शेतीनं दिलं समाधान, आरोग्य अन् मनःशांतीही

पुणे येथील निवृत्त सरकारी वकील नरेंद्र निकम व्यवसायात व्यस्त होते. त्याचवेळी शेतीचेही त्यांना वेड लागले होते. अखंड ध्यास, मेहनतीतून निसर्गसंपन्न मुळशी तालुक्यातील पिंपळोली (जि. पुणे) येथे ६४ गुंठे जागा घेऊन फळबाग विकासाचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलंच. भले व्यावसायिक नसेल पण या शेतीनं त्यांचं सारं जीवन सुखासमाधानानं व्यापलं आहे. आरोग्यासह मनःशांतीही देत असलेल्या या शेतीमुळं वयाच्या सत्तरीतही तरुणासारखं आयुष्य ‘एन्जॉय’ करणं शक्य झाल्याचं निकम सांगतात.
शेतीनं दिलं समाधान, आरोग्य अन् मनःशांतीही
AgricultureAgrowon

पुणे, मुंबईचे जीवन म्हणजे धकाधकीचे. इथं नोकरी- व्यवसायात करिअर करण्यासाठी जो तो धावपळ करीत असतो. अशातही मनाच्या कोपऱ्यात शेती, निसर्गाबद्दलचं स्वप्न काहींनी जिवापाड जपलेलं असतं. सर्व प्रयत्नांती जेव्हा स्वप्न प्रत्यक्षात साकारतं त्याचा आनंद काही औरच असतो. पुणे शहरातील निवृत्त सरकारी वकील नरेंद्र वासुदेव निकम यांच्याबाबत असंच म्हणावं लागेल. पुण्यापासून सुमारे ३४ किलोमीटरवर मुळशी तालुक्यात असलेल्या पिंपळोली गावात ६४ गुंठ्यांत त्यांनी फळबाग फुलवली आहे. भले ते व्यावसायिक शेतीचे उदाहरण नसेल, पण जीवनाचा निरागस, निर्भेळ आनंद आणि मनःशांती देणारं नंदनवन त्याला नक्कीच म्हणता येईल.

शेतीवरचं प्रेम

निकम यांनी सन १९७८ मध्ये वकिली व्यवसायास सुरुवात केली. त्यांचे वडील १९८० मध्ये साहायक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. त्यांना झाडांची खूप आवड होती. कामानिमित्त ज्या ठिकाणी बदली व्हायची त्या ठिकाणी सरकारी बंगल्यात ते स्वतः ‘गार्डनिंग’ करायचे. वडिलांकडून हीच स्फूर्ती घेत निकम यांचेही झाडांविषयीचे प्रेम वाढीस लागले. त्यांचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात धामापूर (मालवण) येथे आहे. तिथे शेती होती. पण त्या काळात व्यवसाय सांभाळून पुण्याहून कोकणात वारंवार जाणे- येणे ही अवघड गोष्ट होती.

शेतीची संधी चालून आली

साधारण २००० मधील ही गोष्ट. पुण्यात ‘प्रॅक्टिस’ सुरू असताना निकम यांनी साहायक म्हणून तरुण नेमला होता. तो पिंपळोलीचा होता. त्याचे वडील पोलिस कॉन्स्टेबल होते. एकदा या कुटुंबाने निकम यांना जेवणासाठी गावी आमंत्रण दिले. मुळशी हा डोंगराळ भाग. कच्चे रस्ते. प्रचंड खाचखळगे आणि खडी. शेळकेवाडी फाट्यापासून गावापर्यंतचं नऊ किलोमीटरचं अंतर पार करायला निकम यांना तब्बल तास- दीड तास लागला. जेवणादरम्यान या कुटुंबानं आमचे शेजारी व्हाल का, असं विचारलं. त्यावर शेती करणं माझं स्वप्नच आहे. मला दाखवा जमीन, असं निकम पटकन बोलून गेलं. आणि ‘लव्ह ॲट फर्स्ट साइट’ प्रमाणं जमीन पसंतीस उतरलीदेखील.

बागेची पद्धतशीर रचना

निकम सांगतात, की ५९ गुंठे जमीन घेतली. त्या वेळी (सन २०००) डोंगर, कातळ आणि पूर्ण उताराचा हा भाग होता. एकही झाड नव्हतं. आज विकसित झालेल्या बागेत आठवण म्हणून त्या वेळचं एकमेव जांभळाचं झाड आजही जोपासलं आहे. पद्धतशीर, विचारपूर्वक बागेची आखणी केली आहे. उतारानुसार जमिनीचे सात टप्पे केले. निकम सांगतात, कोकणातून सर्वप्रथम नारळाची झाडे आणली. मग मारुती ८०० कारमधून प्रत्येक वेळी विविध फळांची ५० रोपे आणायचो. बघणारे नावे ठेवत म्हणायचे, या भागात कसली रोपे लावताहेत? एवढ्याशा गाडीतून आणताहेत? पण मला शेतीचं अक्षरशः वेड लागलं होतं. या भागात सर्वप्रथम जेसीबी यंत्र आणून बागेकडे जाणारा रस्ता केला. बंगल्याची व फळझाडांची जागा निश्‍चित केली.

पाण्याची सुविधा

सुरुवातीला शेजारील शेतकऱ्याकडून पाणी घेतलं. बाग विस्तारू
लागली, तसे त्याने पाण्याचे शुल्क तिप्पट केले. मग अन्य शेतकऱ्याने मोटर सांभाळण्यास दिली. त्याचे विजेचे बिलही निकम भरू लागले. सन २००८ मध्ये मात्र पाण्याची शाश्‍वत सुविधा करण्यासाठी निकम यांनी पाऊल उचलले. सिंचन खात्यातील अभियंता श्री. मोरे त्यांनी कमी वेळेत काम करून दिलं. या परिसरात काही बंधारे आहेत. याच खोऱ्यातलं पाणी इथंच साठतं आणि वर्षभर ते पुरतं. बागेसमोरच बंधाऱ्याचं पात्र आहे. तिथून एक किलोमीटरवरून पापइलाइनद्वारे पाणी आणलं. गावकऱ्यांसोबत चांगला स्नेह जोडला होता. त्यामुळे हे काम विनावाद सुकर झालं. बागेला पूर्ण ठिबक व तुषार सिंचन केले आहे.

फळबागेचा विकास

एकीकडे व्यवसायाचा ताण, सांसारिक जबाबदाऱ्या, मुलांची शिक्षण, दुसरीकडं
शेतीची जोपासना. शारीरिक, आर्थिक आणि मानसिक ओढाताण सुरूच होती. पैसे उपलब्ध होत गेले तसा बागेचा विस्तार केला. त्यातून बावीस वर्षांची मेहनत आज फळास आली आहे. ६४ गुंठ्यांत नव्याने पाच गुंठ्यांची भर घातली आहे. नारळ, आंबा, पेरू, चिकू, केळी, अंजीर, काजू, कोकम (रातांबा), बांबू आहे. मायभूमी कोकणाची नाळ अशा रीतीने जपण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश मेहुण्यांनी वसईहून पाठवलेले सफेद जामचे झाड आहे. एका नर्सरीधारकाकडून लिचीचं झाड आणलं. बारा वर्षांनी त्याला फळ येईल असं सांगितलं होतं. ते कष्टपूर्वक सांभाळलं. यंदा फळ आलं आणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याची स्वाद, गोडी अवर्णनीय असल्याचे निकम सांगतात. सेंद्रिय पद्धतीने शेती व्यवस्थापन होते. कपिला गाय आहे. तिला वासरू झाले आहे. या सर्व प्रवासात पत्नी अनिता खंबीरपणे पतीसोबत उभ्या राहिल्या आहेत. विवाहित मुली अमृता व नम्रता यांची साथ आहे. स्थानिक रहिवासी व शेतकरी नाना व रेश्‍मा हे घारे दांपत्य बागेची देखभाल करतात.

शेततळ्यांची शोभा

बागेत ठरावीक टप्प्यांवर दोन शेततळी उभारली आहेत. यंत्राला उचलायलाही कठीण अशा मोठ्या दगडांपासून शेततळ्याचे बांध तयार केले. तिथं झाडं लावून बाग तयार केली. परिसराची शोभा वाढवली. शेततळ्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याच्या तीन इंची लाइन्स वापरल्या. ग्रॅव्हिटीद्वारे खालील टप्प्यांतील बागेत पाणी जातं. स्प्रिंकलर त्याच पद्धतीने चालतात. त्यामुळे पाण्यासाठी विजेचा वापर करण्याची गरज भासत नाही.

बागेची ओढ

निकम सांगतात, की पुण्यातलं घर ते पिंपळोली हे अंतर ३४ किलोमीटर आहे. आज माझं वय ७० वर्षे आहे. दररोज पिंपळोलीला जाणं होत नाही. पण बागेची ओढ स्वस्थ बसू देत नाही. मग कशाचीही पर्वा न करता स्वतः गाडी चालवत गाव गाठतो तेव्हाच मनाला शांती मिळते. मधुमेह, रक्तदाब आहे. हृदयाची ॲजीओप्लास्टी झाली आहे. पण पानं- फुलं, फळं, झाडांच्या सान्निध्यात सगळ्या व्याधींचा विसर पडतो. आरोग्य कसं ठणठणीत राहतं. दिवस कधी उजाडतो आणि मावळतो समजतच नाही.

आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही इतकं प्रेम मला झाडांनी दिलं आहे. व्यावसायिक उत्पन्न म्हणून या बागेकडे पाहातच नाही. तसं असतं तर वारेमाप खर्च केलाच नसता. इथली कुठलीच गोष्ट पैशात मोजण्यासारखी नाही. जे लोक इथं येतात ते दोन डझन आंबा किंवा फळं आम्हाला ठेवा असं सांगतात हीच काय ती कमाई. बाजारातील पेयांपेक्षा स्वतः वाढवलेल्या रातांब्याचं ताजं कोकम पिण्यातला आनंद काय वर्णावा? आज उतारवयातही एखाद्या तरुणासारखं आयुष्य ‘एन्जॉय’ करतो आहे. कोविड काळात आम्ही पती-पत्नी इथं दीड वर्षे निर्धोकपणे राहिलो. हृदयरोगतज्ज्ञ असलेला मित्र म्हणाला देखील, की कोविड काळात स्वतःच्या फार्महाउसवर राहतोस म्हणजे नशीबवान आहेस बाबा!

मनःशांती देणारी वास्तू

शहरात कितीही मोठा बंगला किंवा फ्लॅट असो, शेतातील घराची सर त्याला नाही. निकम यांनीही बागेत प्रशस्त घर बांधलं आहे. त्याची लांबलचक बाल्कनीवजा मोकळी जागा हॉल व बेडरूम्सच्या ठिकाणी निघते. या ठिकाणी टेबल- खुर्ची टाकून दोन घडी विसावा घेता येतो. समोर डोंगरांच्या रांगा, बंधाऱ्याचं वाहतं पाणी, नारळ, सिल्व्हर ओकची झाडे, बाजूला सोनचाफा, अन्य फुलझाडे, गवताचा हिरवा गालिचा, स्प्रिंकलरचे त्यावर पडत राहणारे तुषार आणि ४० अंश तापमानातही परिसराला आणि मनाला मिळत राहणारा गारवा. अधूनमधून पक्ष्यांचा कानावर पडणारी मधूर साद. सुखाची व्याख्या यापेक्षा काय वेगळी असू शकते?

आमची जमीन वाचवणारच

पिंपळोलीत नवा रिंग रोड तयार करण्याचे प्रस्तावित आहे. बंगल्याला लागून बागेची २० ते २५ गुंठे जमीन त्यात जाणार असल्याची भीती आणि दुःख निकम यांना आहे. रस्ताकाम सुरू असताना वाटेतील झाडांना पाट्या लावण्यासाठी लोक आले, त्या वेळी डोळ्यांत अश्रू उभे राहिले. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे, असा सवाल निकम उद्विग्नपणे विचारतात. या विरोधात न्यायालयात जाणार असून आमच्या जमिनी नक्की वाचवू, असा निर्धार व्यक्त करताना निकम यांच्या चेहऱ्यावर पल्लवित झालेल्या आशाही नजरेत भरतात.

संपर्क ः नरेंद्र निकम, ९७६२८८७९५४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com