शिक्षण, आरोग्य अन्‌ प्रशिक्षणातून गावांना मिळतेय नवी दिशा

ग्रामविकासाबाबत युवकांसाठी चर्चासत्राचे आयोजन.
ग्रामविकासाबाबत युवकांसाठी चर्चासत्राचे आयोजन.

नांदगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) गावामध्ये विजय पाटील यांनी आत्मसम्मान फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, व्यसनमुक्ती, शेतकरी प्रशिक्षण, ग्रामविकासासंदर्भात काम सुरू केले. आज बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा व इतर भागांत हे काम चांगल्या पद्धतीने विस्तारले आहे.

एखाद्या चांगल्या उद्देशाने कुठलेही काम सुरू केले, की त्याला यश मिळू लागते. मूळचा बोदवड (जळगाव) येथील असलेल्या विजय पाटील यांनी  ‘आत्मसम्मान' फाउंडेशन ही संस्था सुरू करून ग्राम विकासामध्ये काम करण्यास सुरवात केली. आज विदर्भ, खानदेश, मराठवड्यातील काही जिल्ह्यांत या संस्थेचे काम उभे राहले आहे. अनेकजण नोकरी, व्यवसाय, तर कुणी शेतीत काम करून संस्थेच्या उपक्रमासाठी निःस्वार्थपणे आपला वेळ देतात, आर्थिक मदत करतात.

भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन नांदगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) गावामध्ये विजय पाटील याने आत्मसम्मान फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेथून हे काम विस्तारत गेले. आज बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा व इतर भागांत हे काम चांगल्या पद्धतीने विस्तारले आहे.  महाराष्ट्रात गावागावांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब तसेच घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबातील मुलांचे भवितव्य उघड्यावर पडते. अशा अनाथ विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी संस्था त्यांना मदत करते. विशेष म्हणजे यासाठी संस्थेशी जुळलेले कार्यकर्ते आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून काम करतात. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवणे, निःस्वार्थ, निर्व्यसनी, देशभक्त तरुणांचे संघटन बनवून सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी सहाय्यक होणे असा उद्दात्त हेतूसुद्धा यामागे आहे.  जळगाव, परभणी, औरंगाबाद, मलकापूर (बुलडाणा), बोरिवली याठि काणी संस्थेची कार्यालये कार्यरत आहेत.

निधी संकलनासाठी विविध उपक्रम   सामाजिक काम पुढे नेण्यासाठी संपूर्ण खर्च हा लोकसहभागातून केला जातो. यासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी समाजातून सहकार्य घेतले जाते. याबाबत माहिती देताना विजय पाटील म्हणाले, आम्ही एक व्यापक अभियान राबवीत आहोत. ज्यातून या सर्व सामाजिक कामांसाठी निधी उभारण्यासाठी मदत होते. जयंती, वाढदिवस, लग्न आणि स्वतःचे व्यसन यांवर केला जाणारा अतिरिक्त खर्च टाळून गरजू व वंचितांना मदत करा, असे आवाहन करीत असतो. याची सुरवात संस्थेत कार्य करणाऱ्या तरुणांनी स्वतःपासून केली. संस्थेशी निगडित काही तरुणांनी आपले लग्न केवळ एकमेकांना हार घालून केले. याव्यतिरिक्त सभोवताली असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी दानपेट्यासुद्धा ठेवण्यात आल्या आहेत. मदत निधी जमा करण्यासाठी संस्थेकडून नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहे. संस्थेकडून महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये ‘एक चहा देशासाठी, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी’ हा उपक्रमही राबविला जात आहे. शहरात चहाचा स्टॉल लावून संस्थेच्या उपक्रमासाठी निधी गोळा केला जातो.

   संस्थेचे मुख्य संयोजक विजय पाटील हे आहेत. त्यांच्याबरोबरीने डॉ. प्रशांत बडगुजर, नरेंद्र पाटील, ऋषिकेश शर्मा, अमोल पाटील, विश्वास मापारी, कोमल पाटील, शरद पाटील, पुरुषोत्तम गड्डम हे कार्यरत आहेत. संस्थेच्या मार्गदर्शक मंडळामध्ये रवींद्र कोल्हारकर (औरंगाबाद), सुमेरचंद भन्साली (मलकापूर), नितीन नांदुरकर (नांदुरा), मोहनराव उर्मी (नांदुरा) यांचा समावेश आहे. संस्थेच्या उपक्रमासाठी या लोकांचे मार्गदर्शन मिळते.

शेतकरी कन्या व पुत्र अभ्यासिका 

संस्थेच्या उपक्रमाबाबत संस्थेचे मुख्य संयोजक म्हणाले, की आत्मसम्मान या नावाची निवडच एका ध्येय्यातून केली. शेतकरी वर्गातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकांना आत्मसम्मान मिळवून देण्यासाठी काम केले जाते. मग ते कुठलेही क्षेत्र असो, त्यासाठी निस्वार्थपणे कार्यकर्ते पुढाकार घेतात. याचाच एक भाग म्हणून बोदवड तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील मुला, मुलींसाठी पहिली अभ्यासिका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये सुरू केली. या ठिकाणी संस्थेकडून सर्व प्रकारची उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.

मोफत संगणक प्रशिक्षण 

नांदगावातील गरीब, मजुरांच्या मुलामुलींसाठी मोफत संगणक प्रशिक्षण देण्याचे कार्य संस्थेकडून सुरू आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संस्थेकडून नांदगाव व परिसरातील सभोवताली गावातील मुलांसाठी लोकसहभागातून  व्यायाम शाळेची उभारणी केली आहे. येथे परिसरातील विविध गावातून मुले येऊन याचा लाभ घेतात. फाउंडेशनतर्फे फिटनेस क्लबही चालविला जातो.

शिक्षण सहायता उपक्रम संस्थेचे मुख्य काम शेतकरी व शेतमजुरांचे सामाजिक प्रबोधन करण्याचे आहे. लग्न, तेरवी, वाढदिवस यांमध्ये होणारे खर्च टाळावे, कर्ज घेऊन लग्न करू नये म्हणून संस्थेचे कार्यकर्ते प्रबोधन करतात. संस्थेचे सदस्य पथनाट्याद्वारे शेतकरी जागृती, अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता विविध खेड्यांत पथनाट्य सादरीकरण करतात. घरातील कर्ती व्यक्ती गेला असेल, वैद्यकीय संकट आणि आर्थिक दुर्बलतेमुळे शिक्षण प्रवाहाच्या बाहेर पडणाऱ्या समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन वर्षभर नियोजनबद्ध पध्दतीने शालेय साहित्य पुरविले जाते. आजपर्यंत संस्थेने ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमासाठी दत्तक घेतले आहे.

व्यसनमुक्त तरुण अभियान  ग्रामीण भागातील तरुण व्यसनमुक्त राहावेत म्हणून पथनाट्य, विविध सामाजिक कार्यक्रमांद्वारे प्रबोधन व समुपदेशन केले जाते. नैराश्यात असलेल्यांना व कौटुंबिक अडचणीमुळे जगण्याची उमेद  हरवलेल्या किंवा व्यसनाधीन झालेल्या तरुणांना मोफत समुपदेशन करण्यात येते. आवश्यक असल्यास औषधोपचारासाठी पाठविले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात बदल घडविण्याचे प्रयत्न संस्थेतर्फे केले जात आहेत.

मेळाव्याचे नियोजन आत्मसम्मान फाउंडेशनने सुरू केलेल्या अभ्यासिकांचा विस्तार करण्यात येणार आहे. या अभ्यासिकांच्या शाखा वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांना सध्या शेती करताना तांत्रिक मार्गदर्शनाची गरज मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी संस्थेतर्फे गावोगावी कृषी मेळावे घेऊन त्यामध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. लग्न, वाढदिवस आणि इतर कार्यक्रमात होणारे भरघोस खर्च कमी करून तो पैसा शेतकरी कुटुंबासाठी वापरावा या संकल्पनेला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शेतकऱ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन शेतीच्या मुद्यावर असंख्य ठिकाणी वादविवाद होत असतात. किरकोळ कारणावरून काही प्रकरणे थेट न्यायालयांपर्यंत जातात. न्यायालयात अनेक वर्ष निकाल लागत नाहीत. अशा परिस्थितीत सर्व सामान्य शेतकऱ्याला कायदेविषयक बाबींची माहिती नसते. त्यामुळे शेतकरी वादविवादाच्या प्रकरणाची योग्य बाजू असेल तर यासाठी लागणारी कायदेविषयक माहिती, मदत देण्यासाठी फाउंडेशनचे कायदेविषयक सल्लागार मदत करणार आहेत.

 - विजय पाटील, ८२०८०१८६०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com