‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या नावीन्यपूर्ण वाटा

आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १०० पक्ष्यांपासून सुरू झालेला कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय २० हजार पक्ष्यांपर्यंत पोचला आहे. केवळ अंडी, चिकन विक्रीवर न थांबता त्यांनी विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित उत्पादने विकसित केली.
Kadaknath poultry bird farming in open system
Kadaknath poultry bird farming in open system

आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १०० पक्ष्यांपासून सुरू झालेला कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय २० हजार पक्ष्यांपर्यंत पोचला आहे. केवळ अंडी, चिकन विक्रीवर न थांबता त्यांनी विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित उत्पादने विकसित केली. पारंपरिक स्टोअर्ससह ई कॉमर्स व्यासपीठांचा योग्य वापर,  व्यावसायिकता आणि नावीन्यपूर्ण संकल्पना यातून कडकनाथ कोंबडी व्यवसायाला  नवी ओळख मिळवून दिली आहे. ळचे लोहणेर (ता. देवळा) येथील रहिवासी असलेले संदीप सोनवणे हे वयाच्या १८ व्या वर्षी १९९१ मध्ये नाशिकला आले. वडिलांच्या अपघाती निधनामुळे कमी वयातच कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. रोजगाराची मिळेल ती संधी आपली मानली. अगदी उदरनिर्वाहासाठी रिक्षाही चालवली. २००४ मध्ये बांधकाम व्यवसायात हात घातला. त्यात यश येत गेले. मात्र शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती व पूरक उद्योगाची आवड होतीच. दरम्यान २०१३ मध्ये तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या निवासस्थानी संदीप यांनी कडकनाथ पक्षी पहिला. त्याच्या अंडी व मांस यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्याविषयी कुतूहल निर्माण झाले. जिज्ञासू वृत्तीने सखोल माहिती इंटरनेटवरून मिळविली. या पक्ष्यांचा मूळ अधिवास असलेल्या झबुआ (मध्य प्रदेश) येथे भेट देऊन माहिती घेतली. अभ्यासातून पुढे हा व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. २०१५ मध्ये सुमारे २ लाख रुपये गुंतवणूक करत छोटे शेड व १०० पक्ष्यांपासून सुरुवात केली. अन् आज त्यांच्याकडे २० हजार कडकनाथ पक्षी आहेत. गुणवत्तेसाठी कामकाजात सातत्यपूर्ण बदल अन्य पोल्ट्री व्यवसायापेक्षा कडकनाथ कोंबडी पालन हा व्यवसाय उत्पादन खर्च, मेहनत व उत्पादन या अंगाने वेगळा आहे. पक्ष्यांची पिले आणल्यानंतर पुढे साधारण सहा महिन्यांनंतर अंडी उत्पादन सुरू झाले. या अंड्यातील उपलब्ध घटक तपासण्यासाठी अंडी प्रयोगशाळेत पाठवली. मात्र तपासणीत काही घटक कमी निघाल्याने गांभीर्याने त्याची कारणे शोधली. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खाद्यनिर्मितीत सोयाबीन, फिशमिल, मका यांसह खनिजे अशी विविध १८ नैसर्गिक घटक मिसळून खाद्य तयार करून दिले. नंतर पुन्हा अंडी प्रयोगशाळेत तपासली असता अपेक्षित घटक उपलब्ध असल्याचे दिसून आले. यातून त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. आव्हान स्वीकारून यशस्वी मार्केटिंग  ब्रॉयलर अंडीच्या तुलनेत कडकनाथ अंड्यांचा दर अधिक आहे. परिणामी, ग्राहकांची मागणी कमी राहत असल्याने अंडी विक्रीमध्ये अनेक अडचणी आल्या. मात्र संदीप यांनी अनेक ग्राहकांना सॅम्पल अंडी देऊन यांचे महत्त्व पटवून दिले. विक्रीसाठी मार्केटिंगची खास यंत्रणा उभारली. त्यातून प्रामुख्याने मुंबई शहरात ग्राहकांचे जाळे विणले गेले. हीच बाब त्यांच्यासाठी मोठी जमेची ठरली. मागणी व वेळेवर पुरवठा होऊ लागल्याने ग्राहकांनी त्यास पसंती दिली. पुढे नाशिक व मुंबई येथे स्वतंत्र विक्री दालने उभारली. यासह ‘ई-कॉमर्स’ पद्धतीचाही अवलंब ते करू लागले. त्यातून विक्री हळूहळू वाढत गेली. टिकवणक्षमतेच्या समस्येवर संशोधनातून मात  कडकनाथ अंड्याची टिकवणक्षमता अवघी ७ दिवस आहे. यात प्रामुख्याने हिवाळा व पावसाळा वगळता उन्हाळ्यात मागणी कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात शिल्लक राहणाऱ्या प्रति दिन सुमारे २ हजार अंड्यांचे करायचे काय, हा प्रश्‍नच होता. यावर सलग सहा महिने संशोधन करत अंड्यापासून भुकटी निर्मितीचा प्रयोगही केला. भुकटीची साठवणक्षमता योग्य वातावरणात ६ महिन्यांपर्यंत आहे. यामुळे उन्हाळ्यातील शिल्लक राहणाऱ्या अंड्यांची समस्या व जोखीम कमी झाली. हा प्रयोग सिद्ध झाल्यानंतर आणखी प्रक्रिया उत्पादनांची मालिका नावारूपाला आणली. नावीन्यपूर्ण प्रक्रिया उत्पादनांची शृंखला 

  • निम्म्या अंड्यांची थेट विक्री, तर निम्म्या अंड्यांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन असे संदीप यांच्या उत्पादनांचे सूत्र ठरले आहे. 
  • प्रक्रियेतून अंड्यापासून भुकटी तयार केल्यानंतर त्यांनी ‘रेडी टू कुक’ पद्धतीने मसाला मिश्रित ऑम्लेट व प्रोटीन पावडर अशी दोन प्रमुख उत्पादने विकसित केली. ही उत्पादने सहा महिन्यांपर्यंत टिकतात.
  • यासह कडकनाथ नर कोंबड्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या ‘मिलेनिअम’ धातूचे संकलन केले जाते. त्यापासून बलवर्धक भुकटी ‘ब्लॅक व्हीगर’ नावाने बाजारात आणली. याच्या शासकीय प्रयोगशाळेतून चाचण्या घेतल्या असून, पेटंट मिळवले आहे. 
  • यासह कडकनाथ कोंबडीचे ताजे व ‘फ्रोझन’ पद्धतीने पिशवीबंद मांस विक्री केली जाते. ज्याची टिकवणक्षमता ९० दिवस आहे. 
  • पक्ष्यांची अंडी देण्याची क्षमता संपल्यानंतर या कोंबड्यांच्या मांसापासून प्रक्रियायुक्त पाळिव प्राण्यांसाठी खाद्य (पेटफूड) बाजारात आणले आहे.
  • ई-कॉमर्स व्यासपीठावर विक्री 

  • सुरुवातीला मुंबईत थेट पद्धतीने अंडी विक्रीची व्यवस्था बसवली आहे. त्या अंडी विक्रीसाठी ई कॉमर्स व्यासपीठांचा अवलंब सुरू केला. आज फ्लिपकार्ट, ॲमेझॉन या ई-कॉमर्स व्यासपीठावरून त्यांच्या उत्पादनाला ‘अ’ वर्ग श्रेणी आहे. या व्यासपीठावर दररोज सुमारे २ हजार अंडी व ५० ते १०० किलोपर्यंत चिकन विक्री होते. रेडी टू कुक ऑम्लेट ४०० ते ५०० पॅकेट विकले जातात. 
  • यासह नेचर बास्केट, फूड हॉल, इझी डे क्लब यांच्या माध्यमातून सुमारे १०० स्टोअर्समध्ये देशभरात अंडी बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे दिल्ली, कलकत्ता, चेन्नई या महानगरांसह पुणे, बंगळूर, अहमदाबाद या मोठ्या शहरांमध्ये मागणी वाढली. 
  • प्रामुख्याने आखाती देशांमधील दुबई, कतार, शारजाह येथे अंडी व चिकन निर्यातीस मोठी मागणी असते.
  • बदलत्या बाजारपेठेमध्ये आकर्षक ब्रँडिंग 

  • उत्पादने विक्री वाढीसाठी www.kadaknath.com नावाची वेबसाइट तयार केली आहे. 
  • यासह ‘kadaknath७७’ नावाने सोशल मीडियावर फेसबुक, यू-ट्यूब, ट्विटर, इन्स्टाग्राम या माध्यमांद्वारे उत्पादनांचा प्रसार ते करतात. यासोबतच ग्राहकांना आकर्षित पॅकेजिंग, ब्रँडिंग केले आहे.
  • प्रीमियम व इकॉनॉमी प्रकारात अंडी विक्री केली होते. यासह सण, उत्सव या धर्तीवर भेट देण्यासाठी ‘कडकनाथ हेल्थी प्रीमिअम गिफ्ट बॉक्स’ संकल्पना सुरू केली. यातून दिवाळी व रमझान सणांच्या खास बाजारपेठेमध्ये शिरकाव केला आहे. यास अनेक सेलिब्रिटी व ग्राहकांनी आगाऊ मागणी करून पसंती नोंदविली आहे.
  • बदलते मार्केटिंग ट्रेंड अभ्यासून आपल्या उत्पादनामध्ये नावीन्यपूर्णता आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. 
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकनाथ अंडी व चिकनला मागणी होती. मात्र, विक्रीसाठी आवश्यक जनजागृती वेबसाइटद्वारे केली.
  • उत्पादन    नग/वजन   किंमत (रु.प्रतिनग)
    अंडी     ६,१२,३० नग अंडी बॉक्स   ४५
    होलचिकन  ९०० ग्रॅम   .९००
    प्री-कट चिकन ५०० व ९०० ग्रॅम     ५७५ व ८५०
    रेडी टू कुक ऑम्लेट ५० ग्रॅम ३००
    प्रोटीन पावडर ५० ग्रॅम  २५०
    संपूर्ण अंडी पावडर    ५० ग्रॅम  २५०
    पेट प्रोटीन पावडर  ५० ग्रॅम   २००
    ‘ब्लॅक व्हीगर’ पाउच   १० ग्रॅम   ५००

    कडकनाथ कोंबडीपालनाची तुलना  

    तपशील  कडकनाथ अंडी  नियमित कोंबडी अंडी
    अंडी उत्पादन    ५ महिन्यांनंतर सुरुवात   ४० दिवसांत सुरुवात
    प्रति पक्षी प्रति माह उत्पादन   १५ अंडी   ३० अंडी
    प्रति पक्षी आयुष्यकाळातील अंडी संख्या  ७० ते ८० अंडी २५० अंडी
    साठवणक्षमता   ७ ते १० दिवस   १२ ते १५ दिवस

    टीप ः कमी उत्पादन आणि अधिक आरोग्यवर्धक यामुळे अंड्यांची किंमत वाढते.  व्यवसायाची ठळक वैशिष्ट्ये

  • पक्षिनिर्मिती ते प्रक्रिया- मूल्यवर्धनाचा एकात्मिक प्रकल्प
  • मुक्त पद्धतीची पक्षिगृहे
  • कामकाजासाठी कुशल मनुष्यबळ
  • पक्षी, अंडी, खाद्य व इतरसाठी स्वमालकीची वाहतूक व्यवस्था
  • मुंबई, नाशिकमध्ये सुसज्ज विक्री दालने
  • मासिक १ लाख अंडी विक्री 
  • कडकनाथ पक्षिपालनासाठी देशातील पहिले ISO मानांकन
  • उत्पादने निर्यातीसाठी अपेडा प्रमाणीकरण
  • ‘हलाल’ पद्धतीसाठी ‘किलिंग कोन’ उपकरणाचा वापर,  हलाल प्रमाणीकरण
  • मानव स्पर्शविरहित कापणीसाठी व शीतकरणासाठी अत्याधुनिक यंत्रणा.
  • व्यवसायातून समाजाप्रति उत्तरदायित्व  मागील वर्षी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील महापूर आपत्तीत सेवा बजावणाऱ्या पोलिस, सैनिक व मदतनिसांसाठी ३० हजार उकडलेली कडकनाथ अंडी पाठवली होती. अशा प्रकारे सामाजिक बांधीलकी जपणारे छोटेमोठे उपक्रम राबवण्यात ते सतत पुढे असतात. कुशल मनुष्यबळाच्या आधारे नियोजनबद्ध कामकाज 

  • पक्ष्यांच्या शेडसह परिसराची दिवसातून दोनदा स्वच्छता
  • विभागनिहाय कामकाजाच्या जबाबदाऱ्या निश्‍चित
  • व्यवसायात गुणवत्ता व नियंत्रण या बाबीकडे विशेष लक्ष
  • बदलत्या काळात अर्ध स्वयंचलित यंत्राच्या साह्याने काटेकोर कामकाज
  • दैनंदिन सर्व कामकाजाच्या अचूक नोंदी ठेवल्या जातात
  • पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी ‘आरओ’ शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित
  • ‘कडकनाथ’नावाने मिळवला ट्रेडमार्क  कडकनाथ पक्षिपालनाचा हा व्यवसाय ‘कडकनाथ ॲग्रो वर्ल्ड’ या नावाने नोंदणीकृत केला आहे. यासह त्यांनी २०१८ मध्ये ‘कडकनाथ’ या नावानेच ट्रेडमार्क मिळवला आहे. नावाचे अधिकार मिळवीत कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचे ते सांगतात. अंड्यावर ट्रेडमार्क शिक्का  सध्या बाजारात ग्राहकांना कडकनाथ अंड्याचे आकर्षण आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अस्सल कडकनाथ अंडी मिळावी, बनावट विक्री रोखण्याच्या उद्देशाने प्रत्येक अंड्यावर ‘ट्रेडमार्क’चा शिक्का मारला जातो. यामुळे ग्राहकांची फसवणूक  टळते. व्यवसायात गुणवत्तेसह पारदर्शकता जपणे शक्य होते. एकात्मिक पद्धतीने व्यावसायिक विस्तार  व्यवसायाचा एकांगी विचार न करता संदीप यांनी ‘पक्षिनिर्मितीपासून प्रक्रिया व विक्री व्यवस्थेचा एकात्मिक विचार केला आहे. त्यांच्याकडे सुविधांयुक्त पक्षगिृहे, खाद्यनिर्मिती व प्रक्रिया युनिट असा एकाच छताखाली आहे. हा उद्योग आडगाव (नाशिक) येथे एकूण साडेसहा एकर क्षेत्रावर संपूर्ण विस्तारला आहे. सर्व सुविधांयुक्त पक्षिगृहे

  • २० हजार पक्षी क्षमता. 
  • खाद्य, पाणी यासाठी अर्ध स्वयंचलित पद्धतीचा अवलंब. 
  • खेळती हवा, जैव सुरक्षा, निर्जंतुकीकरण यांचा अंतर्भाव आहे.
  • स्वयंचलित फीड मील

  • पोल्ट्री उद्योगामध्ये गुणवत्तापूर्ण खाद्य सर्वातमहत्त्वाचा व सर्वाधिक लागणारा घटक आहे. 
  • पक्षिखाद्य निर्मितीसाठी स्वतःचे युनिट उभारले असून, उत्पादनक्षमता प्रति तास ५ क्विंटल इतकी आहे. 
  • याद्वारे एका दिवसात (८ तास) तीन दिवसांचे कुक्कुटखाद्य तयार होते.
  • अत्याधुनिक हॅचरी 

  • पक्षिनिर्मितीकरिता अत्याधुनिक उबवण कक्षाची उभारणी केली आहे. यात वातावरण नियंत्रण, मोजणी, लसीकरण सुविधा यांचा अंतर्भाव आहे. 
  • या टप्प्यावर कोणताही संसर्ग होऊ नये, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. 
  • हॅचरीजचे उत्पादनक्षमता प्रतिमाह ३० हजार पक्षी पिले इतके आहे.
  • ब्रूडिंग विभाग 

  • हॅचरीमधून पिले तयार झाल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग आहे.
  • १ ते २० दिवस, २० ते ६० दिवस व ६० ते १८० दिवस असे वयोमाननिहाय पक्ष्यांना ठेवले जाते. यामध्ये त्या वयोमानानुसार योग्य ते तापमान, प्रकाश योजना, लसीकरण व्यवस्था आणि आवश्यकतेनुसार विलगीकरण यांची सोय केली आहे.
  • अंडी भुकटीनिर्मिती युनिट   अंड्यावर प्रक्रिया करून त्याची भुकटी केली जाते. या युनिटची क्षमता प्रति तास १ हजार अंडी प्रक्रिया करण्याची आहे. उत्पादने विकसनासाठी सातत्यपूर्ण संशोधन

  • अंडी, मांस व प्रक्रियेतून मूल्यवर्धन करून ते थांबलेले नाहीत.
  • अंड्यांपासून शाम्पू, फेसवॉश निर्मितीचे त्यांचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. 
  • रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व जंक फूडला पर्याय देण्याच्या उद्देशाने कडकनाथ अंडी व मांसापासून आरोग्यवर्धक पिझ्झा, बर्गर यांसह नव्या १० पाककृतीवर काम सुरू आहे. ते अधिक आरोग्यपूर्ण बनवण्यासाठी सतत संशोधन व विकासकार्य सुरू आहे. या उत्पादनासाठी मैदा व इतर बेस न वापरता तृणधान्य व कडधान्यांचा वापर केला जात आहे. गोड व तिखट या दोन्ही प्रकारांत हे पदार्थ विकसित केले जात आहेत. ही उत्पादने लवकरच बाजारात आणण्याचा मानस संदीप यांनी व्यक्त केला.
  • महिला संचलित सुसज्ज दालने  नाशिक व मुंबईमध्ये विक्री दालनात सर्व कामकाज महिलांच्या माध्यमातून होते. ज्यामध्ये विक्री, व्यवहार, थेट होम डिलिव्हरी अशी सर्व कामे महिलाच बघतात. यासाठी आकर्षक बाईक डिझाइन केली असून, गणवेशापासून सर्व व्यावसायिक आखणी केली आहे. यातून २२ महिलांना रोजगार मिळाला असून, महिला सबलीकरणाबरोबरच व्यवसायाला बळकटी मिळत आहे.  संपर्क : संदीप सोनवणे, ९८२२०१२९९४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com