फळबाग, शेळीपालनातून शेतीचे स्वप्न साकार....

अकोला येथील डॉ.निलेश थोरात यांनी सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शैक्षणिक कार्याला सुरवात केली. शेतीच्या आवडीतून त्यांनी अकोला शहराजवळील डोंगरगाव शिवारात दोन एकर माळ जमीन विकत घेतली. याठिकाणी त्यांनी आंबा, सीताफळ, पेरूची फळबाग फुलविली. याचबरोबरीने फळबागेला जातिवंत शेळी पैदाशीची जोड दिली आहे.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

उच्च वैद्यकीय शिक्षण होऊनही चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी वेगळे करण्याचे धाडस फारच कमी जण करतात, यापैकीच एक आहेत डॉ. निलेश थोरात. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतल्यानंतर डॉ.थोरात आर्मी मेडीकल कोअर (एएमसी)मध्ये शॉर्ट सर्व्हीस कमिशनच्या माध्यमातून सैन्यामध्ये दाखल झाले. त्यांनी पाच वर्षे म्यानमार सिमेवर सैन्यदलात सेवा दिली. २०१५ मध्ये डॉ.थोरात मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले. वर्ग १ दर्जा असलेल्या गॅझेटेड अधिकारी पदाची नोकरी सोडून ते अकोल्यात परत आले. वास्तविक या सेवेनंतर एमबीबीएसनंतरचे पुढील शिक्षण घेऊ शकले असते. येथेही त्यांनी दुसरा मार्ग निवडला. भावी पिढ्यांना वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा त्यांनी निश्‍चय केला. विद्यार्थांना शिक्षणाची योग्य दिशा मिळावी यासाठी त्यांनी अकोला शहरात कोचिंग क्लास सुरू केले. तेव्हापासून आजवर असंख्य विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी त्यांनी दिशा दिली. अशीच प्रयोगशीलता त्यांनी शेती आणि शेळीपालनातदेखील जपली आहे.

फळबागेच्या दिशेने...

अमरावती जिल्ह्यातील सागरवाडी हे डॉ.थोरात यांचे मूळ गाव. तेथे त्यांची वडिलोपार्जित सात एकर शेती आहे. लहानपणापासून शेतीशी संपर्क असल्याने त्यांना फळझाडे,जनावरांची आवड होती. २०१५ साली लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात काम करतानाही डॉ.थोरात यांची शेतीमधील उत्सुकता कमी झाली नाही. शेतीच्या आवडीतून त्यांनी २०१८ मध्ये अकोला शहरापासून १४ किलोमीटर अंतरावरील डोंगरगाव शिवारात दोन एकर मुरमाड शेत जमीन विकत घेतली. ही जमीन विकसित करण्यासाठी त्यांना फळबाग तज्ज्ञ विजय खवले यांनी मोलाची साथ दिली. डॉ.थोरात यांनी स्वतः प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आणि त्यानंतर नियोजनानुसार शेती विकासाला सुरवात केली.

साधारणपणे २०१८ साली दोन एकर शेती विकसित करताना फळझाड लागवडीवर भर दिला. आज उभ्या असलेल्या त्यांच्या फळबागेतील प्रत्येक गोष्ट ही एकमेकांच्या उपयोगात येणारी आहे. शेतातील अवशेष वाया जात नाहीत. सीताफळ वगळता इतर फळझाडांची छाटणी केली की तो पाला शेळ्यांना चारा म्हणून वापरला जातो. योग्य नियोजनातून दोन एकरात त्यांची एकात्मिक शेती पद्धतीकडे वाटचाल सुरू आहे. फळबागेला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी कूपनलिका खोदली असून त्याला चांगले पाणी लागले आहे. यावर सौर ऊर्जाचलित पंप बसविलेला आहे.

माळरानावर फळबाग ः

वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्याने डॉ. थोरात यांनी व्यवस्थापन सोपे जाण्यासाठी दोन एकरात फळबागेचे नियोजन केले. फळबाग तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव आणि प्रयोग लक्षात घेऊन डॉ. थोरात यांनी ४० गुंठे आंबा, २० गुंठे सीताफळ आणि दहा गुंठे पेरू लागवडीचे नियोजन केले. दहा गुंठे क्षेत्र हे फार्म हाऊस आणि शेळीपालन प्रकल्पासाठी ठेवले. आंबा, सीताफळ आणि पेरू लागवडीचे अंतर प्रायोगिक तत्वावर अति घन पद्धतीने सात फूट बाय पाच फूट ठेवले आहे. कारण क्षेत्र कमी असल्याने जास्तीत जास्त कलमांची लागवड करण्याचे त्यांचे नियोजन होते. अतिघन पद्धतीने लागवड करताना खत, फवारणी तसेच छाटणी तंत्राचा डॉ.थोरात काटेकोर वापर करतात. त्यामुळे फळझाडांची चांगली वाढ झाली आहे.

फळबागेबाबत डॉ. थोरात म्हणाले की, माझ्या आंबा बागेत केसर जातीची जास्त कलमे आहेत. परागीकरणाच्यादृष्टीने मी त्यामध्ये हापूस, रत्ना,लंगडा,तोतापुरी,सिंधू, निलम या जातींची कलमे देखील लावली आहेत. सीताफळाच्या बालाघाट, ॲनोना आणि अर्का सहान जातीची लागवड आहे. पेरूमध्ये सरदार, पिंक तसेच मोठ्या पेरूच्या कलमांची लागवड केली आहे. शेतीबांधावर साग आणि नारळाची लागवड केली आहे. या सोबतच कुटुंबाला विविध फळे उपलब्ध होण्यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार संत्रा, मोसंबी, चिकू, काजू, पपनस, फणस, लिची, जांभूळ, आवळा, ॲपलबोर, पपई, लिंबू लागवड केली आहे.

गेल्या हंगामापासून सीताफळाचे उत्पादन सुरु झाले. डॉ.थोरात यांनी दोन किलो सीताफळांचा बॉक्स तयार करून अकोला शहरात थेट ग्राहकांना १२० रूपये दराने दिला. सीताफळ विक्रीतून पहिल्यावर्षी २७ हजार रुपयांची उलाढाल झाली. यावर्षी आंबा बागेतून देखील फळांचे उत्पादन सुरू झाले आहे. सध्या १५० रूपये किलो या दराने फळांची थेट विक्री केली जाते. फळबागेच्या व्यवस्थापनासाठी एक कायम स्वरूपी मजूर जोडपे ठेवले आहे.

कुटुंबाची मिळाली साथ...

डॉ. निलेश थोरात यांची आई लता थोरात मुख्‍याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. वडील बापूराव थोरात डीआयसीला इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर होते. लहान भाऊ शैलेश पुण्यात राहत असून त्यांची फार्मा कंपनी आहे. या सर्वांची फळबाग नियोजन आणि व्यवस्थापनात मदत असते. डॉ. निलेश यांची पत्नी डॉ. राजलक्ष्मी या वैद्यकीय व्यवसाय सांभाळून शेतीच्या नियोजनात चांगला हातभार लावतात.

फळबागेला शेळीपालनाची जोड ः

योग्य पद्धतीने फळबाग विकसित करण्यासोबतच डॉ.थोरात यांनी शेतीपूरक उद्योग म्हणून शेळीपालनाला २०१८ मध्ये सुरवात केली. पहिल्यांदा अकोला परिसरातील शेळीपालक तसेच पशूवैद्यकांच्याकडून शेळीपालनाबाबत संपूर्ण माहिती घेतली. याबाबत डॉ. थोरात म्हणाले की, मी पहिल्यांदा पाच बेरारी शेळ्या विकत घेतल्या. मला शेळीपालन आव्हानात्मक ठरले. दररोज कुठली तरी नवीन समस्या उभी राहत होती. यासाठी मी स्वतः शेळी व्यवस्थापनातील बारकावे शिकून घेतले. परिणाम आज माझ्या फार्मवर पिल्लांच्या मृत्यूचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आले आहे.

सध्या माझ्या गोठ्यामध्ये १३२ शेळ्या आहेत. यामध्ये बेरारी, उस्मानाबादी, जमनापारी, बीटल, सिरोही, हैदराबादी या जातीच्या शेळ्या आहेत. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन लांब कान, गुलाबी कातडी, पांढरे डोळे असे गुणधर्म असलेली हैदराबादी शेळी तसेच विदर्भातील वातावरणातही चांगल्या पद्धतीने वाढणाऱ्या स्थानिक बेरारी शेळीच्या जातीवंत पैदाशीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पैदासीचे बोकड आणि शेळ्या पैदास करण्याचे ध्येय निश्‍चित केले असून सध्या चौथ्या पिढीत ८५ टक्के शुद्धतेपर्यंत मी पोहोचलो आहे. शेळ्यांच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी दोन मजूर आहेत. त्यांना लसीकरण आणि व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण दिलेले आहे. त्यामुळे शेळ्यांची चांगली वाढ आहे.

विक्रीबाबत डॉ.थोरात म्हणाले की, चार वर्षांत मी पैदाशीसाठी केवळ बोकडांची विक्री केली. यातून दोन लाखांची उलाढाल झाली. पैदाशीवर काम करत असल्याने मी एकाही पाटीची विक्री केलेली नाही. पैदाशीचे धोरण ठरविण्यासाठी पशू तज्ज्ञ तसेच शेळीपालकांसोबत सातत्याने चर्चा सुरू असते.

फळबाग, शेळीपालनातून रोजगार निर्मिती ः

डॉ.थोरात हे वैद्यकीय आणि कोचिंग क्षेत्रात व्यस्त असल्याने दररोज शेती, शेळीपालनासाठी पूर्ण वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांनी फळबाग तसेच शेळी पालनाच्या नियोजनासाठी रोजंदारीने माणसे ठेवलेली आहेत. या सर्वांना दर आठवड्याचे नियोजन दिले जाते. याचबरोबरीने कोचिंग क्लास तसेच वैद्यकीय सेवेतून जसा वेळ मिळेल त्यानुसार डॉ. थोरात शेतीची वाट धरतात.

--------------------------------------

संपर्क ः डॉ. निलेश थोरात, ९४२०६७११९३

(दुपारी ३ ते संध्याकाळी ७ पर्यंत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com