चाने वाशी मार्केटला शेंगा पोती नेतात. ही पद्धत त्यांना फायदेशीर ठरली. वाशी बाजारपेठेत नियमित शेंग जात असल्याने यातून आजरा शेंगेचा ब्रॅंड तयार झाला. शेंग काढणी हंगामात वाशी बाजारपेठेत दररोज दहा पोती (पाचशे ते सहाशे किलो शेंग) ओली शेंग पाठविली जाते. एक एकर काढणीस आठ ते दहा दिवस लागतात, त्यामुळे इतके दिवस ओली शेंग दोरूगडे वाशी मार्केटला पाठवतात. सोशल मीडियाचा प्रभावी वापर भुईमूग शेती करत असताना दोरूगडे अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी सोशल मीडियातून शिकतात. फेसबुक व व्हॉट्‍सॲपवरील शेतकरी गटामध्ये ते सहभागी आहेत. त्यांचा ‘होय आम्ही शेतकरी‘ हा व्हॉट्सॲप गट आहे. याबरोबरच ते राज्यभरातील शेतकऱ्यांच्याबरोबरीने सातत्याने चर्चा करतात. अनेक ठिकाणी ते शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जातात. संपर्क ः सूर्यकांत दोरूगडे- ८२७५४४८८७४  

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  www.agrowon.com