टेरेसगार्डनवर विषमुक्त फळे-भाज्यांची निर्मिती

पुंड यांची आखीव, रेखीव परसबाग
पुंड यांची आखीव, रेखीव परसबाग

रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हाच एकमेव उद्देश ठेऊन जालना येथील सेवानिवृत्त अधिकारी नंदकिशोर सखाराम पुंड यांनी आपल्या घराच्या एकहजार चौरस फुटांवर सेंद्रिय पद्धतीने परसबाग फुलवली आहे. त्यामध्ये भाजीपाला, फळपिके, फुलपिके यांची मोठी विविधता पाहण्यास मिळते. गांडूळखत, जीवामृत निर्मिती, पर्जन्यजलसंचय आदी विविध प्रयोगांच्या आधारे उत्पादीत केलेल्या विषमुक्त अन्नाचा आनंद ते कुटुंबासह दररोज घेत आहेत. परिसरासाठीही त्यांनी या प्रयोगशीलतेचा प्रेरणादायी आदर्श तयार केला आहे . जालना शहरात राहणारे नंदकिशोर सखाराम पुंड सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहेत. सन २०१५ मध्ये दरम्यान त्यांनी सेवनिवृत्ती घेतली. त्यांची शेती नाही. मात्र शेतीची मोठी आवड व अनेक वर्षे याच क्षेत्रात व्यतीत केल्याने दांडगा अनुभव व ज्ञान यांची प्राप्ती झाली होती. रासायनिक अवशेषमुक्त अन्न हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. घराच्या टेरेसचा पुरेपूर उपयोग पुंड यांचा जालना येथील भाग्यनगर भागात साडेतीन हजार चौरस फुटांचा प्लॉट आहे. यामध्ये त्यांनी सोळाशे चौरस फुटांमध्ये दोन मजली बांधकाम केले आहे. यामुळे उपलब्ध झालेल्या टेरेसचे तीन भाग केले आहेत. यात ४०० चौरस फूट व ६०० अशा दोन भागांत शेडनेट केले आहे. तर उर्वरित जागा खुल्या लागवडीसाठी ठेवली आहे. पूंड नोकरीत हते त्या वेळीही घरपरिसरातील जागेत थोडाफार भाजीपाला घेत होतेच. आता आपल्या आवडीचे रूपांतर त्यांनी विस्तृत स्वरूपात केले. बकेटमध्ये फळझाडे या टेरेसवर २० लिटर क्षमतेच्या बकेटसचा (बादली) वापर फळझाडे लागवडीसाठी केला आहे. बादलीच्या तळाला चार छिद्रे पाडल्यानंतर तळाला विटाचे ८ ते १० लहान तुकडे टाकून त्यावर नारळाच्या शेंड्या पसरवल्या जातात. त्यानंतर ३० टक्के माती, ३० टक्के कंपोस्ट खत, २० टक्के कोकोपीट व २० टक्के पालापाचोळा एकत्र मिसळून ते बादलीमध्ये भरले जाते. या बादल्यांचा वापर बहुवर्षीय पिके लावण्यासाठी केला जातो. त्यात पेरू २, लिंबू ३, डाळिंब व अंजीर प्रत्येकी एक झाड अशी लागवड केलेली आहे. सघन लागवडीप्रमाणे छाटणी करून झाडांना आकार देण्यात येतो. यात शेवगाही आहे. ग्रो बॅगमध्ये भाजीपाला दोन फूट उंची व दीड फूट गोलाईच्या सुमारे ६० बॅग्ज आहेत. यामध्ये १० किलो माती मावते. यात भाजीपाला, आले, हळद, फुलपिके आहेत. छताच्या भिंतीवर सपोर्ट नेट बांधून त्यावर तोंडले किंवा अन्य भाज्यांचा वेल सोडला आहे. हंगामानुसार लागवड होते. खरिपात टोमॅटोची ३० झाडे होती. त्यापासून ८० किलो टोमॅटो उत्पादन झाले. वांग्याची २० झाडे घेतली होती. भाजीपाला शेजाऱ्यांनाही देण्यात येतो. कुंपणाच्या भितींच्या बाजूने आंबा, चिकू, पपई, अंजीर यांची झाडेही लावली आहेत. रोपांची विक्री ड्रॅगन फ्रूट असून हंगामात त्याची ४ ते ५ फळेही खाण्यास उपलब्ध होतात. पांढरा गर असलेली १० झाडे आहेत. ड्रॅगन फ्रूटची ५० रुपये प्रति नग याप्रमाणे आत्तापर्यंत ३०० रोपे विकली आहेत. त्यांनी लाल गर असलेली सहा नवी झाडे लावली आहेत. जुलै, महिन्यात फुले तर सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत फळे मिळतात. टेरेस गार्डनमधील पिकांची विविधता भाजीपाला : पालक, शेपू, मेथी, गवार, भेंडी, वांगे, टोमॅटो, कोथिंबीर, चुका, अळू, बीट, मुळा, पुदीना, कोबी, तोंडली. फळपिके : डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रुट, लिंबू, अंजीर फुलझाडे : निशिगंध, गुलाब, मोगरा, जरबेरा, चिनी गुलाब, लिली, गलांडा. मसाला पिके : हळद, आद्रक, मिरची, गवती चहा. शोभीवंत झाडे : कॅक्टस, ड्रेसीना, क्रोटॉन, कलांचू, ॲकेशियम, मोरपंखी. घरच्या घरी हळद पावडर सुमारे १५० चौरस फुटात १० ग्रो बॅगमधून दरवर्षी हळद घेतात. त्यापासून दरवर्षी २० किलो ओली हळद मिळते. ती धुऊन उन्हात वाळवल्यानंतर नारळाच्या शेंड्यांनी घासून वरील टरफल काढून टाकले जाते. यानंतर हळकुंडे दळून आणली जातात. यापासून तयार झालेली सहा ते सात किलो पावडर घरी वर्षभर वापरण्यात येते. गावरान बियाणे : नोकरीत दौऱ्यावर असताना गावरान बियाणे संकलित करण्याचा पुंड यांना छंद होता. गावरान बियाण्याची ‘बँक’ असलेल्या अकोले तालुक्यातील (जि. नगर) राहीबाई पोपरे यांच्याकडूनही त्यांनी भाजीपाला बियाणे खरेदी केले आहे. सर्व भाज्यांचा आस्वादही घेतला असून चव अत्यंत चांगली असल्याचे ते सांगतात. घरच्याघरी निविष्ठा निर्मिती पीक संरक्षणासाठी लसूण, मिरची तसेच दशपर्णी अर्क तयार केला जातो. निंबोळी व गोमुत्र विकत आणून फवारणी होते. किडींना दूर ठेवण्यासाठी झेंडू व तुळशीची झाडे लावली आहेत. काही कामगंध सापळेही लावले आहेत. घरच्याघरीच टाकाऊतून टिकाऊ म्हणजे ओला-वाळला कचरा, भाजीपाल्यांचे अवशेष, शेण यापासून गांडूळ खत तयार करतात. ८ बाय चार फूट लांबी- रुंदी व तीन फूट उंचीचा पॉलिथिनचा व्हर्मी कंपोस्ट बेड आहे. प्रतिवर्ष एक टन खत तयार होते. शिल्लक खताची २० रुपये प्रति किलो दराने विक्री होते. वेस्ट डी कंपोजरचही वापर होतो. तीनशे रुपये प्रति किलो दराप्रमाणे गांडूळ कल्चरही विकण्यात येते. पाणी व्यवस्थापन : छतावर व जमिनीखाली पाचहजार व चारहजार लिटरचे हौद तयार केले आहे. छतावरील हौदातील पाणी पाईप व झारीने देण्यात येते. टेरेसवरील पाणी पाईपद्वारे जमा करून ते बोअरवेलमध्ये सोडले आहे. सन १९८८ मध्ये १२० फूट खोलीचे बोअर घेतले. गाळ साचून ते आता ९५ फुटांचे झाले आहे. एवढ्या कमी खोलीत बोअर असताना दुष्काळी वर्षातही पाण्याची टंचाई भासली नाही. शेजाऱ्यांनीही आता प्रेरणा घेत वॉटर हार्व्हेस्टींग म्हणजे छतावरील पाण्याचे संवर्धन करून ते बोअरमध्ये सोडले आहे. इतरांना प्रेरणा पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील काहीजणांनी आपल्या छतावर बाग फुलवली आहे. यामध्ये डॉक्टर, शिक्षक, व्यापारी यांचा समावेश आहे. त्यांना मार्गदर्शन व्हावे, एकमेकांना प्रश्न-उत्तरांची आदान-प्रदान व्हावी म्हणून पुंड यांनी गच्चीवरील बाग नावाने व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केला आहे. यात छायाचित्रेही शेअर करून शंकासमाधान कले जाते. समूहातील लोक एकमेकांच्या बागांना नियमित भेटीही देतात. प्रशिक्षणाचे केंद्र पुंड यांचे टेरेस गार्डन प्रशिक्षणाचे केंद्र बनले आहे. जालना जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेविकांना परसबागेतील विषमुक्त भाजीपाला उत्पादनाचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालान येथे दिले जाते. पुंड यांना त्यामध्ये मार्गदर्शन करण्यास बोलावले जाते. बागेला भेटही देण्यात येते. संपर्क - नंदकिशोर पुंड - ९४२२२२९०५१ (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com