शेती, ग्राम विकासाला चालना देणारी कृषी पदवीधरांची ‘केव्हिएफ'

दापोली कृषी महाविद्यालयाच्या १९९१ बॅचमधील कृषी पदवीधरांनी एकत्र येत शाश्वत ग्राम आणि शेती विकासाला दिशा देण्यासाठी ‘केकेव्हियन्स वसुंधरा फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेची सुरवात केली. संस्थेच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान प्रसार, जल,मृद संधारण,आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण आदी क्षेत्रामध्ये विविध उपक्रम सुरू आहेत. ‘लोकसहभागातून गावाचा शाश्वत विकास' हे संस्थेचे ध्येय आहे.
KKVians Vasundhara Foundation
KKVians Vasundhara FoundationAgrowon

दापोली कृषी महाविद्यालयातून (Dapoli Agriculture College) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साधारपणे बहुतांश कृषी पदवीधर (Agriculture Graduates) हे कृषी उद्योग समूह, शासकीय नोकरी, स्वतःच्या शेतीचा विकास (Agriculture Development) आणि काही प्रमाणात गाव पातळीवर विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. हे करत असताना दुर्लक्षित गाव शिवारात शेती, पूरक उद्योग, पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने (Environment Conservation) काम करण्यासाठी दापोली कृषी महाविद्यालयाच्या १९९१ बॅचमधील कृषी पदवीधर एकत्र आले. यातून चांगल्या उपक्रमाला सुरवात झाली. कृषी पदवीधरांनी एकत्र येत शाश्वत ग्राम आणि शेती विकासाच्यादृष्टीने ‘केकेव्हियन वसुंधरा फाउंडेशन' (KKVians Vasundhara Foundation) या स्वयंसेवी संस्थेची सुरवात झाली. संस्थेच्या कामकाजासाठी कृषी आणि कृषिपूरक उद्योगात काम करणे, जल संधारण (Water Conservation) आणि पाणी व्यवस्थापनासाठी (Water Management) ग्रामस्थांना मार्गदर्शन, ग्रामीण भागातील (Rural Development) लोकांची गरज लक्षात घेऊन आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, इत्यादी क्षेत्रात सामाजिक काम आणि पर्यावरण जनजागृतीसाठी देवराई संकल्पनेवर आधारित वृक्ष लागवडीचे नियोजन संस्थेने आखले आहे.

वाटचालीबाबत संस्थेचे सचिव राजन कामत म्हणाले की, कृषी महाविद्यालयातील शिक्षण संपल्यानंतर वर्गमित्र विविध कृषी उद्योग समूह, शासकीय नोकरी, शेती तसेच काहीजण स्वतःच्या उद्योगामध्ये कार्यरत झाले. मधल्या काळात सोशल मिडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र जोडले गेलो.कृषी पदवीधरांना एकत्र करण्याचे काम प्रकाश राऊत आणि उमेश कदम यांनी केले. दरम्यानच्या काळात बॅचमधील पदवीधर व्यक्तिगत पातळीवर सामाजिक तसेच ग्रामविकासाच्या कामामध्ये कार्यरत होते. या चर्चेतून विविध प्रकारची सामाजिक कामे एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पुढे नेण्याचे नियोजन केले. कृषी पदवीधरांच्या सहकार्यातून ५ ऑक्टोबर, २०२० रोजी संस्थेची नोंदणी करून विविध कृषी आणि ग्रामविकासाच्या सामाजिक उपक्रमांना गती दिली. सध्या संस्थेमध्ये प्रकाश राऊत (अध्यक्ष), उमेश कदम (उपाध्यक्ष),अमित वालावलकर (कोषाध्यक्ष), राजन कामत(सचिव) आणि सदस्य म्हणून उदय मयेकर, भीमराज भाजीपाले, देवेंद्र शिर्के कार्यरत आहेत. संस्थेच्या माध्यमातून दोनशेहून अधिक कृषी पदवीधर ग्राम विकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.

KKVians Vasundhara Foundation
पंजाबमध्ये ग्रामविकास कायद्यात सुधारणा

प्रशिक्षणातून कृषी तंत्रज्ञान प्रसार ः

संस्थेचे सदस्य कृषी पदवीधर असल्याने शेती आणि पूरक उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार हे मुख्य ध्येय आहे. त्यादृष्टीने दुर्गम भागातील गावांमध्ये पीक प्रात्यक्षिके आणि तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन केले जाते. गेल्यावर्षी मौजे बारसगाव (ता.महाड, जि.रायगड) येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना संस्थेने रब्बी हंगामासाठी भुईमूग बियाणे वाटप तसेच लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. याचबरोबरीने विविध कृषी उद्योग समूह आणि कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून चालना देण्यात येत आहे.

‘केव्हीएफ' रोपवाटिकेची निर्मिती ः

संस्थेचे सदस्य अमित वालावलकर रोपवाटिका उपक्रमाबाबत म्हणाले की, कर्जत (जि.रायगड) येथे आमच्या शेतीमध्ये संस्थेने वनीकरणासाठी देशी वृक्षांची रोपे उपलब्ध होण्यासाठी रोपवाटिका तयार केली आहे. या रोपवाटिकेमधून पुढील वर्षी करंज, कांचन, उंडी,कदंब, बहावा,बेल, चिंच, भोकर, जांभूळ आदी वृक्षांची एक हजार रोपे उपलब्ध होणार आहे. पुढील टप्यांत दुर्मिळ होत चाललेले देशी वृक्ष तसेच फळझाडांची रोपे, कलमे मोठ्या प्रमाणात तयार करत आहोत.

KKVians Vasundhara Foundation
राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी ४२१ कोटी वितरणास मान्यता

वनीकरणाचा उपक्रम ः

संस्थेने लोकसहभागातून मौजे पदरवाडी (ता.राजगुरुनगर,जि.पुणे),कर्जत (जि.रायगड) आणि शिवणगे(जि. कोल्हापूर) येथे वनीकरणाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. संस्थेच्या सदस्यांनी पन्हाळा ते पावनखिंड या वाटेवर विविध झाडांच्या बियांची लागवड केली. मौजे भाटणवाडी (जि.कोल्हापूर) येथील जिल्हा परिषद शाळा परिसरामध्ये संस्थेने विविध फळझाडांची लागवड केली आहे. या उपक्रमामुळे संस्थेशी दुर्गम भागातील गावे जोडली जात आहेत.

सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग ः

कृषी आणि तंत्रज्ञान विस्ताराबरोबरीने संस्था गरजू लोकांसाठी सामाजिक उपक्रम देखील राबविते. गेल्यावर्षी महाड (जि. रायगड), कणकवली (जि.सिंधुदुर्ग) तसेच कोल्हापूरमध्ये महापुरामध्ये अडकलेल्या लोकांना कौटुंबिक साहित्य मदतीचे वाटप, आंजर्ले (जि. रत्नागिरी) गावात निसर्ग वादळामुळे नुकसानग्रस्त ग्रामस्थांना सिमेंट पत्रे वाटप, दापोली (जि.रत्नागिरी) येथे कै. गणेश दातार वृद्धाश्रमास सौर ऊर्जा इन्व्हर्टर देण्यात आला.कोल्हापूर येथील माऊली केअर सेंटरमधील निराधार वृद्ध रुग्णांसाठी संस्थेतर्फे मदत करण्यात आली. दरवर्षी सामाजिक उपक्रमांना देखील संस्थेने प्राधान्य दिले आहे.

शैक्षणिक उपक्रमाला मदत ः

संस्थेच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थांसाठी स्पर्धा परीक्षा तसेच आयसीएआर परिक्षेसाठी शैक्षणिक पुस्तकांचे वाटप तसेच संस्थेतर्फे ‘साक्ष पावनखिंडीची‘ या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दापोलीमधील गरजू विद्यार्थांसाठी कार्यरत असणाऱ्या नवभारत छात्रालयास देखील संस्थेने मदत केली आहे.

‘शाश्वत गाव' विकासाचे स्वप्न ः

भविष्यातील योजनांबाबत संस्थेचे उपाध्यक्ष उमेश कदम म्हणाले की, आमच्या संस्थेच्या उपक्रमात विविध क्षेत्रात काम करणारे कृषी पदवीधर आहेत. या सर्वांच्या सहकार्याने आम्ही लोक सहभागातून दुर्गम भागातील एक गाव शाश्वत शेती आणि ग्रामविकासासाठी दत्तक घेणार आहोत. संस्थेतर्फे याचे सर्वेक्षण सुरू आहे. याचबरोबरीने प्रत्येक गावात देवराईची उभारणी, प्लॅस्टिक मुक्तिच्यादृष्टीने विनावापर साड्यांपासून पिशव्या तयार करून विविध गावांमध्ये वाटप,पूरक उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाबाबत जनजागृती, प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. याचबरोबरीने डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रथम वर्षातील विद्यार्थांच्या मदतीने वृक्ष लागवड तसेच करिअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

देवराई उपक्रमाला चालना ः

गावशिवारातील जैवविविधता जपण्यासाठी देवराई ही परंपरेने चालत आलेली लोकसहभागाची संकल्पना आहे. हवामान बदलाच्या काळात वनीकरण संकल्पनेला गती देण्यासाठी संस्थेने ज्या गावात देवराई नाही तेथे लोकसहभागातून विकसित करण्यास सुरवात केली आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश राऊत म्हणाले की, देवराई या उपक्रमातून गावातील सार्वजनिक जमिनीवर लोकसहभागातून विविध दुर्मिळ वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात येते. यासाठी संस्था गावकऱ्यांना विविध देशी वृक्षांच्या रोपांचा पुरवठा करते तसेच संवर्धनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. संस्थेने काळबादेवी (जि.रत्नागिरी) आणि लकीकट्टे (जि.कोल्हापूर) या ठिकाणी लोकसहभागातून दोन एकरावर देवराई तयार केली आहे. या उपक्रमामध्ये गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षी किमान दोन गावांमध्ये देवराई उभी करण्याचे आम्ही नियोजन केले आहे.

संपर्क ः राजन कामत ः ९४२३२९३६८९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com