
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्याची ओळख हंगामी पिकांकडून आता पेरू पिकासाठी होऊ लागली आहे. तालुक्यात अलीकडील वर्षांत सहाशे एकरपर्यंत त्याचे क्षेत्र पोचले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलगंणा राज्याच्या बाजारपेठा मिळविण्याकडे या शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुका कर्नाटक व तेलंगण राज्याच्या सीमेलगत आहे. काळी कसदार भारी जमीन तालुक्याला लाभली आहे. तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८७० मिलिमीटर आहे. हा तालुका हंगामी पिकांसाठीच मुख्यत्वे प्रसिद्ध आहे. खरिपात उडीद, सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर तर रब्बीमध्ये हरभरा, गहू, करडई, रब्बी ज्वारी आदी पिके असतात. वारंवार पडणारा दुष्काळ तसेच काहीवेळा अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपरिक पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. शेतीतून निश्चित स्वरूपाचे व शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी फळबाग लागवड हा चांगला पर्याय अनेक ठिकाणी पुढे आला आहे. याचा बोध घेऊन तालुक्यातील उच्चशिक्षीत तरुण शेतकरी पुढे आले. त्यांनी बाजारपेठा, अर्थकारण, एकरी उत्पादन, खर्च व मेहनत या सर्व बाबींचा अभ्यास करून पेरूची निवड केली. सहाशे एकरांवर लागवड विशेष म्हणजे तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी पेरू पिकाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी एम. के. सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. तालुक्यात जून २०१८ पासून पेरू लागवडीला सुरवात झाली. आजमितीला तालुक्यात सहाशे एकरांपर्यंत लागवड क्षेत्र असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यात आणखी वाढ होत आहे. सोबतच सीताफळ, लिंबू, पपई लागवडीकडेही शेतकरी वळले आहेत. बाजारपेठा मिळवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलंगण राज्ये नजीक असल्याचा फायदा देगलुरच्या शेतकऱ्यांना होत आहे. नांदेड, हैदराबाद, निजामाबाद या मोठ्या शहरात सध्या पेरू पाठवला जात आहे. काही शेतकरी थेट ग्राहकांनाही विक्री करीत आहेत. त्यांना प्रति किलो ८० ते १०० रुपये दर मिळाला आहे. काही शेतकऱ्यांचा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. सध्या मात्र पेरूची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे. पहिल्या टप्प्यात तसेच दिवाळीत चांगला दर मिळाल्याचे शेतकरी सांगतात. यावर्षी अतिवृष्टी होऊनही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले. तंत्रज्ञानाचा वापर
जाधव यांचा अनुभव कुशावाडी येथील माधवराव जाधव यांनी डिसेंबर २०१८ मध्ये ५० गुंठ्यात पेरूची लागवड केली. मार्च २०२० च्या हंगामात त्यांना शंभर क्विंटल उत्पादन तर किलोला ३० ते ३५ रुपये दर मिळाला. सध्या दुसरा तोडा सुरू आहे. एप्रिल २०१९ मध्ये पुन्हा ६० गुंठ्यात लागवड केली आहे. अनिल पाटील यांचा प्रातिनिधिक अनुभव
पेरूची लागवड वाढून बाजारातील आवक वाढल्यास दर पडण्याचा धोका आम्ही लक्षात घेतला आहे. त्या दृष्टीने पुणे, मुंबई, दिल्ली, हरियाना, अहमदाबाद तसेच देशभरातील अन्य ठिकाणच्या बाजारपेठा शोधण्यास सुरुवात केली आहे. - अनिल पाटील, ९९२३३९७४३४ ( पेरू उत्पादक, रामपूर )
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.