ग्रामीण खाद्य पदार्थांना दिली नवी ओळख

ग्रामीण खाद्य पदार्थांना दिली नवी ओळख
ग्रामीण खाद्य पदार्थांना दिली नवी ओळख

वनिता देविदास कोल्हे यांना पाककलेची आवड असल्याने ग्राहकांच्याकडून घरगुती पदार्थांची मागणी होऊ लागली. गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या गृहउद्योगाला कौशल्याची जोड देत वनिताताईंनी नाशिक शहरात ‘संपूर्ण’ ब्रँड विकसित केला. प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा बहुतांश कच्चा माल शेतकऱ्यांच्याकडूनच खरेदी केला जातो. वनिता देविदास कोल्हे यांना पाककलेची विशेष आवड आहे. त्यांनी बनविलेला पदार्थ चविष्ट असल्याने अनेक जणांची त्यास पसंती असायची. त्यामुळे त्यांनी घरगुती स्तरावर विविध पदार्थ बनविण्यास सुरुवात केली. १९९८ पासून वनिताताईंचे पती चंद्रपूर येथे नोकरीस होते. या ठिकाणी घरगुती स्वरुपात दिवाळी फराळ, वाळवण आणि मसाले त्या बनवून देत. गुणवत्तेमुळे ग्राहकांकडून मागणी वाढत गेली. सुरुवातीच्या काळात हा व्यवसाय मर्यादित स्वरूपाचा होता. वनिताताईंनी १९९८ ते २०१० पर्यंत चंद्रपूर येथे खाद्य पदार्थ निर्मितीचा व्यवसाय केला. यानंतर त्यांच्या पतीची नाशिक येथे बदली झाली. गेल्या नऊ वर्षांपासून त्यांनी नाशिक शहरात ‘निताज फुड्स अँड रेसीपीज’ हा गृहउद्योग नावारूपाला आणला. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना दिवाळी, संक्रात व उन्हाळ्याच्या हंगामात ग्राहकांकडून खाद्य पदार्थांची मागणी होऊ लागली. खासकरून ग्रामीण भागातील पदार्थांना चव असल्याने त्यांची मौखिक प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर झाली. त्यांचे ग्राहक जाळे विस्तारत गेल्याने मार्केटिंगची फारशी गरज भासली नाही. खाद्यपदार्थांना मिळाली ओळख ः वनिताताई या मूळच्या भुसावळ (जि. जळगाव) येथील. त्यांच्या माहेरी आणि सासरी शेती आहे. त्यामुळे ग्रामीण खाद्य पदार्थ तयार करण्याची आवड आपोआप जोपासली गेली. स्वतःकडील अल्प भांडवल गुंतवून त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. स्थानिक वाळवण, मसाले बनविण्यात त्यांनी सातत्य ठेवले. ग्रामीण चवीला राज्यभर नेत ओळख मिळवून दिली. खाद्यपदार्थांचे १०० ग्रॅम पासून ते पाच किलोपर्यंत पॅकिंग उपलब्ध आहे. विविध प्रकारचे वाळवण, लोणची, पौष्टिक लाडू, बर्फी, मसाले, दिवाळी फराळ, केक, कुकीज, मुखवास अशी उत्पादने त्यांनी बाजारपेठेत आणली आहेत. गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती ः वनिताताई खाद्यपदार्थांमध्ये रसायने व कृत्रिम रंगांचा वापर करत नाहीत. बाजारात उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांच्या तुलनेत रास्त भाव, चवदार व उत्तम दर्जाची उत्पादने असल्याने मागणी अधिक आहे. चांगल्या प्रतिचा कच्चा माल आणि पदार्थ बनविताना स्वच्छता ठेऊन विविध पदार्थांची निर्मिती केली जाते. त्यांच्याकडे एकूण पंधरा महिला काम करतात. विक्रीसाठी त्यांनी ‘संपूर्ण’ हा ब्रँड विकसित केला. उत्पादनांची त्यांनी नोंदणी करून विक्रीसाठी नाशिक शहरात दोन ठिकाणी विक्री केंद्रांची उभारणी केली. ग्राहकांकडून ज्या उत्पादनांना मागणी अधिक आहे, अशी उत्पादने नैसर्गिक चव व माफक दराने विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. गरजू महिलांना रोजगार : शहरी भागात अनेक महिला कौटुंबिक कामे झाल्यांनतर मोकळ्या असतात. अशा काही महिलांना अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ रोजगाराची गरज असते. अशा महिलांना संघटीत करून गृह उद्योगाच्या माध्यमातून त्यांच्या रोजगाराची गरज पूर्ण केली. अनेक महिलांना हक्काचा रोजगार मिळाला असून, त्या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. उपलब्ध वेळेनुसार महिला गृहउद्योगात काम करतात. नवीन पाककृतींची निर्मिती ः शंभर टक्के नैसर्गिक व आयुर्वेदिक गुणधर्म असलेले अंबाडी सरबत, आंबा कैरीपासून प्रक्रियायुक्त सरबत, पापड, कँडी अशी उत्पादने त्यांनी तयार केली. दूध साईचा मावा केक, आईस केक तसेच केकचे विविध प्रकार त्यांच्याकडे तयार होतात. विविध मसाले, वाळवण, यांच्यासह २८ प्रकारचे लाडू त्या बनवितात. अशी आहेत उत्पादने ः १) लोणचे : खान्देशी गोड लोणचे, आंबा लोणचे, मिरची लोणचे, दक्षिणात्य आंबट लोणचे, टोमॅटो लोणचे, चिंच तक्कू. २) मसाले : ओला मसाला, मेतकुट मसाला, काळा मसाला, गोड मसाला, सांबर मसाला, पुलाव मसाला, चहा मसाला. विविध प्रकारच्या चटण्या. ३) बेकरी पदार्थ : मावा केक, नान कटाई. ४) लाडू : बेसन लाडू, ड्रायफूट लाडू, खजूर लाडू, राजगिरा खजूर लाडू. ५) मुखवास : साधी सौप, मसाला सौप, गुलकंद, बाळंतीण मुखवास. ६) फळांचे पदार्थ : आंबा गर सरबत, ज्यूस, जाम, आंबा पापड, कैरी पापड, आंबा कँडी, अननस कँडी, आवळा कँडी. शहरातून मागणी : वनिताताईंना प्रामुख्याने नाशिक शहर, तसेच शहराबाहेर असणारे ओळखीचे ग्राहक ऑर्डर देतात. याचबरोबरीने काही ग्राहक सिंगापूर, दुबई, अमेरिका आणि युरोपीय देशातही त्यांची उत्पादने घेऊन जातात. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या राज्यातील शहरांसह नेपानगर (मध्य प्रदेश), वापी, बडोदा (गुजरात) येथून मोठी मागणी असते. याचबरोबरीने निर्यातीच्यादृष्टीने त्यांचा प्रयत्न सुरू आहे. विविध प्रदर्शने, विक्री मेळावे यामध्ये त्या सहभागी होतात. थेट शेतकऱ्यांकडून खरेदी ः वनिताताई थेट शेतकऱ्यांकडून कच्चा शेतमाल विकत घेतात. यामध्ये प्रामुख्याने आंबा, चिंच, आवळा, हिरवी व लाल मिरची, आले, तर डाळीमध्ये हरभरा, उडीद, मूग तसेच धने, तीळ, तांदूळ आणि ज्वारीची थेट खरेदी केली जाते. मसाल्यासाठी लागणारा कांदा मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येतो. यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळतो, तसेच वनिताताईंना खात्रीशीर दर्जेदार शेतमालाची गरजेनुसार उपलब्धता होते. कामकाजाची वैशिष्ट्ये :

  • गेल्या वीस वर्षांपासून प्रक्रिया व्यवसायात.
  • ग्रामीण पदार्थांना व्यावसायिक जोड.
  • शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध.
  • हंगामनिहाय पौष्टिक पदार्थांची निर्मिती.
  • ठोक व किरकोळ स्वरुपात उत्पादनांची विक्री.
  • पदार्थ निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्याकडून दर्जेदार कच्च्या मालाची खरेदी.
  • उपलब्ध भांडवलाची गुंतवणूक व त्यातून नफ्याची विभागणी.
  • ५००० ग्राहकांचे थेट जाळे, २५ लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल.
  • व्यवसाय वाढीसाठी संकेतस्थळ ः वनिताताई ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन २८ प्रकारचे लाडू बनवितात. लाडू विक्रीसाठी ladduwala.com या नावाने संकेतस्थळ तयार करीत आहेत. या माध्यमातून सुरुवातीला आठ प्रकारचे लाडू, चकलीचे तीन प्रकार ऑनलाईन विक्री करण्याचे नियोजन आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी थेट ग्राहकांच्या घरी पुरवठा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. संपर्क ः वनिता कोल्हे, ८१४९७०६६४१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com