
खेड (ता. कर्जत, जि. नगर) येथील उदयसिंह हिंदूराव मोरे-पाटील यांनी शून्य नांगरणी, सेंद्रिय घटकांचा अधिकाधिक वापर व अत्यंत कमी उत्पादन खर्च या बळांवर ऊसशेती यशस्वी केली आहे. त्यातून उसाचा तब्बल ११ वा खोडवा राखत समस्त शेतकऱ्यांपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. सोबत आपली जमीनही सुपीक व आरोग्यदायी केली आहे. कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील प्रयोगशील शेतकरी कै. डॉ. देवांगी आर. प्रफूलचंद्र यांचे नाव ऊसशेतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर अमर झाले. शून्य नांगरणी, अत्यंत कमी उत्पादन खर्च व पूर्णतः सेंद्रिय घटकांचा वापर या बळावर उसाचे तब्बल ४० खोडवे घेण्याची किमया त्यांनी घडवली. हा जागतीक विक्रमच ठरावा. महाराष्ट्रातही असाच आदर्श उदयसिंह मोरे-पाटील (खेड, ता. कर्जत, जि. नगर) यांनी शेतकऱ्यांपुढे तयार केला आहे. यंदाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये त्यांच्या शेतात उसाच्या तब्बल ११ व्या खोडव्याची तोडणी झाली. किमान पंधरा खोडवे ठेवण्याचे ध्येय ठेऊन त्यांचे पुढील व्यवस्थापनही सुरू झाले आहे. ११व्या खोडव्याचा व्हीडिअो... शेतीचे संस्कार उदयसिंह यांनी लहानपणापासूनच वडिलांकडून शेतीचे संस्कार आत्मसात केले. ‘बीकॉम’ची पदवी घेतल्यानंतर शेतीत ‘करियर’ सुरू केले. सुरवातीच्या काळात भाजीपाला पिके भरपूर प्रमाणात केली. दहा एकरांवर कलिंगड घेत उल्लेखनीय उत्पादनही घेतले. साधारण १५ वर्षांपूर्वी ते ऊसशेतीकडे वळले. अर्थशास्त्र अभ्यासूनच खोडवा शेती उदयसिंह सांगतात की, ऊस लावला तेव्हाच त्याचे अर्थशास्त्र डोक्यात पक्के केले होेते. शेती आतबट्ट्याची करण्याची वेळ राहिलेली नाही. रासायनिक खते, मजुरी यावर खूप खर्च येतो. आजच्या स्थितीत उसाचा एकरी उत्पादन खर्च ७५ हजार रुपयांपेक्षा कमी नाही. दर हाती नाहीत. नफा नगण्यच मिळतो. या सर्व बाबी अभ्यासूनच खोडवा ठेवण्यास सुरवात केली. पाहाता पाहाता यंदा तब्बल ११ व्या खोडव्यापर्यंत पोचलो. या पिकानेच जमा- खर्च, नफा सगळे काही शिकवले. उदयसिंह यांची शेती दृष्टिक्षेपात
उत्पादन
ऊसशेतीची वैशिष्ट्ये
मुलांना केले उच्चशिक्षित उदयसिंह पोलिस पाटीलही आहेत. शेती हाच उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. अभ्यास, कष्टातूनच उत्पन्न वाढवले. खोडवा शेतीत खर्च आटोक्यात ठेऊन जी बचत केली त्या जोरावरच मुले उच्चशिक्षीत केली. धनंजय ‘बीई’ (आयटी) असून तो पुण्यात नोकरी करतो. धनश्री दंत वैद्यकशास्त्राच्या (बीडीएस) तिसऱ्या वर्षाला शिकते आहे. वडील म्हणून याचे मोठे समाधान व अभिमान अाहे. आजवर शेतीसाठी कोणत्याही प्रकारे कर्जही काढावे लागले नसल्याचे उदयसिंग सांगतात. प्रशिक्षणातून ज्ञानवृद्धी बारामती येथील ‘व्हीएसबीटी’ व कृषी विज्ञान केंद्र यांचे मार्गदर्शन. परिसंवाद, चर्चासत्रे, प्रदर्शने यांना आवर्जून उपस्थिती. ॲग्रोवनचे नियमित वाचन, त्याच्या ॲपचाही वापर. मार्केटमध्ये नवे कोणते तंत्रज्ञान आले आहे याबाबत ‘अपडेट’.
प्रतिक्रिया उदयसिंह मोरे पाटील यांनी सेंद्रिय व्यवस्थापनावर भर देत उसाचे जे अकरा खोडवे घेतले आहेत त्याबाबत ते कौतुकासाठी पात्र आहेत. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे, ती सुपीक करणे सध्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा कृतीमधूनच उसाचे उत्पादन चांगल्या प्रकारे वाढवणे शक्य होते. -ज्ञानदेव हापसे, वरिष्ठ ऊसशास्त्रज्ञ संपर्क- उदयसिंह मोरे पाटील-९४२०४००४९९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.