स्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर मशरूम’ ब्रॅण्ड

शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित परिमल रमेश उदगावे या युवकाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अळिंबी (मशरूम) स्पॉन निर्मिती, करार शेती त्याचबरोबरीने स्वतः अळिंबी उत्पादन, विक्रीतून व्यवसायाला नवी दिशा दिली.
production of mushroom spawn in the laboratory
production of mushroom spawn in the laboratory

शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित परिमल रमेश उदगावे  या युवकाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अळिंबी (मशरूम) स्पॉन निर्मिती, करार शेती त्याचबरोबरीने स्वतः अळिंबी उत्पादन, विक्रीतून व्यवसायाला नवी दिशा दिली. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहकांशी संपर्क साधत नवी बाजारपेठ विकसित केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी हे शिरोळ तालुक्यात ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव. या गावातील युवा शेतकरी परिमल रमेश उदगावे यांनी ऊस शेतीच्या बरोबरीने २०१८ पासून अळिंबी उत्पादन व्यवसाय सुरु केला. इंग्लंडमध्ये एमएससी बायोटेक्नॉलॉजी झाल्यानंतर काही काळ दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात त्यांनी नोकरी केली. त्यानंतर परदेशातील प्रयोगशाळेत एक वर्ष नोकरी केली. या अनुभवानंतर गावी परत येत त्यांनी २०१८ मध्ये बाजारपेठेचा अभ्यास करून अळिंबी उत्पादनाचा निर्णय घेतला. स्पॉन निर्मिती, अळिंबी उत्पादन आणि विक्रीतून त्यांनी व्यवसायाला नवी दिशा दिली. सध्या जयसिंगपूर येथे स्पॉन निर्मितीची प्रयोगशाळा आणि  शिरोळ येथे अळिंबी उत्पादन घेतले जाते.  व्यवसायाची सुरवात   परिमल उदगावे यांनी पहिल्यांदा अळिंबी उत्पादन, बाजारपेठेचा अभ्यास केला. विविध शहरातील बाजारपेठांमध्ये चौकशी केली. मागणीचा अंदाज घेतला.  अजूनही अळिंबी उत्पादनात व्यावसायिक स्पर्धा कमी असल्याने त्यांनी हा पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. उत्पादनासाठी लागणारा भुसा आणि अन्य कच्चा माल स्वस्त मिळत असल्याने अळिंबी उत्पादन आणि विक्रीला सुरवात केली. ग्राहकांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळा आणि  अन्य साहित्यासाठी सुमारे तीस लाखांपर्यंत भांडवली गुंतवणूक केली. अळिंबी उत्पादनाच्या तिन्ही पातळीवर काम करून विविध मार्गाने नफा मिळविण्यात त्यांना यश मिळाले आहे.    डिजिटल मार्केटिंगवर भर  

  • स्पॉन विक्रीसाठी डिजिटल मार्केटिंगवर भर. इ कॉमर्स, वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क.
  • शेतकऱ्यांशी थेट संपर्क.
  • स्थानिक बाजारपेठेच्या बरोबरीने पश्‍चिम महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकामध्येही अळिंबी, स्पॉन विक्री.
  • योग्य पॅकिंग करून एसटी पार्सल, कुरिअरव्दारे स्पॉनचा पुरवठा.
  • स्पॉन निर्मितीला चालना  

  • विविध प्रकारच्या अळिंबी स्पॉन निर्मितीसाठी देश तसेच परदेशातून मदरसीड आणले जाते. प्रयोगशाळेत टेस्टट्यूबमध्ये मदरसीड वाढवून मागणीनुसार स्पॉन निर्मिती केली जाते.
  • गहू किंवा लाकडाच्या भुश्यावर स्पॉन वाढविले जाते.
  • स्पॉन तयार करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा. यामध्ये तीन कर्मचारी कार्यरत.
  • बाजारपेठेच्या मागणीनुसार महिन्याला एक टन स्पॉन निर्मिती.
  • अळिंबी उत्पादनाचे युनिट  

  • शिरोळ येथे स्वतःच्या युनिटमध्ये महिन्याला सुमारे दोन टन अळिंबीचे उत्पादन.भाऊ प्रणव याच्याकडे  उत्पादनाची जबाबदारी.
  • चार कामगारांच्या मार्फत अळिंबी उत्पादन. सकाळी सात ते दोन या वेळेत अळिंबी पॅकिंग करून बाजारपेठेत पुरवठा.
  • स्पॉन निर्मिती, उत्पादन, विक्री यामध्ये दहा जण कार्यरत. विक्रीसाठी दोन, प्रयोगशाळेत दोन जण कार्यरत.
  • नव्या यंत्रणेच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न.
  • प्रायोगिक तत्त्वावर सिंगापूर बाजारपेठेत अळिंबी निर्यात.
  • २८ प्रकारच्या अळिंबी स्पॉनची विक्री  

  • बाजारपेठेतील मागणीचा विचारकरून २८ प्रकारच्या अळिंबी स्पॉनची निर्मिती आणि विक्री.
  • धिंगरी, गॅनोडर्मा, शिटाके आदि प्रकारच्या अळिंबीला चांगली मागणी.
  • शेतकऱ्यांच्या मागणीनंतर तातडीने स्पॉनची उपलब्धता.
  • ऑनलाइन व्यवहार होत असल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत बचत. पैसे जमा झाल्यावर स्पॉनची शेतकऱ्यांना पोहोच. 
  • महिन्याला सुमारे एक टन स्पॉनची विक्री.
  • १२० रुपयांपासून २००० रुपये प्रति किलो दराने स्पॉन विक्री.
  • दर महिन्याला स्पॉन विक्रीतून दीड ते दोन लाखांपर्यंत उलाढाल.
  • अळिंबीसाठी ‘कोल्हापूर मशरूम’ ब्रॅण्ड

  • देश, परदेशामध्ये अळिंबी विक्रीसाठी ‘कोल्हापूर मशरूम'ब्रॅण्ड.
  • औषधी गुणधर्म असलेल्या अळिंबीची विक्री. 
  • सातत्यपूर्ण पुरवठ्यामुळे मॉल, हॉटेलमालकांकडून पसंती.
  • प्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या अळिंबीला मागणी   लॉकडाऊन काळात विशेषतः औषधी गुणधर्म असलेल्या अळिंबी जातींना मागणी होती. भविष्यामध्ये याची वाढती मागणी लक्षात घेऊन यापासून कॅप्सूल निर्मिती तसेच प्रोटीन पावडर, आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्मितीचे नियोजन उदगावे यांनी केले आहे. करार शेतीतून शेतकऱ्यांना प्रोत्साहन 

  • शेतकऱ्यांना स्पॉनबरोबरीने लागवड ते काढणी, वाळवणीपर्यंत सखोल मार्गदर्शन. 
  • शेतकऱ्यांच्याबरोबरीने अळिंबी खरेदीचा करार. गेल्या सहा महिन्यात चाळीस शेतकऱ्यांकडून अळिंबी उत्पादन.
  • प्रत्येक शेतकऱ्याला वेळापत्रक देवून त्यानुसार अळिंबी उत्पादनावर भर.त्यामुळे नियमितपणे अळिंबीची उपलब्धता.
  • प्रत्येक शेतकऱ्यांकडून सरासरी १० ते १०० किलो वाळविलेल्या अळिंबीची खरेदी.
  • करार पद्धतीने शेतकऱ्यांकडून पांढरी धिंगरी, करडी धिंगरी, गुलाबी धिंगरी, किंग धिंगरी, पिवळी धिंगरी आणि ब्लू धिंगरी अळिंबीचे उत्पादन. 
  • शेतकऱ्यांना अळिंबी उत्पादनासाठी स्पॉन, पिशवी आणि अन्य घटकांचा  पुरवठा. गुणवत्ता आणि आकारानुसार अळिंबीची खरेदी.
  • शेतकऱ्यांकडून अळिंबी आल्यानंतर निम्मे पैसे तातडीने आणि
  • उर्वरित पैसे सात दिवसानंतर दिले जातात. उर्वरित पैसे देताना पुन्हा स्पॉनची मागणी असल्याने ती रक्कम वगळून पेमेंट केले जाते.
  • शेतकऱ्यांना किलोमागे २०० ते २५० रुपयांचा नफा.शेतकऱ्यांकडून आलेल्या अळिंबीची थेट विक्री. यातून दहा ते पंधरा टक्यांपर्यंत नफा. सध्या स्थानिक बाजारपेठ तसेच मुंबई, सातारा येथील मॉलमध्ये विक्री. याचबरोबरीने ग्राहकांना ऑनलाइन विक्री.
  • संपर्क ः परिमल उदगावे, ९८५०९८५५११

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com